अहमदनगर (कर्मयोगिनी) : सदाबाई हरकचंद गुगळे- उद्योगाचा भक्कम पाया

1

जामखेड, जि.अहमदनगर
कार्य – घरातील उद्योग व्यवसायात लक्ष घालून उद्योगाच्या भरभराटीसाठी अथक परिश्रम. आज गुगळे परिवार यशस्वी उद्योजक म्हणून परिचित. त्याचा पाया रचण्यात महत्त्वाचा वाटा. गट : उद्योग-व्यवसाय 

आज वयाच्या 83 व्या वर्षातही सदाबाईंचा उत्साह थक्क करणारा आहे. त्यांचे बालपण श्रीगोंद्यात गेले. शिक्षण सातवीपर्यंत. उद्योगाचे बाळकडू घरातूनच मिळालेले. पण सोबतच अनेक संकटे आणि चढउतारही बघितलेले. सहाजिकच कठीण प्रसंगात खचून जायचे नाही, हा मंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. तोच मंत्र आपल्या परिवारातही पेरला. कदाचित त्याचमुळे आज जामखेडचा गुगळे परिवार उद्योग जगतात पाय रोऊन खंबीरपणे उभा आहे. या उद्योेगाचा पाया बाईंचे कष्ट, संयम आणि संस्कार या जोरावर मजबूत झाला आहे.

सदाबाईंचे बालपण श्रीगोंदा येेथे गेले. सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या सदाताईंचे माहेर श्रीगोंद्याचे. कै.मगनलाल किसनलाल गांधी यांच्या त्या कन्या. वडिलांचा त्यावेळी व्यवसाय होता. श्रीगोंद्यामध्ये वयाच्या 16 – 17 पर्यंत रहिवास झाला. या काळात वडिल व त्यांच्या भावंडांचा एकोपा, प्रेम, कठीण प्रसंगी सर्वांनी एकत्रित असणे, अशा संस्कारात बाई लहानाच्या मोठ्या झाल्या. उपजतच असलेला समंजस व सोशिकपणा पुढील आयुष्यात वाढीस लागला, जो त्यांनी आजपर्यंत जपला आहे. वाढता संसार व तुटपुंजी मिळकत आणि इतर कारणांमुुळे जामखेड सोडून हरकचंदजींना पुण्याला जावे लागले. खाजगी संस्थेमधील अल्प पगारावरील नोकरीत नेटका संसार हसत केला. त्यासोबत बचत म्हणून नियमाने काही रक्कम बाजूस ठेवण्याची सदाबाईंची किमया थक्क करणारी आहे.

जामखेड येथील कै.उत्तमचंद रतनचंद गुगळे हे कुटुंब त्यांचे सासर. बाईंचे पती हरकचंदजी गुगळे, व भाऊ कांतिलाल यांच्या आग्रहामुळे 1968 मध्ये अक्षयतृतीयेला छोटेसे कापड दुकान सुरू केले. सदाबाई यासाठी गांधी परिवारातील श्री. अमोलकचंदजी (बाबाजी) स्व. हस्तीमलजी, नानासाहेब व या संपूर्ण कुटुंबाबद्दल नेहमीच कृतज्ञता व्यक्त करतात. सचोटी, व्यावसायिक हुशारी, धाडस निर्णय तत्परतेच्या जोरावर रोजच व्यवसाय वृध्दिंगत होत होता. आर्थिक गरज म्हणून अनेक वेळा दागिने मोडावे लागले. दीड खणाच्या खोलीत स्वयंपाक करून रात्री लांब असलेल्या दुकानात मुक्काम करावा लागला. परंतु त्याबद्दल ना कधी खेद ना खंत. नेहमीच सकारात्मक विचार करून स्वतःला पुढे घेऊन जाण्यार्‍या बाईंबद्दल भाव व्यक्त करताना शब्द सुचत नाहीत. सोबत तीनही मुले रमेश, दिलीप, संजय यांची लग्न होऊन घरात आलेल्या सुना, नातवंडामुळे त्या पुरत्या संसारात रममाण झाल्या. परंतु त्यांच्या मुलांना अथवा हरकचंदजींना घरातील प्रश्‍नांमध्ये कधीही लक्ष द्यावे लागले नाही. हे एकप्रकारे सदाताईंचे करिअरच म्हणावे लागेल.

सगळेकाही व्यवस्थित चालले असताना 21 मार्च 1997 रोजी बाईंनी आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला वयाच्या 63 व्या वर्षी गमावले. त्यांचे निधन हा कुटुंबाच्यादृष्टीने प्रचंड धक्का होता. याच काळात पुढे निर्माण झालेल्या प्रश्‍नांना सामोरे जाताना बाईंची जणू सत्त्व परीक्षाच होती. परंतु अत्यंत धिरोदत्तपणाने, प्रसंगी अत्यंत कठोर निर्णय घेऊन त्यांनी संसार आणि दुकानाचा गाडा सुस्थितीत आणला. व्यवसाय व शिक्षणामुळे तीनही सुना व एक नातसून चार ठिकाणी राहत असल्या तरी प्रेमाच्या बंधनातून त्यांना एकत्रित ठेवण्याची त्यांची किमया वाखाणण्यासारखी आहे. आजच्या व बाईंच्या काळामध्ये अमुलाग्र बदल झालेला असला तरी जुने ते सर्व चांगले, नवीन सर्व वाईट असे त्या अजिबात मानत नाही.

टी. व्ही. वरील चांगले कार्यक्रम, लहानपणापासून असलेले वाचन याव्दारे आजही बर्‍यापैकी अपडेट असतात. धार्मिकतेबद्दल त्यांची काही रोखठोक मते आहेत. धर्माचे अवडंबर, कर्मकांडापेक्षा चांगली वर्तणूक म्हणजे धर्म यावर त्यांचा भर असतो. रोज सकाळी एक ठराविक वेळी अल्प प्रमाणात योग, व्यायाम यातून बाई आपल्या मनावरील तणाव कमी करतात तसेच शारिरीक क्षमतेबद्दल जागरूक असतात. आज वयाच्या 83 व्या वर्षांतही गरजेची असलेली आरोग्याची काळजी सतत घेत असतात. सदाबाई म्हणतात की, कामात सातत्य, मनात जिद्द आणि काही तरी करून दाखवण्याचे धाडस असेल तर माणूस यशस्वी होतो. यश त्याच्यापासून दूर जाऊच शकत नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*