कठोर संकटाला सामोरे जाण्यास स्त्री सक्षम

0
‘सार्वमत कर्मयोगिनी’च्या निमित्ताने मनालीताई कोल्हे यांच्याशी संवाद
स्त्री ही आदिशक्तीचे रूप आहे. संस्कृतमध्ये श्‍लोक आहे की, ‘यत्र नार्यस्तु पुजयन्ते, रमन्ते तत्र देवता:’ अर्थात जेथे महिलांचा सन्मान व आदर होतो, तेथे परमेश्‍वराचे वास्तव्य असते. स्त्रीयांमध्ये प्रचंड शक्ती आहे, ऊर्जा आहे, क्षमता आहे…होती…आणि राहणारच. त्यात वाढच होत आहे. परमेश्‍वराने स्त्रीला सहनशीलतेचे सुंदर वरदान दिले आहे, त्यामुळे आयुष्यात कितीही कसोटीचे, दु:खाचे प्रसंग आले तरीही चटकन सावरणारी, खंबीरपणे उभे राहणारी स्त्रीच असते. स्त्री ही प्रसंगी दुर्गा होते तर कधी महाकाली. प्रसन्न असेल तेव्हा तिच्यात सरस्वती आणि लक्ष्मी ही दिसते, असे मत संजीवनी अ‍ॅकॅडमीच्या संचालिका सौ. मनाली अमित कोल्हे यांनी नोंदविले.

दि.25 एप्रिल रोजी नगर येथील माउली सभागृहात ‘सार्वमत कर्मयोगिनी पुरस्कार’ प्रदान सोहळा अभिनेत्री पूनम शेंडे यांच्या विशेष उपस्थितीत रंगणार आहे. कर्मयोगिनी उपक्रमानिमित्त सौ. मनालीताई यांनी संवाद साधला. महिलांच्या बाबतीत ूुर्व इतिहासाबाबत सौ. कोल्हे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पूर्वीपासूनच भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला मानाचे स्थान आहे. एकत्र कुटुंंब पध्दती असल्यामुळे तिच्याकडून घरातील लहानांपासून ते थोरा मोठ्यांपर्यत यथा योग्य मान ठेवला जात असे. ती घरची गृहलक्ष्मी समजली जात असे. सीमित मान मर्यादांमुळे ती घरात डांबून ठेवली गेली होती. किंबहुना तत्कालीन समाजाने तिच्यावर बंधने लादून तिला घरात बंदिस्त केले होते. सकाळी लवकर उठून दळण कांडण करणे, सडा सारवण करणे, स्वयंपाक करणे, मुले सांभाळणे, घराण्यातील रूढी परंपरा याचे जतन करणे, हेच तिचे जग होते. कदाचित एवढे सगळे करता सवरता तिला बाहेरचे जग बघण्यास वेळच मिळत नसावा. लग्न सोहळा, श्रावण महिण्यातील नागपंचमी, गौरी गणपती सारखे सण, मंगळा गौर व चैत्रातले हळदी कुंकू असे प्रसंग म्हणजे स्त्रीयांसाठी त्याकाळी एक पर्वणी असायची.

केवळ या कारणास्तवच त्यांना बाहेर पडणे शक्य असे. अशा कार्यक्रमातच एकमेकिशी गाठभेट होत असे, तेवढीच, अन्यथा स्त्रिया एकमेकिंना फारशा भेटत नसत. साहजिकच बाहेरच्या जगात काय चालले आहे याची फारशी कल्पना नसे. पूर्वीच्या पध्दतीमध्ये काळानुसार कसा बदल घडला? यावर सौ. कोल्हे बोलल्या की, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळ यासारख्या महिला सुधारकांनी पुढाकार घेऊन स्त्रीला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. शिक्षण देऊन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. तिच्यात परीवर्तन घडवून आणले. त्यांनी केलेल्या शिक्षण चळवळींचा स्त्रियांना फायदा झाला व महिला कर्तृत्ववान व कर्तबगार झाल्या.

अलिकडच्या काळातील उदाहरणे द्यायची झाल्यास माजी दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदापर्यंत पोहचलेल्या प्रतिभाताई पाटील सारख्या महिलांनी देशाचे नेतृत्व करून देश चालविला. विज्ञान जगतात प्रगती करित कल्पना चावला या महिलेने अंतराळात उंच भरारी घेतली. किरण बेदी, सरोजिनी नायडू, मेघा पाटकर, मृणाल गोरे, पी.टी. उषा, सानिया मिर्झा सारख्या अनेक महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली कामगिरी दाखवून जागतिक व राष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव कमाविले व देशाची प्रतिमा उंचावली. इतकेच नव्हे तर आणखी काही उदाहरणे देताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज फक्त 14 वर्षांचे असताना महाराजांचे वडील शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्द केली आणि ते बंगलोरला वास्तव्यास गेले. अर्थातच जहागिरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यां समवेत जिजाबाई व शिवाजी महाराज पुण्यात येऊन दाखल झाले.

निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादाजी कोंडदेव याच्यासोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिकांना अभय दिले. शिवाजी राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना रामायण, महाभारतातील गोष्टी सांगीतल्या. सीतेचे हरण करणार्‍या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता हे सांगीतले. या संस्कारामुळेच शिवाजीराजे घडले. जिजाबाईंनी नुसत्या गोष्टी सांगीतल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे धडे ही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्‍याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले.

अनेक मोहिंमांमध्ये शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे कार्य एक महिला म्हणून जीजाऊ माँ साहेब खरोखरच सर्वांना आदर्शवत आहे. अर्थात हे सर्व केले नसते तरी त्या आनंदात राहू शकल्या असत्या. परंतु त्यांना राजा घडवायचा होता. तसेच आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणार्‍या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ अर्थात माई आणि अनाथांच्या आई यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. पे्रमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने पे्रमाने आपलसं करणार्‍या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे. त्यांना घरातून हाकलून दिल्यावर त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. स्मशानात चितेवरच्या निखार्‍यावर मडक्यात भाकरी करून पोटाची खळगी भरणारी माई आज शेकडो पुरस्कारांची मानकरी असून आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथ आश्रम आहेत.

पूर्वी अनाथ असलेली परंतु आज माझी असलेली मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना माईंना मोठा अभिमान असतो आणि सुरूवातीलाच उल्लेख केल्यानुसार हे शक्य आहे. फक्त स्त्री मधिल सहनशीलता या वरदानामुळेच. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू, श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या सौ. अंजली देवकर-वल्लाकटी या अहमदनगरच्याच आहे. त्यांचाही आपणा सर्वांना अभिमान आहे. याचप्रमाणे अहमदनगरच्या डॉ. सुधा कांकरिया यांचेही नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. त्या फक्त वैद्यकिय क्षेत्रात प्रसिध्द नाही तर तीस वर्षांपुर्वी त्यांनी बेटी बचावचा नारा दिला. याचप्रमाणे डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे यांचा संघर्षही सर्वांनाच प्रेरणादायी आहे. पती डॉ. प्रकाश आमटे यांचेबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्प चालवून दि.23 डिसेंबर 1973 पासुन स्थानिक आदिवासींसाठी, तसेच लोकांनी आणुन दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलता बिपीन कोल्हे यांनीही महिला स्वयंसहायता बचत गट चळवळीतून हजारो गोरगरीब महिलांना स्वावलंबी बनविले. पहिल्यांदा कर्तृत्व सिध्द केले नंतर नेतृत्व करण्याची संधी मिळविली आणि आता आमदारकीच्या माध्यमातून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील लोकांचे दातृत्वाच्या भावनेतून सेवा करीत आहे. अशी कितीतरी उदाहरणे आहेत की काही महिलांनी पुरूषांंच्याही पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. हल्लीच्या महिलांबाबत अधिक खुलासा करताना सौ. कोल्हे म्हणाल्या की, अनेक स्त्रिया उच्च शिक्षण प्राप्त करून डॉक्टर, वकिलीचा व्यवसाय करतात. तसेच इंजिनियरिंग व माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उच्च पदावर आहेत. एवढेच नव्हे तर पदवी प्राप्त केलेल्या साधारण महिला पण विविध बँका व कार्यालयांमध्ये सेवा करून कुटूंबाला आर्थिक हातभार लावीत आहेत. शिक्षिकेचा पेशा धारण करून शाळा, महाविद्यालयांमध्ये ज्ञानार्जनाचे महान कार्य करीत आहेत. अशिक्षित महिलापण मागे नाहीत. त्या बांधकाम क्षेत्रात तसेच शेती क्षेत्रात ठिकठिकाणी पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून अंग मेहनतीची कामे करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे कुटुंबाची पण तेवढीच काळजी घेत आहेत. अशा स्त्रीयांना घरातील मंडळींची साथ महत्वाची असते. अशा सर्व कर्तबगार महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.

महिलांच्या परस्पर संबंधाविषयी आपणास काय वाटते यावर भाष्य करताना सौ. कोल्हे म्हणाल्या की, हल्ली अनेक महिला टीव्ही वरील मालिका आणि मोबाईल व्हॉट्स अ‍ॅप यात गुंतलेल्या आढळतात. त्यामुळे परस्परातील संवाद, वैचारीक देवाणघेवाण, सुखदु:खाची विचारपूस कमी झाल्याचे जाणवते. या सर्व बाबींवर मर्यादा आणून परस्परांसाठी वेळ दिलाच पाहिजे. आजच्या तरूणींना आपण काय सल्ला द्याल असे विचारले असता सौ. कोल्हे म्हणाल्या की, प्रत्येक महिलेने एकमेकींना समजून घेतले पाहिजे, मदत केली पाहीजे, जेव्हा एक महिला दुसर्‍या महिलेला मदत करते तेव्हा परस्परातील प्रेम वाढते व या प्रेमातून मिळणारी उर्जा महिलांना यशाकडे घेऊन जाते. याची सुरूवात घरातून झाली पाहिजे. दुसरी महिला शोधण्यासाठी कोठेही जाण्याची गरज नाही. आपण एखाद्या क्षेत्रात यश प्राप्त करू शकलो नाही तर न्युनगंडता बाळगू नये, फक्त आपला सकारात्मक दृष्टीकोन असावा.

महिलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. सध्याच्या महागाईच्या काळात संसार रथाचा गाडा ओढण्यासाठी काही ना काही रोजगार, नोकरी, व्यवसाय केलाच पाहीजे. यावर उदाहरण देताना सौ. कोल्हे यांनी सांगीतले की, सौ. जयंती कथले यांनी नागपुर विद्यापीठातून एमसीए ही पदवी प्राप्त केल्यानंतर 2004 साली बंगलोरला जाऊन आयटी क्षेत्रात नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना त्यांनी मार्केटचा अभ्यास केला आणि त्यानुसार घरगुती मोदक बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. पुढे चालून त्यांच्या पतीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये जावे लागले. तेथेही भारतीयांसाठी त्यांंनी मोदक विकण्याचा व्यवसाय केला. काही दिवसांनी त्या भारतात परतल्या आणि इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये टेक्नॉलॉजी लीड पदावर रुजू झाल्या. दोन वर्षातच त्या प्रोजेक्ट मॅनेजर झाल्या. याच काळात त्यांनी कॅटरींग व्यवसाय वाढविला. घरगुती अन्नाची रूची खवयांच्या पसंतीस उतरत गेली.

त्यांना जे लोक घरापासून दूर राहतात त्यांना घरगुती जेवण मिळत नाही याची खंत वाटली. 2013 मध्ये त्यांनी बेंगलोर मध्ये पूर्णब्रम्ह नावाचे रेस्टॉरंट सुरू केले. त्यांनी इन्फोसिसची नोकरी सोडली. जसजसे या व्यवसायात यश मिळत गेले तसे तसे त्यांनी अनेक रेस्टॉरंट्स काढली. आज जगात त्यांची 5000 पेक्षा अधिक रेस्टॉरंट्स आहेत. पहाटे 5 ते रात्री 3 अशी त्यांची दिनचर्या थक्क करणारी आहे. त्यांच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये 50 टक्यांपेक्षा अधिक कर्मचारी महिला आहेत. यावरून तुम्ही काय शिक्षण घेतले त्यापेक्षा तुमच्यात काय गुण आहे हे हेरून महिलांनी उद्योग सुरू करावा. महिलांनी यशस्वी महिलांचा आदर्श घ्यावा. एखादी महिला खूप यशस्वी होते म्हणजे ते यश एका दिवसात मिळत नसते. संघर्ष हा असतोच. पाण्यातल्या माशालाही अश्रू असतात म्हणतात. त्याला दु:ख असते, तसे प्रत्येक यशस्वी व्यक्तीने दु:ख, यातना भोगलेल्या असतात मात्र आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे गरजेचे आहे.

हल्ली अनेक चुकीच्या घटना महिला व मुलींच्या बाबतीत घडतात यावर आपले मत मांडताना सौ. कोल्हे म्हणाल्या की, सर्व प्रथम महिला व मुलींनी मर्यादांचे पालन केले पाहीजे. सध्याच्या समाज व्यवस्थेमध्ये एखादी मुलगी घरी उशिरा आली तर जागृत पालक तिच्यावर प्रश्‍नांचा भडीमार करतात, अर्थात हे विचारलेच पाहीजे, परंतु जागृत पालक आपला मुलगा उशिरा घरी आला तर तो कोठे होता, कोण मित्र होते, बरोबर याची शहानिशा करीत नाही. खरं म्हणजे महिलांवरील अत्याचार नविन नाही. राजाराम मोहन रॉय, ज्योतिबा फुले यांनी स्त्रीयांच्या अडचणी समजून त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढला. सामाजीक संस्थांमार्फत समाज प्रबोधनाचे कार्य होणे गरजेचे आहे. स्वत:चे संरक्षण करण्यासाठी मुलींनी व स्त्रीयांनी प्रथम आपले फिजीकल फिटनेस योग्य ठेवणे गरजेचे त्यासाठी योग्य आहार व व्यायाम महत्वाचा आहे. याचबरोबर स्वत:च्या बचावाचे मॉडर्न टेक्निक्स शिकून घेणे गरजेचे आहे. आज सर्वांकडेच स्मार्ट फोन आहेत.

त्यावर स्वसंरक्षणाचे अनेक व्हीडियो उपलब्ध आहेत. चोर जर रस्ता लुटीसाठी मिरची पूड अथवा मिरचीचे पाणी वारतात, मग, मुलींनी अथवा महिलांनी असे स्वसंरक्षणासाठी केले तर ते चुकीचे ठरू नये. याचबरोबर सरकार जसे लहान बाळांना पल्स पोलिओचे डोस देण्यासाठी उपक्रम राबविते. अगदी तसेच वर्षातून दोन वेळेस ठराविक तारखेलाच शाळा महाविद्यालयांमधून सरकारच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत भोवतालच्या महिला व मुलींसाठी स्वसंरक्षण शिबीरे राबविले तर महिला व मुलींच्या संरक्षणाच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होईल. कारण अलिकडच्या वाढत्या महिला व मुलींच्या अत्याचारावरून अशी शिबिरे आवश्यक वाटत आहेत. यामध्ये सरकारला कोणताही खर्च येणार नाही, फक्त या विभागामार्फत जिल्हा कार्यालयाने सदर शिबीरे राबविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांना बंधनकारक करणे महत्वाचे आहे. तसेच सर्वाजनिक ठिकाणी, कार्यालये, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोण काय करतो याचे मॉनिटरिंग झाले तर अनेक गैरप्रकारांंना आळा बसून प्रसंंगी गुन्हेगार पकडण्यात सुलभ होईल, असे सौ. कोल्हे यांनी शेवटी मुलाखतीमध्ये सांगितले.

LEAVE A REPLY

*