Type to search

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (सौ. विद्या रवींद्र करपे) समाजोन्नतीसाठी भगीरथ प्रयत्न

Share

सौ. विद्या रवींद्र करपे

  • शिक्षण – बी. कॉम
  • गट-सामाजिक

भूषविलेली व भूषवत असलेेली पदे-
1) अध्यक्षा- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटना
2) जिल्हाध्यक्षा- म. फुले समता परिषद
3) संस्थापक – युगंधरा सामाजिक प्रतिष्ठान राहुरी
4) तालुकाध्यक्षा- दै. सार्वमत नजराणा महिला मंच
5) उपाध्यक्षा- शिवछत्रपती प्रतिष्ठान उंबरे
6) जिल्हाध्यक्षा – ओ.बी.सी. सेल

जिल्हाभर सातत्यपूर्ण दौरे, एक क्रियाशील कार्यकर्ती अशी ओळख असणार्‍या विद्याताई रवींद्र करपे या समाजाच्या उन्नती व प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात. आज त्या युगंधरा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात सर्वत्र विविध कार्यक्रम राबवत असतात. याशिवाय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून त्यांचे कार्य गतीशील आहे.

विद्याताई या मुळच्या संगमनेरचे प्रसिद्ध व्यापारी कै. गंगाधरशेठ करपे यांच्या धाकट्या स्नुषा. तर राहुरी येथे इरिगेशनमध्ये कार्यरत असणारे इंजिनीअर श्री. रवींद्र करपे यांच्या सुविद्य पत्नी. त्यांचा मुलगा अपूर्वराज हा बी.ई. सीव्हील करतो आहे तर मुलगी अक्षदा बी. फार्म करते आहे. लग्नानंतर नोकरीनिमित्ताने गावोगावी फिरत असतांना समाजकार्याला 8 ते 10 चे क्लासेस मोफत घेऊन सुरूवात केली. ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्‍न, मुलांची होणारी उपासमार, गरिबी हे प्रश्‍न सतत डोळ्यासमोर होते. घाण्याच्या बैलाप्रमाणे काम करणार्‍या महिला वर्गाला त्यांचे अस्तित्व, त्यांचे अधिकार यांचे काहीच भान नव्हते.

या सर्व महिलांचे प्रश्‍न जवळून बघण्यात आले. गरजू आणि हुशार मुले आर्थिक परिस्थितीमुळे ज्ञानार्जन करू शकत नाहीत ही बोच मनात होती जी स्वस्थ बसू देत नव्हती. पण राहुरी येथे बदली झाल्यानंतर त्यांनी महिलांच्या संघटनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आणि युगंधरा सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केली. हळुहळू संघटनेचे कार्य आणि संघटना नावा रूपास येऊ लागली. पण याचवेळी नियतीने विद्याताईंवर खूप क्रूर असा डाव साधला आणि मानसिक व शारिरीकरित्या कोसळल्या. पण 5-6 वर्षानंतर परत एकदा त्यांनी फिनीक्स भरारी घेतली व संघटनेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यांच्या संघटनेने समाजातील गरजू आणि दुबळ्या लोकांना मदत करण्यास सुरूवात केली. या कार्याला जोड सार्वमतने स्त्रियांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी नजराणा महिला मंच स्थापन केले. याद्वारे विद्याताईंनी राहुरीच्या महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम, पर्यटन आदींचे आयोजन केले होते.

समाजाचे आपण काही देणे लागतो आणि समाजाचे ऋण फेडण्यासाठी युगंधराच्या प्रतिष्ठानच्यावतीने दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून समाजात अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, आदिवासी शाळा, कॉलेज, मूकबधीर विद्यालय आदींना मदत केली. गुहा येथील अनाश्रमातील मुलांना वेळोवेळी गरजेच्या वस्तू आणि जेवणासाठी ताटे दिली. राहुरीतील आश्रमशाळेतील मुलांना स्टीलचे तांबे, शैक्षणिक साहित्य, कपडे आदींचे वाटप केले. याच आश्रमशाळेतील मुलींना प्रशिक्षकाच्या माध्यमातून गरबा आणि दांडियाचे प्रशिक्षण देऊन स्पर्धेमध्ये सहभागी केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्या विद्यार्थिनींच्या समूहास प्रथम पारितोषिक मिळाले. युगंधरा प्रतिष्ठानच्यावतीने मातोश्री वृद्धाश्रमात बेडशीट्सचे वितरण करण्यात आले होते.

अकोले तालुक्यातील राजूर येथे श्रीस्वामी समर्थ विद्यालयासाठी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य दिले. दरवर्षी युगंधरातर्फे महिलांसाठी रक्त तपासणी शिबिर, कॅल्शियम तपासणी शिबिर, असे विविध शिबिर घेतले जातात. त्याचप्रमाणे बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्त्री जन्माचे स्वागत आदी उपक्रम वर्षभर उत्साहाने राबविले जातात.
चूल आणि मूल ही संकल्पना मोडित काढून सर्वच स्तरातील महिलांना विद्याताईंनी समाज प्रवाहात आणले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांना सहभागी करून तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय पारितोषिके पटकावली आहेत. अनेक बचत गटांचे कार्य , विशेष प्राविण्य मिळणार्‍या व्यक्ती आणि विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी सत्काराचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचप्रमाणे मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून समाजात अन्याय, अत्याचार पीडितास न्याय मिळवून देणे. गरजू विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे, वैद्यकीय सेवेपासून वंचित असणार्‍यांना मदतीचा हात देणे इ. कार्य होतात.

विद्याताई पुण्यातील सावित्री फोरमच्या सदस्या असून सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला आहे. 3 जानेवारी रोजी सावित्रीबाईंच्या नायगाव येथे होणार्‍या उपक्रमामध्ये सातत्याने सहभाग आहे. समता परिषदेच्या प्रवाहात महिलांना कार्यरत करणे. विविध चिंतन शिबिरांचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची गाव तेथे शाखा हा क्रम ठेवून जिल्हा, तालुका, ग्राम पातळीवर पदाधिकारी नियुक्त्या करून खूप मोठ्या प्रमाणात महिला संघटन केले. हे कार्य पाहून खा. तडससाहेबांनी विद्याताईंना विभागीय महिला अध्यक्षपद देऊन गौरविले. तैलिक महासभेच्यावतीने सामुदायिक विवाह, वधू-वर परिचय मेळावे, तसेच अंध, अपंग, घटस्फोटीत, परित्यक्ता, विधवा, विधुर परिचय मेळाव्यांचे आयोजन सुरू आहे.

हे सर्व कार्य करत असताना पर्यटनासारखा छंद जोपासला आहे. या सर्व कार्यात त्यांना त्यांच्या पतींची आणि त्यांचे थोरले बंधू शासकीय सेवेत असलेले अ‍ॅडीशनल कमीशनर अशोककुमार रणखांब आणि वहिनी सौ. सीमा यांची खंबीर साथ मिळते. आयुष्यात खूप मोठ्या संकटांवर मात करत ही कर्मयोगिनी नेहमी ‘तुझसे नाराज नही जिंदगी हैराण हू मै. तेरे मासूम सवालों पे परेशान हू मै’ हे गाणे गुणगुणते. महिलांनी विद्याताई एकच कानमंत्र देतात, कितीही दुःख झाले तरी वि. स. खांडेकरांचे एक वाक्य आठवा, भग्न स्वप्नांच्या तुकड्यानां कवटाळण्यासाठी मनुष्य जन्माला येत नाही तर त्याच तुकड्यावरून त्याला रक्ताळलेल्या पावलांनी दुसर्‍या स्वप्नांच्यामागे धावायचं असतं.

प्राप्त पुरस्कार * राज्यस्तरीय छ. राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार * राज्यस्तरीय पुणे येथे माँ कर्मादेवी सामाजिक बांधिलकी महिला पुरस्कार * जिल्हास्तरीय छत्रपती पुरस्काराने सन्मानित * राहुरी नगर परिषद व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सन 2017 च्या महिला सबलीकरणाचे अतिउत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित * सी 24 तास या वृत्तवाहिनीमार्फत जिल्हास्तरीय आजची नवदुर्गा या पुरस्काराने सन्मानित करून दुर्गा आली घरा या एक तासाच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण * राज्यस्तरीय रसिक रंजन पुरस्काराने सन्मानीत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!