महिला देशाचे भविष्य घडविणारी शक्ती !

0
‘सार्वमत कर्मयोगिनी’च्या निमित्ताने पुष्पाताई काळे यांचे भाष्य
स्त्री अनादीकाळापासून शक्ती स्वरूपात आहे. बदलत्या परिस्थितीत त्याची परिभाषा जरूर बदलली आहे. राक्षसांचा संहार असो वा कठीण काम स्त्री सर्वदाच अग्रणी आहे. म्हणून महिला सशक्तीकरण हे आधुनिक नसून पौराणिकच आहे. बदलत्या परिस्थितीत मात्र स्त्रीची भूमिका बदलली आहे. ती मुलगी, सून, पत्नी, माता ह्या भूमिकांव्यतिरिक्त अधिकारी, वैज्ञानिक, शिक्षक, कर्मचारी, मालक, अशा अनेक रूपांनी आहे. तिच्या जीवनाला अनेक पैलू लाभले आहेत. त्यांना अधिक चमक तिने आपल्या कर्तृत्वाने दिली आहे. आपल्या बुद्धीला, आत्मसन्मानाला तिने नवीन दिशा दिली आहे. आजच्या जगात असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्री नाही.

प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार केला तर असे वाटते की आम्हाला आमची जागा मिळाली आहे. पण माझ्या मते अजून आम्हाला बरेच प्रयत्न करायचे आहेत. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे, असे मत कोपरगाव येथील प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.पुष्पाताई अशोकराव काळे यांनी नोंदविले आहे.

बुधवार, 25 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता नगर येथील शिर्डी रोडवरील माऊली सभागृहात ‘सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कार’ प्रदान सोहळा अभिनेत्री, निर्माती पूनम शेंडे यांच्या विशेष उपस्थितीत रंगणार आहे. कर्मयोगिनी उपक्रम आणि महिलांचे विश्‍व या अनुषंगाने सौ.पुष्पाताई बोलत होत्या. ‘सार्वमत’च्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी महिला विश्‍व, सध्याची परिस्थिती, भविष्यातील आव्हाने या अनुषंगाने विवेचन मांडले.

त्या म्हणाल्या, आमचा विकास तर झालाच आहे. पण सर्वांगीण नाही. अजूनही अनेक स्त्रिया अशिक्षित, अंधश्रद्धा, पतीची मारहाण, हुंडा अशा अनेक गोष्टींच्या बंधनात अडकलेल्या आहेत. त्यांना परिवर्तनाची दिशा मिळालीच नाही. त्यांचा दिवस कोंबडं आरवण्याच्या आधी सुरू होतो आणि रात्रीची किरकिर होता संपतो. अजूनही त्या दोन वेळेची भूक भागवण्यासाठी नवर्‍याची मारहाण सहन करण्यात आख्खं आयुष्य घालवत असतात. आज आमच्यापैकी अनेक महिला डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षिका, नेता, अभिनेत्री, मंत्री, देशाच्या सर्वोच्च पदांवरदेखील आहेत. त्याचवेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात, हुंड्याच्या अभावी जळतात पण त्यांना न्याय मिळत नाही. त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलन होत नाही. असे का? जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो, तर या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का? याची जाणीवही आपल्याला होईल. त्यांच्या मागासण्याचं कारण आम्ही काही अंशी आहोतच.

समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरुवात करतो. पण याच वेळी या समाजाला प्रश्न विचारावासा वाटतो, खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का? पूर्ण जगात भारत देश आपली संस्कृती, परंपरा, अध्यात्म व भौगोलिक विविधता यामुळे ओळखला जातो. भारतात महिलांना आदिशक्तीचे रूप मानून पुरातन काळापासून पूजनीय मानले गेलेले आहे. त्याचवेळी याच भारत देशात महिला घरात आणि समाजात बंधनामध्ये अडकून पडल्या आहेत. त्यांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांचे अधिकार व विकास यापासून त्यांना पूर्णपणे दूर केले जाते. तरीसुद्धा येथे स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी बोलल्या जातात. महिलांच्या स्वातंत्र्य व अधिकाराविषयी कळकळ व्यक्त केली जाते.

असे असतानाही निर्भया कांड किंवा कोपर्डीसारख्या अमानुष अत्याचाराच्या घटना घडतात. अशावेळी आपल्यासमोर महिलांचे प्रश्न बिकट समस्या बनून उभे राहतात. त्यावर उपचार म्हणून समाजात महिलांना स्वायत्तता, सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी सबलीकरणाचे अभियान राबविण्यास सुरुवात होते. खरंच भारतातील महिला अबला आहेत का? ज्यामुळे आपण तिला सबला बनविण्याचा प्रयत्न करत आहात आणि खरंच महिलांचे सबलीकरण होते आहे का? जेव्हा अनेक महिलांशी चर्चा केली, तेव्हा कुणीही सबलीकरण होते आहे हे मान्य केले नाही. असे का? मुळातच भारतीय महिला ही कधी अबला नव्हतीच. भारत हा नवदुर्गेची पूजा करणार्‍या संस्कृतीतील स्त्रीशक्तीचा देश आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, असे येथे म्हटले जाते. किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्रीमुळे घडले.

राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, मदर टेरेसा, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, पी. टी. उषा आणि इतरही अनेक कर्तृत्ववान महिलांनी या देशाचा नावलैकिक वाढविला आहे. राजमाता जिजाऊ होत्या म्हणून संस्कारमूर्ती व कीर्तिवंत छत्रपती शिवराय घडले. सावित्रीबाई फुलेंची साथ होती म्हणून जोतिबा फुले महात्मा झाले आणि इतकेच नव्हे, तर कौसल्यानंदन श्रीराम व अंजनीपुत्र हनुमान ही आपली देवप्रतीके स्त्रीच्या संस्काराचा आणि सृजनाचा आविष्कार आहे. मुळातच महिलांमध्ये निसर्गाकडून काही देणग्या पुरुषांपेक्षा जास्त आहेत. स्त्रीमध्ये सहनशीलता, नावीन्यता, सौंदर्याची जाणीव, बचत वृत्ती, संघप्रेरणा, स्मरणशक्ती हे गुण निसर्गतःच अधिक आहेत. स्त्री सृजनशील आहे. कारण निसर्गाने निर्मितीचा अधिकार स्त्रियांना दिला आहे.

स्त्री मुळातच सबला आहे. जरी संविधानाने स्त्री व पुरुष यांना समान अधिकार दिले असले तरी भारताच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री आज समाज व कुटुंबाच्या बंधनात अडकून पडली आहे. महिला सबलीकरण म्हणजे फक्त कार्यक्रम, व्याख्यान आहे; पण तसे न होता वास्तविकतेत महिलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून वैयक्तिक स्वातंत्र्य व निर्णय घेण्याचा अधिकार मिळणे होय. महिला या देशाचे भविष्य ठरवणारी शक्ती आहे आणि त्यामुळे ही शक्ती सुदृढ व सक्षम बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. आपल्या देशाची अर्धी लोकसंख्या ही महिलांची आहे. या लोकसंख्येसाठी सरकारद्वारे मातृ दिवस, महिलादिन, बालिकादिन, जननी सुरक्षा अभियान असे कार्यक्रम राबविले जातात.

त्यामुळे समाजात स्त्री शक्तीचे महत्त्व व अधिकार जागृत करण्याचे काम केले जाते. पण यासोबत आज महिला सबलीकरण करताना सर्वप्रथम समाजात महिलांचे अधिकार व मूल्य यांच्यावर आघात करणार्‍या विघातक प्रवृत्ती अर्थात हुंडा प्रथा, स्त्री भ्रूणहत्या, निरक्षरता, लैंगिक अत्याचार, असमानता इत्यादींचा नाश करणे गरजेचे आहे. लैगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजनांना बरोबरच महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे. अशा प्रकारे महिला सबलीकरण करणे म्हणजे पुरुषांना हिणवणे किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठता सिद्ध करणे असे नव्हे, तर फक्त महिलांना त्यांच्या नैसर्गिक गुणधर्म, क्षमता, परंपरा यांच्यासह समानतेने वागविणे होय. असा विचारप्रवाह समाजात प्रस्थापित झाला तर खर्‍या अर्थाने महिलांचे सबलीकरण होईल.

 

LEAVE A REPLY

*