अहमदनगर (कर्मयोगिनी) : प्रविणा अजित घैसास- अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज

0

मॅनेजिंग डायरेक्टर,
अनिप्रा केमिकल्स, अहमदनगर.
कार्य – उद्योगातील यशासोबत समाजकार्यातही सक्रीय. अन्यायपीडित महिलांना न्यायालयीन मदत करणे, वेगवेगळ्या संस्थांना मदत उपलब्ध करून देणे. गट : उद्योग-व्यवसाय  

सुमारे 10 वर्षांपूर्वी कंपनीच्या कारभारात लक्ष घातल्यानंतर औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या महिलांच्या अडचणी, समस्या जेव्हा दृष्टिपथास आल्या तेव्हा प्रविणादिदींनी अन्यायविरुद्ध दोन हात करण्यासाठी पदर खोचला. प्रविणा घैसास महिला कामगार असोशिएशनची स्थापना करून प्रविणादीदींनी आजपर्यंत महिलांचे अनेक प्रश्‍न सोडवले.

दिल्लीस्थित माहेर असलेल्या प्रविणादीदी पूर्वाश्रमीच्या प्रविणा बाली. बी.ए. ची पदवी मिळाल्यानंतर त्या अजित घैसास यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या आणि नगरला वास्तव्यास आल्या. सुरुवातीला काही वर्षे कुटुंबाकडे लक्ष देण्यात आणि मुलांचे संगोपन करण्यात गेली. पण चूल आणि मूल एवढ्यापुरताच विचार करणार्‍या त्या नाहीत. ज्ञान आणि विचारांच्या कक्षा रुंद असल्याने त्या नेहमी सकारात्मक आणि प्रगतिशील दृष्टिकोन ठेवून असतात. घरात राहून काय करायचे? हा प्रश्‍न सतावू लागला तेव्हा त्यांनी स्वतःच्या कंपनीचा कारभार पाहण्याचे ठरविले; पण हे कार्य करीत असताना त्यांच्या कंपनीतील महिला कामगारांचे घरगुती, सामाजिक, आर्थिक प्रश्‍न त्यांना सतावत होते. त्यांच्या संवेदनशील मनाला कायम बोचणी लागलेली असे. त्यांनी महिलांच्या हक्कासाठी, प्रश्‍नांसाठी लढण्याचा निश्‍चय केला.

प्रविणा घैसास महिला कामगार असोसिएशनद्वारे त्यांनी महिलांचे प्रश्‍न सोडविण्यास सुरुवात केली.
त्यांच्या कंपनीत कार्यरत असणार्‍या बर्‍याच महिलांच्या कौटुंबीक समस्या होत्या. माहेरहून पैसे मागावयास लावणारे नवरे, ही समस्याही अशीच गंभीर. अशा उपद्रवी नवर्‍यांचा त्यांनी योग्य बंदोबस्त केला. घटस्फोटासाठी दबाव आणणार्‍या नवर्‍यांना पोलिसी खाक्या दाखवून त्यांना निर्णय बदलायला भाग पाडले. अशा प्रयत्नातून त्यांनी हळुहळू कंपनीच्या बाहेरही महिलांच्या अधिकारासाठी लढण्यास सुरुवात केली. त्यांनी सामंजस्याने व प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून अनेकांच्या समस्या सोडविल्या.

आज प्रविणादिदी मानवाधिकार संघटना, वीरांगना महिला परिषद, विश्‍वक्रांती महिला महासंघ, परिवर्तन महिला महासंघ, प्रयास ग्रुप, दादी-नानी ग्रुप आणि प्रगती ग्रुपच्या त्या अध्यक्षा आहेत तर दक्षता समितीच्या त्या आजन्म सदस्या आहेत. महिला व मुलींची छेड काढणारे रोड रोमिओ, साखळीचोर, औद्योगिक क्षेत्रात फिरणारे गुंड यांचा दक्षता समितीद्वारे त्यांनी बंदोबस्त केला. त्यांनी महिला दक्षता समितीद्वारे पोलीस ठाण्यात संपर्क करून कायमचा बिमोड केला. ंप्रविणादिदी फक्त कंपनी आणि सामाजिक गोष्टींचा विचार करतात, असे नाही. तर त्यांनी उच्च शिक्षण देऊन स्वतःच्या मुलांवरही चांगले संस्कार केले आहेत.

मुलीचे लग्न होऊन ती नागपूरला असते तर मुलगा इंजिनीयर झाला आहे. तो आपल्या आईबाबांना कंपनीच्या कामात मदत करतो आहे. प्रविणादिदींनी कुटुंबाबरोबर कंपनीच्या कारभारात लक्ष घातल्यामुळे कंपनीच्या कारभारात व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता आली. आपल्या कंपनीेचे आधुनिकीकरण करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. व्यवस्थापन हे केवळ कंपनीतच असावे असे नाही तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्याचा लीलया अवलंब करावा या प्रागतिक विचारांच्या प्रविणादिदी आहेत. केवळ विचार करूनच त्या थांबल्या नाहीत तर त्याप्रमाणे त्यांचे मार्गक्रमणही चालू आहे. ‘थांबला तो संपला’ हे सूत्र स्मरून त्या कार्यरत असतात. त्यांच्या याचा धडपड्या कार्यशैलीने त्यांना बहुश्रुत बनविले आहे. ‘मी आणि माझे’ याचा त्यांनी विचार केलाच नाही. त्यांचे हेच उल्लेखनीय कार्य लक्षात घेऊन महिला दिनाच्या निमित्ताने त्यांना आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. असे अनेकविध गौरव आणि पुरस्कार त्यांना देण्यात आले आहेत. त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा!

LEAVE A REPLY

*