Type to search

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (सौ. शांताबाई खंडू धांडे) परसबागेच्या वाटेने विषमुक्त शेतीचा गाठला टप्पा

Share

सौ. शांताबाई खंडू धांडे

  • आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर
  • गट-कृषी
  • देशी-गावरान बियाणे वापरून तयार केली परसबाग
  • शेतकरी, महिला, विद्यार्थी अभ्यासकांना परसबागेची माहिती
  • आदिवासी भागात त्यांच्या मार्गदर्शनाने सुमारे 2500 परसबागा उभारल्या
मानवी जीवनाचा आहार विविध विकासाच्या नावाखाली विषयुक्त बनत आहे. शेती रासायनिक खतांच्या आहारी गेली आहे. पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. अशावेळी मानवी जीवन अधिक आरोग्यसंपन्न होण्याच्या दृष्टीने अहोरात्र ध्यास घेऊन शेतीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बायफ सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्‍या संस्थेची नाते सांगत नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून, अवतीभोवती समस्यांचे डोंगर उभे असताना अकोले तालुक्यातील आंबेवंगणच्या शांताबाई खंडू धांडे यांनी केलेला शेतीतील प्रयोग हा दिशादर्शक ठरत आहे.

आदिवासी क्षेत्रात शेतीच्या माध्यमातून आपल्या नैसर्गिक परंपरेला सोबत घेऊन शेतीत निसर्ग शेतीचा प्रयोग करत तिने आपली पाऊलवाट चोखाळत शेती निसर्गाची संगत करून मानवी जीवन अधिक आरोग्यसंपन्न करण्याचा प्रयत्न केला आहे. शेती प्रयोग मानवी नात्यांची बांधिलकी आणि पर्यावरणाचे आपले नाते भक्कम करण्यासाठीची दिशा घेऊन काम करणार्‍या शांताबाई धांडे यांनी केलेल्या परसबागेचा प्रयोग सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेच्या मार्गदर्शनाने शांताबाई धांडे यांनी शेती फुलवली आहे. आपल्या आहारात मोठ्या प्रमाणात विषयुक्त अन्न जात आहे. मानवी जीवन त्यातून मोठ्या प्रमाणात बाधित होत आहे. खूप कमी वयात कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग यासारखे मोठे आजार जडताना दिसत आहेत. आपल्या आहार हा विषमुक्त कसा राहील याची चिंता सर्वांनाच लागलेली आहे. अशा परिस्थितीत शांताबाई धांडे यांनी परसबाग या विषयात केलेले कार्य जगाला नवीन दिशा दाखवत आहे.

पाणी, जमीन व संसाधने यांचा जास्त बाऊ न करता त्यांनी आपल्या घराभोवती उपलब्ध असलेल्या जागेचा कौशल्यपूर्ण उपयोग करुन घेत अतिशय सुंदर परसबाग फुलवली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अपुर्‍या साधनांचा सामना करत त्यांनी ही सेंद्रीय पध्दतीने परसबाग फुलवली आहे. त्यांच्याकडे हंगामी आणि बहुवर्षीय या दोन्ही पध्दतीने तयार केलेल्या परसबागा आहेत. हंगामी परसबागेत त्यांनी वांगी, टोमॅटो, मिरची, वाल, घोसाळी, दोडका, भेंडी, काकडी, खरबूज, दुधी भोपळा, डांगर भोपळा, तोंडली, कोथिंबीर, पालक, मेथी इत्यादी भाजीपाला पिके देशी वाण वापरून लागवड केलेली असते. विशेष म्हणजे त्यांनी जोपासना केलेले वेल व सर्वच भाजीपाला हा सेंद्रीय पध्दतीने पिकवलेला असतो. कुठल्याही प्रकारचे रासायनिक औषधे न वापरता त्या ही पिके घेतात. चुलीतील राख रस शोषण करणार्‍या किडींसाठी पिकांवर धुरळतात.

त्यामुळे मावा, फुलकिडे या रस शोषण करणार्‍या किडींचा बंदोबस्त केला जातो. पिकांना मोठ्या प्रमाणात गांडूळ खत व गांडूळ खताचे पाणी यांचा वापर करुन वाढवले जाते. संपूर्णपणे नैसर्गिक पध्दतीने वाढविलेले परसातील ही भाजीपाला पिके व उत्पादने त्या स्वत: घरी खाण्यासाठी वापरतात व जास्तीचा भाजीपाला जवळच्या आठवडे बाजारात विक्री करतात. आपल्या घराच्या भिंती, छत, अंगण, सर्वत्र विविध भाज्यांची त्या अतिशय नियोजनबध्द लागवड करतात. त्याचबरोबर बायफच्या माध्यमाने त्यांनी बहुवर्षीय परसबागही तयार केलेली आहे. पपई, शेवगा, हादगा, पेरू, लिंबू कढीपत्ता, सीताफळ, रामफळ, आवळा, आंबा, फणस, तोंडली, केळी, अंजीर, चिकू अशा नाना प्रकारची फळझाडे त्यांनी मेहनतीने उभी केली आहेत.

त्यांनी उभ्या केलेल्या परसबागेचा अभ्यास करण्यासाठी अध्यात्मक, विद्यार्थी, शास्त्रज्ञ, आदिवासी शेतकरी, बचत गटाच्या महिला, आजूबाजूच्या खेड्यातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने येतात. आतापर्यंत त्यांच्या बागेला हजारो अभ्यासक भेटी देवून गेले आहेत. त्यांच्या बागेचे मोठ्या प्रमाणात अनुकरणही होत आहे. त्यांनी आतापर्यंत हजारो शेतकर्‍यांना, महिलांना प्रेरीत करुन परिसरात हजारो परसबागा फुलविल्या आहेत. त्यांच्या बागेला गेल्या वर्षी अमेरिकेतून आलेल्या रेबेका डेरझेन्सकी यांनी भेट दिली होती. शांताबाई यांचे कार्य पाहून त्या भरावून गेल्या व कधीही पपई न खाणार्‍या रेबेका यांनी शांताबाईंनी दिलेली पपई अतिशय आवडीने खाल्ली. आयआयटीचे विद्यार्थी व प्राध्यापक हे देखील पपईचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्याकडे येतात. त्यांनी वाढवलेल्या परसबागेमुळे वर्षाला सुमारे 20-25 हजार रुपये किंमतीचा दर्जेदार सेंद्रीय भाजीपाला उत्पन्न होतो. मोठ्या प्रमाणात बचतही होते. त्यांनी तयार केलेली परसबाग सर्वांना आदर्श ठरत आहे.

दरवर्षी रोजगारासाठी होणारे हंगामी स्थलांतर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत हंगामी स्थलांतर थांबविण्याचे काम शांताबाई धांडे यांनी केले. सेंद्रीय खताचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून भाताची किफायतशीरपणे शेती केली. चार वर्षांपूर्वी सरासरी 20,000 रुपये वार्षिक उत्पन्न घेणार्‍या शांताबाईंनी तीन चार वर्षात आपल्या कुटुंबाचे उत्पन्न दुपटीने वाढविले व रोजगारासाठीची कुटुंबातील व्यक्तींची भटकंती थांबविली. 2014 ला एका स्वयंसेवी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय खताचा वापर करून सेंद्रीय भातशेतीचे प्रयोग सुरू केला. 8 एकर जिरायती, 6 एकर हंगामी बागायती जमीन वहितीखाली आणली. भाताचे गावरान वाण जतन केले.

बाएफ संस्थेकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे गांडूळ खत व गांडूळ खताचे पाणी हे सेंद्रीय भात शेतीला वापरण्यास सुरुवात केली. यामुळे काळभात, जिरवेल, रायवेल, ढऊळ, आंबेमोहर इत्यादी गावरान भात वाण बियाणे जतन केले. पूर्वी भात खाचरातून 20-22 क्विंटल भात साळ उत्पादित होत होती. आता हे उत्पादन दुपटीने वाढले आहे. पूर्वी भात शेती बरोबर नागली, उरई, उडीद, खुरासणी अशी पिके घेतली जात होती. आता भात शेतीमध्ये आले, टोमॅटो, झेंडूची व अस्टरची फुले इत्यादी उत्पादन घेण्यास सुरुवात केली. कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू केला. हे सर्व ज्ञान बाएफकडून घेतल्याचा परिणाम कुटुंब स्थिर होण्यास मदत झाली.

परस बागेचाही वापर सुरू करून त्यामध्ये 400 किलोपर्यन्त भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. त्यामुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला. परस बागेतून शाश्‍वतपणे उत्पन्न मिळविण्याची किमया साधली. पारंपरिक बियाणे संवर्धन समितीच्या शांताबाई सदस्य असून त्यातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांचे गावरान बियाणे जतन कार्य, परसबाग लागवड, शेतीतील नवे प्रयोग हे पाहण्यासाठी विद्यार्थी, संशोधक, कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी भेट देऊन माहिती घेत असतात. पाण्याची कमतरता असताना दगडांचे अच्छादन व सेंद्रीय खतांचा वापर करुन बाग जोपासण्याचे अनोखे तंत्रज्ञान त्यांनी जोपासले आहे, वर्षभर घरी खाण्यासाठी भाजीपाला कसा तयार करावा याचे उत्तम पारंपारिक ज्ञान त्यांच्याकडे आहे. घरच्या घरी बियाणे कशी तयार करावीत व त्यांची साठवणूक व वापर कसे करावे याचे उत्तम ज्ञान व अभ्यास त्यांचा आहे. सकस व सेंद्रीय आहार, अन्न घरच्या घरी निर्माण करण्याचे उत्तम उदाहरण त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून जगाला दाखवून दिले आहे. आदिवासी भागात त्यांच्या मार्गदर्शनाने सुमारे 2000-2500 परसबागा उभ्या राहिल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!