Type to search

कर्मयोगिनी- (सौ. स्मिता बाळासाहेब देशपांडे) जिभेवरची चव ओळखणार्‍या स्मिता देशपांडे

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (सौ. स्मिता बाळासाहेब देशपांडे) जिभेवरची चव ओळखणार्‍या स्मिता देशपांडे

Share

सौ. स्मिता बाळासाहेब देशपांडे

  • गट- उद्योजक
  • शिक्षण – डी. फार्मसी. बी. एस्सी. शेवगाव
  • संचालिका- सिद्धिविनायक मसाले

फावल्या वेळेत काहीतरी केले पाहिजे, असा विचार आला. तिन मैत्रीणी एकत्र आल्या, काय करायचे यावर चर्चाचर्वित झाले, मसाल्याचे माहेर घर असलेल्या आपल्या देशात मसालेचाच व्यवसाय करण्याचे ठरले. त्यावर एकमुखी निर्णय घेत शिक्कामोर्तब केले. सुरुवातीला शेवगावपुरती मर्यादित असलेली बाजारपेठ आता सातासमुद्रापार गेली. अमेरिका, इग्लंड, आयर्लंड, नेदरलँड आदी ठिकाणी या मसल्यांना आता मागणी होत आहे.

बीड जिल्ह्यातील जन्म असलेल्या व सध्या शेवगाव येथे सासरी असलेल्या स्मिता देशपांडे आपल्या व्यवसायाबद्दल सांगत होत्या. त्यांचे शिक्षण बीडमध्ये झाले. उच्च शिक्षित कुटुंबाचा वारसा असलेल्या स्मिता यांचे वडील बँकिंग क्षेत्रात उच्चपदस्थ अधिकारी. इंजिनिअर असलेला भाऊ परदेशात सेवेत आहे. व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या पतीशी त्यांचा विवाह झाला. सासरचे कुटुंब देखील उच्च शिक्षित आहे. मात्र पतीशी संवाद साधत असताना त्यांना उद्योगाचे बाळकडू मिळाले. या क्षेत्रात आपण फावल्या वेळेत काही तरी काम केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. कामात गुंतून रहावे म्हणून त्या तिन मैत्रिणी एकत्र आल्या आणि उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले. परिश्रम, आत्मविश्वास या बळावर तिघींचे हे पाऊल लक्ष्मीचे पाऊल ठरले. मैत्रिणी अंजली कुलकर्णी व सौ. माधुरी पाटील यांच्यासह त्यांनी चटकदार मसाले तयार करण्याचा अभ्यासपूर्ण विचार केला.

भारत मसाल्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. इतिहाससुद्धा याचा साक्षीदार आहे. वास्को-द-गामा संपूर्ण युरोप आणि महासागरांना वळसा घालून भारताचा शोध घेत आला होता, ते देखील भारतीय मसाल्यांच्या चवीपोटीच. इतिहासकाळापासून आजपर्यंत भारतातील मसाल्यांना जागतिक बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतीय मसाल्यांची चव, त्यांचा गंध व गुणवत्ता हे अव्वल दर्जाचे आहेत आणि त्याचमुळे जागतिक बाजारपेठेत हजारो वर्षांपासून आपल्या मसाल्यांना चांगली मागणी आहे. भारतीय बाजारपेठ मसाला उद्योगासाठी जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारत मसाला उत्पादन आणि निर्यात यामध्ये अग्रेसर आहे. नानाविध खाण्याच्या संस्कृती आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यानुसार त्यांचे मसालेसुद्धा.

आपल्याकडे जेवणात मसाल्यांचा वापर हा केवळ चवीसाठी होत नाही, तर काही मसाले हे औषधी गुणधर्माचेही असतात. त्यांचा वापरही औषधी म्हणून केला जातो. मसाला उद्योगाला म्हणूनच भारतीय बाजारपेठेत खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या सर्व गोष्टींची आम्ही कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. आम्हाला होकारा बरोबरच भक्कम पाठिंब्याचा आधार मिळाला.

आपल्या देशात या उद्योगासाठी आवश्यक सर्व प्रकारचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणार्‍यांसाठी चांगला पर्याय आहे. याच्यावरही आम्ही विचार केला. भारतीय मसाले प्रांतानुसार बदलत जातात. प्रत्येकाची स्वत:ची वेगळी चव असते आणि त्यानुसार ग्राहकही. सुरुवातीला व्यवसाय सुरू करताना घरगुती स्वरूपात गृहउद्योग म्हणून या तीन रणरागिणींनी सुरुवात केली. मसाले तयार करताना सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे मसाल्याची चव कळणे गरजेचं आहे, हे त्यांनी हेरले. आपल्या नातेवाईक, शेजारीपाजारी या संभाव्य ग्राहकांपासून आपली सुरुवात केली.

हा इतिहास व लज्जतदार पदार्थांमधील मसाल्याचे महत्त्व लक्षात घेऊन जेवणात अत्यावश्यक गोष्ट असलेला मसाला करायचे ठरवले. घरगुती व पारंपरिक पद्धतीचे मसाले ग्राहकांना द्यायचे ठरले. 18 जुलै 2015 रोजी पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून मसाला उत्पादनास सुरुवात केली. या मसाल्याला सिद्धिविनायक मसाले नाव दिले. मसाला उद्योग सुरू करताना धने, मिरची पावडर आणि काळा मसाला बनविणे सुरू केले. पतीने दिलेल्या सूचनेनुसार आकर्षक पॅकिंग, संपर्क क्रमांक, बचत गटाचे स्टिकर लावले. त्यातून विक्रीत सुधारणा झाली. पॅकिंगवर संपर्क क्रमांक असल्याने अनेकजण मोबाईलवरून मागणी करू लागले.

मालाची गुणवत्ता टिकून राहण्यासाठी एका दिवसात एकच प्रकारचा मसाला तयार करण्याचे ठरविले. प्रथम शेवगाव शहरात ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर हळूहळू शेवगावबाहेर बाजारपेठ मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी ओळखीच्यांची मदत घेतली. मैत्रिणी, नातेवाईक, परिचित मंडळींना अगोदर चव दिली. एकदा चव घेतलेला ग्राहक परत जात नाही, याची खात्री होऊ लागली. त्यामुळे आणखी प्रोत्साहन मिळाले. ग्राहकांची संख्या वाढत असली, तरी दर्जा ढळू द्यायचा नाही, यावर सर्वांचेच एकमत होते.

त्यामुळे मसाल्यांसाठी मागणी वाढू लागली. जसा काळ जाईल, तशी व्यवसायात वृद्धी होऊ लागली. प्रत्येक वर्षी काही लाख रुपयांची उलाढाल होऊ लागली. सिद्धिविनायक मसाले खूप आवडीने लोकांनी स्वीकारले. शेवगावपासून सुरू केलेला हा व्यवसाय वाढत वाढत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही गेला आहे. लंडन शहरासह आयर्लंड, नेदरलँड व अमेरिका या देशांत सिद्धिविनायक मसाले वापरले जाऊ लागले. तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांतूनही या मसाल्याला मागणी आहे. वेगवेगळे 18 प्रकारचे मसाले तयार करण्यात येत आहे.

वर म्हटल्याप्रमाणे दर्जा टिकवून हे सर्व करतो. कृत्रिम रंग व रसायनविरहित शंभर टक्के घरगुती मसाले मिळण्याचे हक्काचे ठिकाण आता झाले आहे. पारंपरिक पद्धतीने मसाला बनविला जात असून, कोणतेही अन्य घटक मिसळले जात नाहीत. त्यामुळे घरच्या मसाल्याचा खमंग येतो. गरम मसाला, चिकन, मटन, छोले, सांबर, चाट, सब्जी मसाला, पावभाजी मसाला, पापड मसाला, कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, गोडा मसाला तयार केला जातो. मसाला तयार करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री घेण्याचा आता विचार आहे. सध्या एका ग्राईंडर एजन्सीची मदत घेतो. पॅकेजिंग यंत्रणा त्यांची स्वतःची आहे.

मागील काही वर्षांपासून स्मिता देशपांडे यांचा एक महिला बचत गट कार्यरत आहे. भविष्यात गरजू महिला भगिनींना रोजगार मिळावा व समाजकार्याचा खारीचा वाटा उचलण्याचा यामाध्यमातून प्रयत्न आहे. व्यवसायातून मिळणार्‍या नफ्याचा काही भाग गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गरजूंना सण-उत्सवाच्या वेळी किराणा माल देण्यासाठी वापरतो. महिला एकत्र आल्या, अन ठरवले तर त्या नित्यपयोगी विविध गृह उत्पादनातून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करू शकतात, हा अनुभव या उद्योगातून आणि धाडसातून आला. भारतीय आहाराबाबत जागतिक पातळीवर कुतूहल, औत्सुक्य आहे. जागृती वाढली आहे. साहजिकच ही बाजारपेठ आपल्याला नक्की व्यापक करता येणार आहे. या व्यवसायात मंदी नाही, मात्र तेजी मोठ्या प्रमाणात दिसत नाही. हा व्यवसाय एका गतीने वाटचाल करत असतो. त्याला लोकांच्या जिभेवर कायमस्वरूपी उतरवणे हा आव्हानात्मक भाग असल्याचे स्मिता देशपांडे सांगतात.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!