Type to search

Featured Karmayogini मुख्य बातम्या सार्वमत

कर्मयोगिनी (सौ. संज्योत अरविंद वैद्य) – आनंददायी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या

Share

सौ. संज्योत अरविंद वैद्य – संगमनेर, जिल्हा- अहमदनगर

शिक्षण-बी.एस्सी. (रसायनशास्त्र), मॉन्टेसरी कोर्स
अध्यक्षा- श्री. व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी, संगमनेर
संचालिका-स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल (सी. बी. एस. ई)
संचालिका- व्हिबगयोर करिअर अकॅडमी
संचालिका-ब्रेनेक्स मल्टीपल इंटलीजन्स
कार्य – शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रेसर.

मोठं स्वप्न पहावं आणि ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करावेत, या प्रयत्नांना यश यावे, हे यश हिमालयाएवढे व्हावे, यशानेच जीवनाचे अस्तित्व सिद्ध व्हावे, शिक्षण क्षेत्रात स्वकर्तृत्वावर यश संपादन केलेल्या सौ. संज्योत वैद्य यांनी ग्रामीण भागातील मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आनंददायी व प्रात्याक्षिकातून शिक्षण देण्यासाठी, मुलांना योग्य व जबाबदार नागरिक बनविण्याचे ध्येय उराशी बाळगले. संघर्षातून आज हेच त्यांचे ध्येय उंच उंच शिखरे सर करत आहे. ‘स्ट्रॉबेरी’ ची पताका राज्य, देश, परदेश पातळीवर डौलाने फडकते आहे.

पुणे-मुंबई-नाशिक या मोठ्या शहरांचा ‘सुवर्णमध्य’ असलेल्या संगमनेरमध्ये संज्योत वैद्य यांचे बालपण गेले. तेथेच शालेय शिक्षण झाले. बी.एस्सी पर्यंत शिक्षण झाले. अकोले येथील आर्किटेक्ट अरविंद वैद्य यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीसोबत आपण देखील काहीतरी करायला हवं, हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. तेव्हा ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि अकोलेसारख्या तालुक्याच्या छोट्या गावी पार्लर सुरू केले. पण त्या गावात दोघांचाही जम बसेना त्यामुळे गाव सोडत हे दाम्पत्य संगमनेरला आले, पुढे संगमनेरच त्यांची कर्मभूमी बनले.

पार्लरचा व्यवसाय वृध्दींगत होत असताना त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलीला शाळेत घालण्याची वेळ येऊ लागली. मोकळं वातावरण, आनंदी शिक्षण आणि प्रयोग-प्रात्याक्षिकातून दिले जाणारे विषयज्ञान मिळेल अशी आपल्या कल्पनेतील शाळा मिळवून देता येईल का? हे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. पतीकडे त्यांनी मनातील नर्सरी स्कूलचा विचार बोलून दाखविला आणि येथून शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा एक नवा मार्ग मिळाला.
पार्लर, नर्सरी स्कूल चालवत त्यांनी 2004-05 मध्ये ‘व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी’ नावाची संस्था रजिस्ट्रेशन केली. एका छोट्याशा जागेत नर्सरी स्कूल सुरू झाले. सुरुवातीला 25 मुलांसोबत सुरू केलेल्या व्यंकटेश एज्युकेशन सोसायटीच्या स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलचे वर्ग आणि विद्यार्थी संख्या वाढू लागली.

शाळेचा पसारा वाढू लागला, त्यामुळे जागेची अडचण निर्माण झाली. 2009 मध्ये जवळच्या वेल्हाळे शिवारात चार एकर जागा खरेदी केली. आज तेथे 42 हजार स्केअर फुटाची भव्य सर्वसोयींनीयुक्त शैक्षणिक संस्था उभी आहे. संस्थेच्या माध्यमातून 1500 विद्यार्थी आज येथे शिक्षण घेतात. शिक्षणातील बदल, त्यासाठीचे प्रशिक्षण, नामवंतांच्या शाळाभेटींकडे त्यांचा कटाक्ष असतो. दर्जेदार शिक्षणासोबत वेगवेगळे प्रयोग येथे सुरू असतात. 2011 मध्ये स्ट्रॉबेरी स्कूलला सीबीएसई बोर्डाची मान्यता मिळाली.

संज्योत अरविंद वैद्य संगमनेर-अकोलेकरांसाठी परिचित असलेले हे नाव. स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून आज शैक्षणिक क्षेत्रातील एक मानाचे पान ठरले आहे. छोट्याशा पार्लरद्वारे आपल्या व्यावसायिक कारकिर्दीचा श्रीगणेशा करणार्‍या वैद्य यांनी अल्पावधीतच राज्यातील नामांकित शिक्षण संस्थांत आपल्या शाळेचा नावलौकीक उंचावला. शिक्षणासारख्या क्षेत्रात कर्तृत्व दाखवत त्यांनी आज उंच भरारी घेतली आहे.

त्यांच्या शाळेतील उपक्रमाची दखल घेत लखनौमध्ये डॉ. किरण बेदी यांच्याहस्ते त्यांचा ‘इनोव्हेशन इज एज्युकेशन’ या पुरस्काराने गौरव झाला. त्यापाठोपाठ एज्युकेशन एक्सलन्सी पुरस्कार अभिनेत्री आसावरी जोशी तर पंडित जसराज यांच्या हस्ते ‘विकासरत्न’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी ‘चिल्ड्रेन्स फिल्म फेस्टीव्हल’ सुरू केले, यातून मुलांनी बघावेत असे चित्रपट आठ दिवस दाखविले जातात. फिनलँडमध्ये जाऊन तेथील शिक्षण पध्दतीचा अभ्यास करून त्याचा वापर शिक्षण पध्दतीत केला. पालकांसाठी फिनलँंडचे शिक्षणतज्ज्ञ पेट्री लेनोस्कोपी यांच्यादेखील व्याख्यानाचे आयोजन त्यांनी केले. संगमनेर आणि परिसरातील सर्वच शाळा या त्यांच्या उपक्रमात सहभागी होतात.

2011 मध्ये देशाच्या तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासोबत 14 नोव्हेंबरचा बालदिन स्ट्रॉबेरीच्या विद्यार्थ्यांना साजरा करण्याची संधी मिळाली. दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाचा हा क्षण तर स्ट्रॉबेरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. शाळेच्या आज नांदूरशिंगोटे (सिन्नर) आळेफाटा (पुणे) येथे शाखा सुरू झाल्यात. शाळेकडे आज सोळा स्कूल बसेस, दीडशे शिक्षक व कर्मचार्‍यांचा स्टाफ, आणि देशभरातून विविध स्पर्धांमधून शाळेचा नावलौकीक वाढविणारे विद्यार्थी या शाळेचे यश अधोरेखित करतात.

मुलांनी उद्योजक बनावे या हेतूने त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात बँकींग विषयाचा समावेश करून मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात पुढाकार घेणारी स्ट्रॉबेरी ही राज्यातील एकमेव शाळा ठरली आहे. भारत हा शेतीप्रधान देश आहे, पण मुलांना शालेय जीवनात या विषयाचे ज्ञान दिले जात नाही, यातही स्ट्रॉबेरीने पुढचे पाऊल उचलत शाळेमध्ये एक एकर जमिनीत सर्व प्रकारच्या भाज्यांची आधुनिक पध्दतीने लागवड करत मुलांना शेतीचे ज्ञान देण्यास सुरुवात केली. लघु उद्योजक, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती मुलांना देण्यासाठी व्याख्याने, विविध विषयांवरील प्रदर्शनांचे आयोजन मुलांच्या सहभागातून करण्यात त्यांचा पुढाकार असतो.

वर्षभर शैक्षणिक भेटीचे उपक्रम मुलांच्या ज्ञानात भर घालतात. आर्थिक साक्षरता हा उपक्रम शाळेने प्रथम सुरू केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. प्रात्याक्षिकावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केट, वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जाऊन तेथील माहिती घेता आली. भगवद्गीता आणि कुरण या ग्रंथांचा मिलाफ सांगणारा तल्ला खान हा विद्यार्थीही या शाळेत घडला. विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये स्ट्रॉबेरीची मुलं आज आघाडीवर दिसतात.

त्याचे कारण विद्यार्थी केंद्रीत शिक्षण होय. मराठी व इंग्रजी असा भेदभाव राहिला नाही. तसाच जाती-धर्माचा भेदभाव देखील कधी डोळ्यासमोर आला नाही. त्यामुळेच शाळेत वर्षभरातील सर्वच सण उत्साहाने साजरे केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध सणांची माहिती होते. परंपराही जपली जाते. आपल्या पाल्याला कुठले शिक्षण दिले पाहिजे याचा विचार पालकांनी करून त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाईल त्याप्रमाणे पाल्य घडेल. तेव्हा खर्चावर मर्यादा टाका, उत्पन्नात वाढ होईल, असा त्यांचा विचार खूप काही सांगून जातो.

शैक्षणिक क्षेत्रात ‘स्ट्रॉबेरी’ ने आपल्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळेच नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत डिसेंबर 2018 मध्ये दुबई येथे आंतरराष्ट्रीय अ‍ॅवार्डने अफगाणिस्तानचे शिक्षणमंत्री अत्ता उल्हाह वाहिदिया यांच्या हस्ते संस्थेला गौरविण्यात आले. मुंबईच्या सीईडीने राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट स्कूल अ‍ॅवार्डने सन्मानित केले. इंडियन एज्युकेशन अ‍ॅवार्ड, एक्सलंट लिटर शीप प्रमाणपत्र, बेस्ट मॅनेेजमेंट अ‍ॅवार्ड अशा विविध पुरस्काराने ‘स्ट्रॉबेरी’ला गौरविण्यात आले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!