कर्मयोगिनी- शुटिंग बॉल स्पर्धेत ऋतिकाची सुवर्णभरारी

0

ऋतिका प्रकाश गाडेकर

  • गट- क्रीडा
  • शुटिंग बॉल चॅम्पियन
  • दाढ बुद्रुक, ता. राहाता, जि. अहमदनगर
  • नेपाळ येथे आंतरराष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले
  • जळगाव येथे राज्यस्तरीय स्पर्धेत कर्णधार म्हणून भूमिका बजावली
  • नंदूररबार येथे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक
  • दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक सारख्या ग्रामीण भागात राहणारी, दहावी इयत्तेत शिकणारी ऋतिका हिने कमी वयात आंतरराष्ट्रीय शुटिंग बॉल सांघिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत भारताला सुणर्णपदक मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. तिने आतापर्यंत तीनवेळा राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला. दोन वेळेस राज्यस्तरीय स्पर्धेत कर्णधारपदही भूषविले. चांगली कामगिरी करत एकदा प्रथम क्रमांक तर दोन वेळेस द्वितीय क्रमांक मिळवून अहमदनगर जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन ठेवले. शालेय स्तरावरील तसेच जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये तर तिने कमालच केली आहे. दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेत ऋतिकाची निवड झाली. दाढ बुद्रुक येथील अन्य चार मुलींचीही निवड झाली. ही दाढच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील ग्रामीण भागात दाढ बुद्रुक येथे महात्मा फुले विद्यालयात शिकत असलेल्या ऋतिका प्रकाश गाडेकर हिने शुटिंग बॉल स्पर्धेत फक्त दोन वर्षातच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा बहुमान मिळविला. ऋतिका हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून तिने शुटिंग बॉल या खेळात प्रगती करण्याचे ठरविले आहे. तिचे वडील शेती करतात. भाऊ मयूरने बारावीची परीक्षा दिली असून त्याच्यामुळेच मी या खेळात प्रगती करू शकले असे ऋतिकाने दैनिक सार्वमतशी बोलताना सांगितले. तिचा भाऊ मयूर याला या खेळाची आवड असून तो नेहमीच सराव करत असतो. ऋतिका ही 8 वी इयत्तेत शिकत असताना तिने त्याच्या भावाचा खेळ पाहिला. तिलाही हा खेळ खेळण्याची ओढ निर्माण होऊ लागली. ती हळू हळू गल्लीतील तीन चार मैत्रीणींना बरोबर घेऊन हा खेळ खेळण्याचा प्रयत्न करू लागली. आणि पाहता पाहता हा खेळ तिचा कधी आवडता झाला हे तिलाही कळले नाही.

तिच्या या खेळाविषयी क्रीडा शिक्षक श्री. तुपे यांनी समजले. त्यांनी वर्गातील तीन चार विद्यार्थिंनीना बरोबर घेऊन या खेळाचा सराव सुरू केला. तिला शालेय स्तवरील विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सांगून तिने या स्पर्धा उत्तमरित्या पार पाडल्या. हा सांघिक खेळ जरी असला तरी या खेळातील सात खेळाडूंमध्ये एक दोन विद्यार्थिनी चांगल्या असल्या तर संघातील खेळाडूंना पुढे जाण्याची संधी मिळते. या शालेय स्पर्धेमधून ऋतिकाने तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपली व आपल्या सहकार्‍यांची चुणूक दाखवून दिली. जिल्हास्तरीय स्पर्धेत ऋतिकाची निवड झाली. यात विविध तालुक्यांतील विद्यार्थिनी तिच्या जोडीला आल्या. या संघात तिच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि नववी दहावीच्या विद्यार्थिनी होत्या. तरीही ती सरसच ठरत होती. त्यामुळे तिची राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी निवड झाली. जामनेर येथे झालेल्या निवड चाचणीत तिच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत तिच्या संघाला चांगले यश मिळाले.

एक चांगली कर्णधार म्हणून राज्यस्तरीय संघात तिची कामगिरी वाखणण्याजोगी राहिली. त्यानंतर जळगाव येथे जळगाव जिल्हा शुटिंग बॉल असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या राज्य शुटिंग बॉल स्पर्धेत अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतील तिच्या संघात विविध जिल्ह्यांतील मुलींचा समावेश होता. तिला या विद्यार्थिंनींचा अनुभवाचा खूपच फायदा झाल्याचे तिने सांगितले. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषक मिळवत राज्यस्तरावर तिने अहमदनगर जिल्ह्याचे नाव मोठे केले. यावेळी तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यावेळी ती इयत्ता 9 वी इयत्तेत शिकत होती. त्यानंतर नंदूरबार येथे राज्यस्तरीय स्पर्धेत पुन्हा तिच्याच गळ्यात कर्णधारपदाची माळ टाकण्यात आली. तिच्या नेतृत्वाखालील संघाने चांगली कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकाविला. जळगाव येथे झालेल्या दुसर्‍या स्पर्धेत क्रीडा व युवकसेना संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जळगाव जिल्हा परिषदेच्यावतीने राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेत 19 वर्षीय मुलींच्या संघाने बाजी मारत पारितोषकही पटकावले.

नेपाळ येथे आशियन शुटिंग बॉल फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंडिया-नेपाळ आंतरराष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेत प्रथमच खेळताना तिला आकाश ठेंगणे झाले होते. एक ग्रामीण भागातील मुलगी नेपाळमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळतांना तिच्या आईवडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या स्पर्धेत 16 देशांच्या संघाने प्रतिनिधीत्व केले होते. यातही ऋतिका खेळत असलेल्या भारताच्या संघाने सुवर्णपदक प्राप्त करून अहमदनगर जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राबरोबरच भारताचे नाव या खेळाच्या यशोशिखरावर नेऊन पोहोचविले. विविध देशांतून आलेल्या खेळाडूंकडून या खेळातील बारकावे शिकता आले. त्यांच्याकडे असलेली पध्दत अवगत झाली. त्यामुळे याचा फायदा पुढील जीवनात नक्कीच होणार आहे. आता ऋतिकाची नवी दिल्ली येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यातही भारतातील विविध राज्यातील संघ दिल्ली येथे खेळणार असल्यामुळे नेपाळ येथील अनुभव तिच्या कामी येऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ती महाराष्ट्राचे नाव नक्कीच उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा तिच्या आईवडिलांसह जिल्ह्यातील अनेक क्रीडा समीक्षकांनी केली आहे. तिच्या या कामगिरीस सलाम!

 

LEAVE A REPLY

*