Type to search

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- नैसर्गिक प्रसुतीच्या पुरस्कर्त्या

Share

नलिनीताई जोशी

  • गट-वैद्यकीय
  • इंदोरी, ता. अकोले, जि. अहमदनगर
  • शिक्षण- नर्सिंगचे प्रशिक्षण
  • कार्य- 33 वर्षात 10 हजारांहून अधिक महिलांच्या नैसर्गिक प्रसुती
मातृत्व म्हणजे कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वोच्च समाधानाचा क्षण तसच बाळंतपण म्हणजेही त्या स्त्रीचा पुनर्जन्मच होय. 1970 च्या दशकात वैद्यकीय तंत्रज्ञान फारसे प्रगत नसतानाही आदिवासी अकोले तालुक्यातील इंदोरी सारख्या ग्रामीण भागात नर्सिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या या नवविवाहितेने सुमारे 10 हजार नैसर्गिक बाळंतपणे सुखरुपरित्या पार पाडले. नलिनी (नलुताई) विजयकुमार जोशी (वय 75) असे या परिचारीकेचे नाव.

नाशिक जिल्ह्यातील हिंगे कुटुंबातील माहेर असलेल्या नलुताईंचे वडील व्यवसायानिमित्त संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे स्थायिक झाले. वडील एकनाथराव हिंगे व अशिक्षित आई शकुंतला, तीन बहिणी, एक भाऊ असा सहा जणांचा कुटुंब कबिला मात्र वडिलांची भूमिका मुलगी शिकली, अन प्रगती झाली अशी. काबाड कष्ट करणार्‍या या कुटुंबातील कर्त्या वडिलांनी संगमनेर येथे भाड्याची खोली घेऊन नलुताईसह तीन मुली व एका भावंडास संगमनेर येथे शिक्षणासाठी ठेवले. घारगाववरून रोज या भावडांचा डबा एसटीने येत असल्याने सकाळचा डबा संध्याकाळी असाच अर्धपोटी दिनक्रम सुरू होता. मात्र शिक्षण हेच ध्येय मनातून ठेवलेल्या नलुताईंनी संगमनेरच्या जुन्या घासबाजारातील मराठी शाळेतून उच्च शिक्षणासाठी पेटीट हायस्कूलला प्रवेश मिळविला. तेथेही 11 वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर नाशिकमधील तत्कालीन हेरींज जर्नल हॉस्पिटलमध्ये आपला प्रवेश घेत, परिचारीकेच्या रुपाने समाजसेवेची ज्योत स्वतःच पेटविली. शिक्षण सुरु असताना इंदोरीचे डॉ. विजयकुमार जोशी यांच्याशी विवाहबध्द झाल्यानंतर सन 1969 साली लगेचच सेवेस सुरुवात केली.

पहिलीच प्रसुती प्रवरा नदीपात्रातून होडीने जाऊन म्हाळादेवी येथे एका महिलेची प्रसववेदनेतून मुक्तता केली व तीही विना मोबदला. तिला झालेले बाळ आणि पहिल्याच यशस्वी प्रसुतीची सेवा दोघींनाही आनंद देऊन गेली. त्यानंतर सुरू झालेला हा प्रवास 33 वर्षे अखंडपणे सुरू होता. इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, निंब्रळ, उंचखडक, औरंगपूर, धामणगाव, कळस, आंबड यांसह तालुक्यातून दररोज तीन पासून ते 10-15 पर्यंत नैसर्गिक प्रसुती नलुताईंच्या दवाखान्यात होत असे. त्याकाळी दळणवळणाची साधने नसल्याने बर्‍याच अंशी महिला बैलगाडी किंवा रिक्षातून प्रसंगी स्वतः पायीही दवाखान्यात येत असत. अनेकवेळा गरीब घरातील महिलांना, ऊस तोडणी कामगार महिलांच्या प्रसुती मोफत तर केल्याच पण वेळप्रसंगी स्वःतच्या साड्या फाडून बाळाला फडके म्हणून गुंडाळून त्या देत असत. सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची प्रसुतीही अवघ्या 25 ते 50 रुपयांच्या फीमध्ये होत असत. तालुक्यातील मेहेंदुरी येथे पावसाळ्यात एका महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्या होत्या. मात्र तेव्हा प्रवरा नदीला पूल नसल्याने भर रात्रीच्या वेळेस नदीला पूर आला असतानाही होडीच्या सहाय्याने मेहेंदुरीला जात त्या महिलेची सुखरुप प्रसुती करत परत पहाटे चारच्या सुमारास घरी परतल्याचा प्रसंग अविस्मरणीय होता.

एकदा रिक्षातून अकोलेहून भटक्या समाजातील एक महिला प्रसुतीसाठी त्यांच्या दवाखान्यात येत असताना वाटेत बाळंत झाली. मुल वाटेेतच दगावले. पण त्यांनी दवाखान्यात आलेल्या त्या महिलेला उपचार देण्याचे टाळले नाही. त्या लोकांनी अर्भक रस्त्यात फेकून दिले आणि पोलिसांचा ससेमिरा नलुताईंना सहन करावा लागला. सर्व गावकरी नलुताईंच्या बाजूने उभे राहिले. पोलिसांना कारवाई मागे घ्यावी लागली. हा कटु प्रसंग सोडता त्यांनी केलेली रुग्णसेवा परिसरातील गावकर्‍यांना भावली आहे. 1982 पासूनच्या प्रसुती नोंद वह्या त्यांनी आजही जपून ठेवल्या. 1981 सालापर्यंत त्या रुग्णाच्या घरी जाऊन वैद्यकीय सेवा देत. त्यानंतर 1982 ला त्यांनी छोटा दवाखाना सुरू केला. बाळंतपणाच्या सर्व आधुनिक सुविधा, उपकरणे त्यांनी उपलब्ध केली.

33 वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये एखाद्या गरोदर महिलेस तपासल्यावर तिच्या प्रसुतीची वेळ व अचूक तारीख हीच नलुताईंची उपचाराची ख्याती. त्यामुळे दहा हजार नैसर्गिक प्रसुती नलुताईंनी यशस्वी करून दाखविल्या. एकदाही सिझर करण्याची वेळ आली नाही. आजही जन्माची नोंद शोधण्यासाठी परिसरातील गावकरी त्यांच्याकडे येतात. जिर्ण झालेल्या तत्कालीन नोंद वहीतून त्या जन्मवेळ, तारीख शोधून देत आहेत. आज समाजात फिरताना एखादी महिला गाडीतून उतरून माझी आस्थेवाईकपणे विचारपुस करते. व थेट चरण स्पर्श करीत आशीर्वाद मागतात तेव्हा ओळख विचारल्यावर तुमच्या दवाखान्यातच माझा जन्म झाला आहे, हे उत्तर ऐकताच आपण केलेल्या समाजसेवेचे फळ परमेश्‍वर आपोआपच देतो. याची प्रचिती मिळते. आजही या दहा हजार जन्मांची नोंदवही त्यांच्या कार्याची साक्ष देतात. समाजाच्या सेवेत देव मानणार्‍या नलुताईंना सासू, सासरे, आजे सासरे, पती यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यानेच नलिनी जोशी यांना स्त्री पुनर्जन्माची सेवेकरीण होण्याचे भाग्य लाभले.2003 ला त्यांनी वार्धक्यामुळे परिचारीकेचे काम बंद केले. 75 वर्षांच्या नलुताई व डॉ. जोशी आजही 15 बाय 12 च्या छोट्या घरात राहतात. या उभयतांनी ठरवले असते तर डॉक्टरकीतून बक्कळ पैसा कमावला असता. पण त्यांनी रुग्णसेवेचे व्रत जपले हे विशेष.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!