अहमदनगर (कर्मयोगिनी) : श्‍वेता अश्‍विन गांधी – फॅशनविश्‍वाच्या ट्रेंडसेटर !

0

अहमदनगर
शिक्षण – एम.बी.ए.
कार्य – कपड्यांच्या नव्या ट्रेंड्सचा वेध घेणे हे खास कौशल्य. वस्त्रांच्या माध्यमातून ग्राहकांचे व्यक्तीमत्व खुलावे यासाठी प्रयत्न. यशस्वी नवउद्योजिका. गट : उद्योग-व्यवसाय 

माहेर अन् सासर अशी दोन्ही कुटुंबे व्यवसायात स्थिरावलेली असली तरी स्वत:च अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करणार्‍या श्‍वेताताई आज नव्या वळणावर येऊन ठेपल्या आहेत. कापड व्यवसाय हा कौटुंबीक व्यवसाय नव्या अंगाने हाताळत त्यांनी ‘निनाज्’ची संकल्पना मांडली. डिझायनर कपडे कुणाला आवडत नाहीत. पण प्रत्येक ग्राहकाच्या आवाक्यात ते असतात कुठे? याच प्रश्‍नाच्या उत्तरासाठी त्यांचा हा खटाटोप. व्यवसायातील नव्या संधी शोधण्याची त्यांची उर्मी त्यांच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट करते.

फर्टीलायझर क्षेत्रात नावाजलेल्या झंवर कुटुंबातील ग्यानकुमार झंवर यांची श्‍वेता या धाकट्या कन्या. झंवर कुटुंब हे प्रगत कुटुंब. आजी श्रीरंगाबाई त्याकाळची चौथी शिकलेल्या. तर आजोबा मदनलालजी हे स्वातंत्र्य सैनिक. शिक्षणाला प्राधान्य ही झंवर कुटुंबाची आखणी एक खासीयत! श्‍वेताताई नगर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अहमदनगरच्या प्रतिष्ठीत आणि नावाजलेल्या ‘कोहिनूर’च्या गांधी कुटुंबातील अश्‍विन गांधी हे त्यांचे क्लासमेट. कालांतराने दोघे बेस्ट फ्रेंड झाले. पदवीनंतर अश्‍विन एमबीए करण्यासाठी लंडनला गेले तर श्‍वेताताईंनी नगरमध्येच एमबीए पूर्ण केले. शिक्षणानंतर श्‍वेताताईंच्या ‘मंगनी’चा प्रस्ताव अश्‍विन यांनी वडील प्रदीपशेठ गांधींसमोर मांडला. हा प्रस्ताव चर्चेअंती दोन्ही कुटुंबांनी स्वीकारला. त्यानंतर श्‍वेता झंवर या गांधी कुटुंबाच्या सूनबाई झाल्या. आणि जीवनात श्‍वेता अश्‍विन गांधी या नावाने नवा प्रवासही सुरू झाला.

घरातच व्यवसायाचे धडे गिरवलेले असल्याने त्याचा वापर करत त्या ‘कोहिनूर’ मध्ये सक्रिय झाल्या. आजेसासरे वसंतलाल व सासूबाई नीता यांनी श्‍वेताताईंमधील कलागुणांची पारख करून त्याला वाव मिळावा यासाठी पाठबळ दिले. पती अश्‍विन हे तर कायमच पाठिशी. ’मी तुझ्यासोबत आहे’ या शब्दातील त्यांचे प्रोत्साहन कायम उभारी देणारे ठरले, असे ताईंचे मत! लहानपणापासूनच कलेचे आकर्षण अन् एमबीए झाल्याने स्वत:चा वेगळा ठसा उमटविण्याचे त्यांच्या मनात होते. बरोबरचं ‘नगरच्या महिलांना हवं ते द्यावं’ त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मुंबई-पुण्याला होणारी वारी थांबवावी, हे डोळ्यासमोर ठेवून मग ‘निनाज फॅशन डिझाईन’या खास महिलांसाठी असलेले नवे वस्त्र दालन आकाराला आले. नगरचा ग्राहक चोखंदळ आहे. तो दरवेळी पुणे-मुंबई येथे जाऊ शकत नाही. त्यासाठी श्‍वेताताईंनी नगरमध्येच ‘निनाज’ द्वारे ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून दिला. नगरमधील ग्राहकाला काय हवे हे निरीक्षण आणि अभ्यासातून श्‍वेताताईंनी हेरले होते.

लोकांच्या अभिरूची त्यांनी जाणल्या आणि त्याचा फायदा निनाज्च्या जडणघडणीत झाला. ‘कोहीनूर’मध्ये जागा अपुरी असल्याने सावेडी उपनगरात ‘निनाज्’ सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अश्‍विन तर खंबीरपणे त्यांच्या मागे होतेच. देशभरातील ब्रॅण्ड निनाज्मध्ये महिलांसाठी उपलब्ध करून दिले गेले. महिलांची चोखंदळ पसंती लक्षात घेऊन श्‍वेताताई त्याप्रमाणे स्वतःच्या स्टुडिओमध्ये वस्त्रे उपलब्ध करून देतात. हा प्रवास सोपा नाही. एकतर आधीच या व्यवसायातील यश कोहिनूरच्या निमित्ताने कुटुंबाने पाहिले आहे. त्यामुळे नवे काही करायचे तर प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक टाकावे लागते. सोबतच नगरची फॅशन ट्रेंड जगासोबत राहावी, अशी त्यांची इच्छा. त्यायोगे आपल्या शहराला व्यवसायातून नवा लूक देण्याचा त्यांचा मानस.

महिलांनी आत्मनिर्भर व्हावे, असा विचार त्या बोलून दाखवितात. याच विचारातून त्यांचा प्रवास सुरू आहे. या प्रवासाला घरातून मिळालेले बळ मोलाचे ठरले. म्हणूनच त्या व्यावसायिक म्हणून स्वत:ची नवी ओळख तयार करू शकल्या. प्रत्येक तरुणीला आयुष्यात अशी संधी मिळावी, अशी कामना बाळगणार्‍या श्‍वेता नव्या पिढीच्या व्यावसायिक आहेत. फॅशनला नवी दिशा देण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद ठरतो!

LEAVE A REPLY

*