Type to search

कर्मयोगिनी- (शोभाताई पोपटराव पवार )आदर्श गावच्या उपक्रमशील शिक्षिका

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (शोभाताई पोपटराव पवार )आदर्श गावच्या उपक्रमशील शिक्षिका

Share

शोभाताई पोपटराव पवार

  • शिक्षण – डीएड
  • गट- शिक्षण
प्राथमिक, माध्यमिकसह पुढील सर्व शिक्षण घेताना झालेली तारेवरची कसरत, त्यासाठी केलेल्या तडजोडी यातून एका उपक्रमशील शिक्षिकेचा जन्म झाला. या शिक्षिकेला राज्यात आदर्श असलेल्या हिवरे बाजार या गावी शिक्षणदान करण्याची संधी मिळाली. त्यामुळे उपक्रमशीलता वाढत गेली. त्याचा फायदा ज्या ज्या गावी त्या शिक्षिका म्हणून गेल्या, तेथे झाला. अशा आदर्श असलेल्या शोभाताई पवार आजही शिक्षण क्षेत्राबाबत प्रचंड आशावादी आहेत.

आज ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती पहिली तर आमच्या पेक्षा नक्कीच खूप चांगली आहे. जागरूक पालकवर्ग व शिक्षणाच्या सुविधा आज ग्रामीण भागात पाहायला मिळतात. आमच्या वेळेस अशा सुविधा नव्हत्या. माझे वडील आमच्या गावातले पहिल्या पदवीधर व्यक्ती आहेत. परंतु सैन्यात काम करण्याची आवड असल्याने ते भरती झाले. त्यामुळे आम्हा चौघा बहीण भावडांचा जन्म राजधानी दिल्लीत झाला. परंतु सेवानिवृत्तीनंतर वडील गावी स्थायिक झाले. हिवरेबाजार गावच्या प्राथमिक शाळेत 1978 ला पहिली मध्ये प्रवेश घेतला.

त्यावेळी दोन खोल्यांची पडकी गळकी शाळा, शाळेच्या वर्‍हांड्यात चिमण्यांची घरटी असायाची. त्यामुळे अनेकदा सापाचे दर्शन शाळेत व्हायचे. खाली सारवण असायचे. दर शनिवारी विद्यार्थी शेण आणायचे, मुलींनी अर्धा किलोमीटर दूर असलेल्या बारवेतून पाणी आणायचे. त्या दिवशी आपोआपच दप्तरमुक्त शाळा असायची. शाळेसमोर क्रीडांगण, बाजूला पडकी घरे व त्याच्या बाजूला दारूची दुकाने. शाळेला गणवेश नसायचाच, स्वच्छतेचा तर लवलेशही नव्हता.

वडील सेवानिवृत्तीनंतर भारत संचार निगममध्ये रुजू झाले. त्यामुळे इतर मुलांना जी उणीव भासायची, ती शैक्षणिक साहित्य, दप्तर, गणवेश याची ती कधीच भासली नाही. 1982 ला चौथी पास झाल्यानंतर पुढील शिक्षणाची सोय गावात नव्हती. पाच किलोमिटर अंतरावर टाकळी येथील हनुमान विद्यालयात प्रवेश घेतला. अंतर लांब, जाण्यायेण्याची सोय नाही, चांगेल रस्ते नव्हते, लोकवस्ती कमी, पावसाच्या दिवसांत तर चार पाच ओढ्यांना पूर यायचा. त्यामुळे चौथीला असलेल्या मुलींची संख्या आठवरून पाचवीला ती दोनवर आली. हनुमान विद्यालयात शिकतांना मुख्याध्यापक श्री. खैरे सर, एस. टी. पादीर सर, सातपुते सर, कवडे सर, अशा अनेकांनी आमच्यावर चांगले संस्कार केले. त्यांची शिस्त कडक असल्याने मुलींसाठी खूपच सुरक्षित वातावरण होते.

त्याच शाळेत नववीपर्यंत शिक्षण घेतले. हायस्कूलमध्ये 10 वीचे जास्तीचे तास कुठलेही शुल्क न घेता घेतले जायचे. त्याची वेळ सकाळी 8 ते 10 व संध्याकाळी 6 ते 8 अशी असायची. मग राहायचे कुठे असा प्रश्‍न निर्माण झाला. यामुळे शाळा सोडावी लागते का, अशी भीती निर्माण झाली. त्यातच 9वी पर्यंत माझ्या सोबत ये जा करणार्‍या मैत्रिणींनी शाळा सोडली. एकटीने कसे ये जा करायचे म्हणून आईने शाळा सोडण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी एका मैत्रिणीचे वडील तेथील मराठी शाळेत शिक्षक होते. ते नातेवाईक पण होते. त्यांनी अडचण समजून घेत त्यांच्याकडे राहण्याचे सुचविले. वर्षभर त्यांच्याकडे राहिले. पुढील शिक्षणासाठी 11वीला नगरला न्यू आर्ट्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथेही जवळच्या नातेवाईकांकडे राहुन शिक्षण पूर्ण केले.

12वी नंतर माझा डीएडला नंबर लागला तो औरंगाबादला. आईवडिलांनी परगावी शिक्षणासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. 1992 ला डीएड पूर्ण झाल्यानंतर गावी परतले. त्याचवेळी हिवरेबाजारच्या विकासाचे पर्व सुरू झाले होते. सरपंच पोपटराव पवार यांच्या सोबत आबालवृद्ध श्रमदान करत होते. मोठा भाऊ त्यांच्या सोबतच असायचा. हिवरेबाजारच्या विकासाची सुरूवात शाळेपासून झाली. अनेक ग्रामस्थांनी शाळेसाठी जागा बक्षीसपत्र करून दिल्या. शाळेला मोठे क्रीडांगण तयार करण्यासाठी, नवीन काही खोल्या बांधण्यासाठी पडक्या घरांचे दगड सर्वांनी उचलले. अशातच चौथीपर्यंतच्या शाळेला 5, 6, 7 चे वर्ग जोडण्याला परवानगी मिळली. शिक्षक मात्र नव्हते. त्यामुळे गावातील नवीन डीएड झालेल्या मुलांनी वर्षभर 5 वी ते 7 वीच्या वर्गांना अध्यापन केले. प्रथमच शिक्षकांची तालुकास्तरीय कार्यशाळा झाली.

त्यावेळेसच्या शिक्षणाधिकारी सुमनताई देशमाने व जगन्नाथ पाटील दळवी कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित होते.
4 डिसेंबर 1998 ला पोपटराव पवार यांच्याशी विवाह झाला. सासर माहेर गावातच. पोपटराव समाजसुधारक असल्याने घराकडे अजिबात लक्ष नसायचे. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी मोठी होती. जिल्हा निवड मंडाळाच्या निवड चाचणीतून जून 1995 ला शिक्षिका म्हणून बेल पिंपळगाव (ता. नेवसा) येथे शोभाताई हजर झाल्या. तेथून 2001 साली हिवरे बाजार येथे गावकर्‍यांच्या आग्रहास्तव बदली झाली. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सहदेव पवार, पदवीधर शिक्षक म्हणून रो. ना. पादीर व इतर सर्व कार्यक्षम शिक्षक होते.

या शाळेत मला संधी मिळाली. गावाने प्रथमच संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानात भाग घेतला होता. अभियानाची तयारी करण्यासाठी गावकरी महिला व शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आपापल्या परीने प्रयत्न करत होते. त्यावेळी प्रत्येक घराघरात जाऊन स्वच्छतेेचे संदेश, घरातील वस्तूंची योग्य मांडणी, ओल्या सुक्या कचर्‍याचे व्यवस्थापन, वैयक्तिक स्वच्छता अशा अनेक बाबीविषयी जनजागृती करावी लागायची. सकाळी 7 वाजता घरातून निघलेले सर्व शिक्षक रात्री 11 वाजता ग्रामसभेनंतरच घरी जायचो. त्यावेळी गावचा जिल्ह्यात प्रथम व विभागात दुसरा क्रमांक आला. त्यानंतर 2007 साली याच अभियानात गावाने राज्यात पहिला नंबर मिळवला. हिवरेबाजारमध्ये नोकरी करत असताना अनेक नवनवीन प्रयोग पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले. त्यामध्ये रानमेवा अभियान, पाण्याचा ताळेबंद, व्यसनमुक्ती अभियान, बालवृक्षमित्र पुरस्कार, स्काऊट आणि गाईड, बालमित्र सहकारी स्टेशनरी, ज्ञानकी वाचनालय असे उपक्रम शाळेत सुरू झाले.

पोपटराव पवार विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतभर फिरतात. प्रत्येक ठिकाणी एखादी चांगली गोष्ट पाहिली कि ती आपल्या गावात व शाळेत असावी असे त्यांना वाटते. तो उपक्रम राबवतांना सुरुवातीला आम्हाला त्रासदायक वाटायचा, पण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केल्यानंतर तो आनंदात राबवला जायचा. पुढे तर याची सवयच होऊन गेली. शाळेसाठी जास्त वेळ द्यावा लागायचा. कामाचा ताण आणि नवनवीन अभ्यासपूरक व संस्कारपूरक उपक्रम यामुळे प्रत्येक बदलीच्या वेळी हिवरेबाजार शेवटी रहायचे. शिक्षक पुरेशे मिळत नसायचे. अनेक वेळा 5 किंवा 6 शिक्षकाने 7 वी पर्यतचे वर्ग सक्षमपणे चालवले. ग्रामशिक्षण समिती, मातापालक व शिक्षक पालक यांच्या नियमित बैठका होतात. व्यवस्थापन समिती शाळेच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्षम आहेत. तंत्रज्ञान किती पुढे गेले तरी त्याला संस्काराची जोड असावी लागते. असे संस्कारक्षम शिक्षण या शाळेत दिले जाते.

पोपटराव पवार राज्याच्या आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्यावर खूप मोठी सामाजिक जबाबदारी आहे. त्यांच्या सोबत काम करत असतांना शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यात शोभाताई यांची बदली बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथे झाली. याच अनुभवातून आज ज्या शाळेत काम करतात तेथे विविध उपक्रम सुरू केले. लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला. काम करत असतांना मुलींच्या शिक्षणात अडचणी असतील तर त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. हिवरेबाजार गावाला रोज 400 ते 500 लोक भेटायला येतात. त्या लोकांचे मनोगत मुलांना ऐकायला मिळते. शिक्षणातून नोकरी मिळाली नाही, तरी चालेल पण कुटुंबाचा, गावाचा व देशाचा आधार होणारा नागरिक तयार होईल, असा विश्‍वास पालक वर्गाला वाटतो. उपक्रमशील व सर्व सोयींनी दर्जेदार शिक्षणासाठी गावाने पुढाकार घेतला तर हिवरेबाजार पेक्षा चांगल्या शाळा नक्कीच गावोगावी पाहायला मिळतील, असा विश्‍वास शोभाताई यांना आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!