Friday, May 3, 2024
Homeनगरकाष्टी सोसायटीच्या सचिवाचे निलंबन

काष्टी सोसायटीच्या सचिवाचे निलंबन

श्रीगोंदा|प्रतिनिधी|Shrigonda

राज्यासह देशात नावलौकिक असलेल्या सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सचिव सत्यवान बुलाखे यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत जिल्हास्तरीय समितीच्या चौकशीमध्ये संस्थेच्या सचिवांनी केलेला गैरकारभार तसेच संस्थेच्या हिताला बाधा आणणारे काम सचिवांनी करत तत्कालीन चेअरमन यांचे नातेवाईक तसेच संस्थेच्या मॅनेजरना बोगस कर्ज वितरण केल्याचे सिद्ध झाले आहे

- Advertisement -

काष्टी सेवा संस्था देशभरात नावारूपाला आली आहे. विविध शेतीपूरक व्यवसाय करत संस्थेचे कामकाज वाढले असले तरी मागील काही वर्षांपासून संस्थेच्या कारभाराबाबत संचालक तक्रार करत आहेत.

त्यातच आता संस्थेचे सचिव म्हणून काम करत असलेले सत्यवान बुलाखे हे मागील 24 वर्षांपासून काष्टी सेवा संस्थेत काम करीत आहेत. याच सेवा संस्थेचे माजी व्यवस्थापक व संचालक मंडळात गेल्या काही दिवसापासून अंतर्गत वाद झाले. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत आले होते. त्यातून व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांना बडतर्फ केल्याचे संचालक मंडळाने जाहीर केले होते. हे प्रकरण ताजे असताना आता संस्थचे सचिव सत्यवान बुलाखे यांचे निलंबन झाले आहे.

सत्यवान बुलाखे, निलंबित सचिव (रा. काष्टी ता. श्रीगोंदा) यांनी श्रीगोंदा तालुक्यातील सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. काष्टी ता. श्रीगोंदा या संस्थेत सचिव म्हणून कामकाज करीत असताना गैरव्यवहार केला. यात बोगस कर्ज वितरण व कर्जमाफी करणे, तत्कालीन चेअरमन यांच्या नातेवाईकांना बोगस कर्ज व कर्जमाफीचा लाभ, तत्कालीन मॅनेजर व त्यांच्या नातेवाईकांना बोगस कर्ज व कर्जमाफी लाभ, संस्थेच्या मालाची उधारीवर विक्री करणे, संस्थेची माहिती सादर न करणे वरीलप्रमाणे तुमच्या कामकाजाचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना प्राप्त झालेला असल्याने त्यांना दिनांक 8 जुलैपासून सचिव सेवेतून निलंबित (सस्पेंड) करण्यात येत आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी नेमणूक आदेश व त्यांच्यावर ठेवलेले आरोपपत्र त्यांना पाठविण्यात येईल.

जिल्हास्तरीय समिती अहमदनगर तथा जिल्हा उपनिबंधकांनी याबाबत आदेश काढला असून सहकारमहर्षी काष्टी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. काष्टी ता. श्रीगोंदा या संस्थेचा चार्ज आनंदा विष्णू शिंदे सचिव, लोणी व्यंकनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. लोणी व्यंकनाथ ता. श्रीगोंदा यांच्याकडे तात्काळ संस्थेचा पदभार देऊन चार्जमुक्त व्हावे असा यात उल्लेख आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना नागवडे कारखान्याचे संचालक राकेश पाचपुते म्हणाले, या संस्थेत अनेक वर्षांपासून डेरा मांडून बसलेले मार्गदर्शक आणि सह्यांचे अधिकार असलेले संचालक यांचीही चौकशी व्हावी. केवळ सचिवच नव्हे तर तत्कालीन अध्यक्ष, सहभागी संचालक यांच्यावर कारवाई व्हावी. आमचा लढा सुरूच राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या