अहमदनगर (कर्मयोगिनी) : उषाताई दीपक देशमुख – संघर्षशील, जिद्दी प्रवास !

0

अहमदनगर
कार्य- शिक्षिका म्हणून सुरूवात. उद्योगात यशस्वी भरारी. शिक्षण संकुलाच्या यशस्वी संस्थापक व मार्गदर्शक. गट : कला व संस्कृती

जीवन अनेकदा तुमची परीक्षा घेत, तुम्हाला सिद्ध करण्याची संधी देते. संकटात डगडगलो तर संपण्याचा धोका असतोच. पण या संकटांना समर्थपणे तोंड दिले तर आयुष्य पुन्हा नव्या वळणावर आणता येते…. उषाताई देशमुख यांचा संषर्घ हेच सांगतो. पतीच्या निधनानंतर अभियांत्रिकीशी पुसटसाही संबंध नसलेल्या ताईंनी ‘डी.एस.इंजिनिअर्स’ ही संस्था केवळ सांभाळलीच नाही तर यशस्वीही करून दाखविली. ‘गॅलक्सी नॅशनल स्कूल’ची स्थापना करून नव्या आकाशाला गवसणी घातली. त्यांचा हा थरारक, जिद्दी प्रवास !

उषाताईचे बालपण व शिक्षण कोल्हापुरात झाले. वडील पद्माकर कुलकर्णी हे खासगी नोकरदार. कसं जगावं आणि प्रचंड पॉझिटीव्ह असलेल्या कुलकर्णी कुटुंबात लहानच्या मोठ्या होताना प्रत्येक गोष्टीतील वाईट सोडून चांगले घेण्याची सवय त्यांना लागली. कोल्हापूरच्या गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजात असताना त्यांनी एनसीसीत आपलं नाव गाजवलं. दिल्लीत होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये त्यांनी राज्याचे दोनदा प्रतिनिधीत्व केले. नव्हे ते सिध्द करत ‘बेस्ट कॅडेट’चा किताबही पटकाविला. बी.पी.एड.चे शिक्षण पूर्ण करताना विद्यापीठात पहिल्या आलेल्या उषाताई गोल्ड मेडलच्या मानकरीही ठरल्या. कोल्हापूरच्या लाल मातीतील प्रचंड जिद्दी अन् बुध्दीच्या जोरावर कर्तृत्व सिध्द करणार्‍या उषाताईंचे कुटुंब नोकरीनिमित्त नगरला आले.

केडगाव परिसरात राहणार्‍या उषाताई कन्या विद्या मंदिरात आपल्या भविष्याच्या स्वप्नासह नोकरीसाठी दाखल झाल्या होत्या. पुढे चौपाटी कारंजा येथे राहण्यास देशमुखांशेजारी त्यांचा रहिवास आला. याच देशमुख कुटुंबाच्या त्या सूनबाई झाल्या. पती दीपक त्याकाळी आयआयटीचे शिक्षण घेणारे नगरमधील दुसरेच स्कॉलर! स्वत:ची पुस्तके विकून आणि वडिलांनी दिलेले काही असे अडीच हजार रुपयांवर डी.एस.इंजिनिअर्स वर्कशॉपचे स्वप्न त्यांनी विणले. ज्ञान, बुध्दिमत्ता अन् सचोटीच्या जोरावर ते नावारुपाला आणले.

आयुष्य सुरळीत सुरू असताना उषाताईंवर 2001 मध्ये काळाने आघात केला. पती दीपक देशमुख यांचे आजारपणामुळे निधन झाले. मुलगा सम्राट त्यावेळी अकरावीत तर मुलगी सोनल एम.डी.चे शिक्षण घेत होती. इंजिनिअर्सचा गंधही नाही. मात्र उषाताई डगमगल्या नाहीत. झपाटून, जिद्दीने नव्या लढाईसाठी सज्ज झाल्या. पतीने कष्टाने, रक्ताचं पाणी करून उभारलेले वर्कशॉप मुलाच्या हाती सोपविण्यापर्यंत सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. पती दीपकरावांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतलेल्या उषाताई अस्थिविसर्जनानंतर थेट वर्कशॉपमध्ये धडकल्या. फॅक्टरीमुळे त्यावेळी 80 कुटुंबाच्या चुली पेटत होत्या. त्या चुली बंद पडू नयेत हा उद्देशही होताच.

फॅक्टरीचा डोलारा त्यांनी सांभाळलाच नाही तर त्याचा विस्तारही केला. दरम्यान मुलगा सम्राट इंजिनिअरींगचे शिक्षण पूर्ण करत होता. मुलगी सोनल अन् मुलगा सम्राट यांचे ‘दोनाचे चार’ करण्याची जबाबदारी पार पाडत उषाताईंनी स्वत:ला सिध्द केले. फॅक्टरीसंदर्भात जुन्या पत्रव्यवहाराचा संदर्भ घेत त्यांनी आपला जम बसविला. सकाळी 8 वाजता स्वत: कार डाईव्ह करत घराबाहेर पडलेल्या उषाताई पहाटे अडीच वाजता घरात पोहचायच्या. रस्त्यात कोणी अडविलं तर त्यांच्याशी दोन हात करण्याची तयारी म्हणून त्यांच्या कारमध्ये ‘टॉमी’ असायची. उषाताईंनी दहा वर्षे प्रचंड मेहनत केली. दहा वर्षांच्या अथक परिश्रमानंतर सांभाळलेली फॅक्टरी मुलगा सम्राटच्या हवाली करण्याचा निर्णय घेत उषाताईंनी निवृत्ती जाहीर केली.

सम्राटच्या हाती फॅक्टरीच्या चाव्या सुपूर्द केल्यानंतर उषाताई गप्प बसल्या नाहीत. वडगाव गुप्ता परिसरात त्यांनी ‘गॅलक्सी नॅशनल स्कूल’ सुरू केलं. सूनबाई देविका त्यांच्या मदतीला आल्या. दोघींनी मिळून शिक्षण संस्थेचा डोलारा उभारला, पुढे नेला. सीबीएसईचे शिक्षण देणारी ‘नो स्कूल बॅग, नो टिफीन’ धोरण ठेवून गॅलक्सीची वाटचाल आभाळाच्या दिशेने सुरू आहे. मनात जिद्द असली की अशक्य काहीच नसते. साद दिली की प्रतिसाद मिळतो. वाईट सोडून चांगले घेतले तर यश मिळतेच यावर विश्‍वास असणार्‍या उषाताईंचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.

LEAVE A REPLY

*