अहमदनगर (कर्मयोगिनी) : डॉ. वंदना ज्ञानेश्‍वर मुरकुटे- ग्रामीण समाजाच्या सेवेचा वसा !

0

सदस्या, पंचायत समिती श्रीरामपूर
शिक्षण – एम.ए., एम्फिल, पीएचडी.
कार्य – साहित्य, शिक्षण, राजकारण, समाजसेवा या सर्व क्षेत्रांत वावर. गट : समाजकारण  

पंचायत समिती सदस्य म्हणून समाजकारण व राजकारणाचे काम करण्याची संधी डॉ.वंदना मुरकुटे यांना मिळालीे. शैक्षणिक, सामाजिक कार्यातही त्या कार्यरत आहेत. आज ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेचे, अडलेल्या, अडाणी समाजाची आपल्या हातून सेवा घडावी, असा त्यांचा मानस आहे. त्यासाठी लेखनासारखा प्रांतही त्या लिलया हाताळतात. साहित्याचा ध्यास घेऊन संशोधन कार्य करीत महिलांच्या सबलीकरणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नवमार्ग हाताळण्याचे कार्य त्या करत आहेत.

ग्रामीण समाजाला साहित्यलेखातून शिक्षण देणे, प्रबोधन करणे हे वंदनाताई यांचे कार्य. साहित्य हा समाजजीवनाचा आरसा असतो. अशा साहित्याची त्यांना बालपणापासूनच आवड आहे. साहित्य, शिक्षण, धर्मकारण, राजाकरण यांची मूलत: आवड आहे. मालेगाव हे त्यांचे माहेरघर. अर्थात संस्कारांचे मंदिर! त्यांचे वडील कै. रामचंद्र गोविंदराव पाटील समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते. वाचन, लेखन आणि जीवनचिंतनाचे आदर्श धडे घेऊन श्रीरामपूरला सासरी आल्यावर श्री. ज्ञानेश्‍वर भानुदास मुरकुटे यांच्या सोबत संसार करीत असताना शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक संस्कार जपले. एवढेच नव्हे तर ते वाढविण्यासाठी कृतिशील राहिल्या. लग्नानंतरही वाचन, लेखन, शिक्षण, संशोधन यात खंड पडू दिला नाही. एमए, एमफिल, पीएचडी या पदव्या संपादन केल्या.

वंदनाताईंनी सराला बेटाचे योगिराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज हे संत गुरु-शिष्य परंपरा सांगणारे पुस्तक लिहिले. 200 वर्षांचा मौखिक इतिहास प्रथमच लिखित स्वरूपात आणला गेला. प्रथम आवृत्ती अवघ्या चार दिवसांत संपली. ते सर्वाधिक वाचनीय पुस्तक ठरले. त्या पुस्तकाला देवाच्या देव्हार्‍यात व माणसाच्या मनात जागा मिळाली.

महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामींच्या डोमेगाव येथील वास्तव्यावरील डोमेग्राम माहात्म्य या काव्यग्रंथाचा चिकित्सक अभ्यास करुन रा. ब. ना. बोरावके महाविद्यालयातील पहिली एमफिलच्या त्या विद्यार्थिनी ठरल्या. महानुभावाचे प्रथम आचार्य श्री. नागदेवाचार्य यांच्या जीवनातील स्मृतिस्थळांच्या पाठभेदाचा अभ्यास केला. त्यावर अनेक लेख लिहिले, व्याख्याने दिली. ठराविक लेखकांच्या ग्रामीण कथांतील ’स्त्री प्रतिमांचा अभ्यास’ या विषयावर विद्यावाचस्पती पदवी मिळविली व ग्रामीण साहित्याबरोबरच ग्रामीण स्त्रीचा जवळून अभ्यास केला. त्यामुळे ग्रामीण साहित्यावर व स्त्री जीवनावर त्या ओघवत्या शैलीने व्याख्याने देऊ शकतात.

‘साहित्यशिल्पफ नावाचे पुस्तक संपादित केले. वर्तमानपत्रात लेख, प्रवासवर्णने लिहिली. वंदनाताईंना अनेक ठिकाणी व्याख्यानांना आमंत्रित केले जाते. त्यातून शैक्षणिक प्रबोधनाबरोबरच ग्रामीण समजाचे, साहित्य लेखनातून कसे प्रबोधन करता येईल याबाबत त्या चिंतनशील असतात. वंदनाताईंनी 2006 सालापासून बचतगटांची स्थापना करण्यास सुरुवात केली. अनेक महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले. माउली प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत समाजप्रबोधनपर, शिबिर, रोगनिदान शिबिरांसारखे अनेक कार्यक्रम त्या घेत असतात.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच गावात ज्ञानगंगा आणण्यासाठी 2013 साली प्राईड अ‍ॅकॅडमी, इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचे ध्येय डॉ. वंदनाताईंनी ठेवले आहे. 2017 साली टाकळीभान गटातून पंचायत समितीसाठी सर्वाधिक मतांनी डॉ. वंदनाताई निवडून आल्या. गोरगरीब जनतेचे, अडलेल्या, अडाणी समाजाचे वाली बनून त्यांचा राजकीय प्रवास जोमाने सुरू आहे.

साहित्याचा ध्यास असणार्‍या, संवेदनशील मनाच्या, संशोधन कार्य करीत, महिलांच्या सबलीकरणासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी झटणार्‍या, तरीही राजकीय प्रवास तात्त्विक दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणार्‍या डॉ. वंदनाताई मुरकुटे आपल्या अनेक कार्यांनी समाजाच्या आदर्श बनल्या आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून काम करीत असतानाच समाजसेवा, ग्रामीण भागातील लोकांसाठी शैक्षणिक उपक्रम, साहित्य लेखन आदी विविधांगी पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडले आहेत. त्यांनी समाज उन्नतीसाठी सर्व क्षेत्रांत आपले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. लेखन, राजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रांतून समाजसेवेचे कार्य त्या अविरतपणे करीत आहेत.

LEAVE A REPLY

*