Type to search

कर्मयोगिनी- पाथर्डी-शेवगावच्या ताई, माई आणि वहिनी

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- पाथर्डी-शेवगावच्या ताई, माई आणि वहिनी

Share

आ. मोनिका राजळे

  • आमदार, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघ.
  • गट- राजकीय
  • भूषविलेली पदे..
  • आमदार
  • जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा
लहानपणापासून राजकीय बाळकड़ू मिळाले, सासरी त्यात आणखी भर पडली. लग्नाअगोदर वडिलांना आणि लग्नानंतर पती व सासर्‍यांना साथ देत घर सांभाळणार्‍या म्हणून पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आ. मोनिका राजळे यांची ओळख. शिक्षण सुरू असतानाच महाराष्ट्राच्या क्रिकेट संघातून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या. अंगातील खिलाडूपणा आणि मिळालेले राजकीय बाळकडू यामुळे त्या मुरब्बी राजकारणी म्हणून प्रकाशात येऊ लागल्या.

मित्राची मुलगी म्हणजे माझीच मुलगी, असे लोकनेते (स्व.) गोपिनाथ मुंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात सांगून आमदार मोनिका राजीव राजळे यांना आपली मुलगी मानले. जिल्ह्याच्या राजकारणात एक संयमी, अभ्यासू माहिला आमदार म्हणून आपली ओळख निर्माण करताना पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी सुसंवाद ठेवत पक्षीय पातळीवर संघटन बांधणीचे मोठे काम त्यांनी केले. पक्षांतर्गत असलेली कार्यकर्त्यांची मतभेदाची दरी संपवून आपण सर्व एक आहोत, प्रत्येकाला क्षमतेनुसार पक्षातून संधी मिळत असते, असा विश्वास कार्यकर्त्याच्या मनात निर्माण करण्यात आमदार राजळे यशस्वी ठरल्या आहेत.

आमदार मोनिका राजळे यांचा दिनक्रम सकाळी सात वाजता चालू होऊन रात्री अकरा वाजता संपतो. दिवसभर मतदारसंघातील कार्यक्रमात, जनतेच्या प्रश्नासाठी लोकसंपर्कात त्या व्यस्त असतात. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकरणात वैरभाव नसलेल्या नेत्या म्हणून त्यांना ओळखले जाते. जलयुक्त शिवार योजनेतून पाथर्डी व शेवगाव तालुक्यात कोट्यवधीची कामे करून विकासाची तसेच राजकारणाची नवी ओळख देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. माहेरी व सासरी राजकीय पाहुण्याची वर्दळ असे. पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना क्रिकेट विषयी प्रचंड प्रेम होते. महाराष्ट्राच्या संघातून त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या. वडील माजी मंत्री अशोक डोणगावकर यांच्याकडून लहानपणीच राजकारणाचे बाळकडू मिळाले. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कन्या मानले.

ना. पंकजा मुंडे यांनी बहीण मानले. हे सर्व जिव्हाळ्याचे, मैत्रीचे नाते जोपासत सर्वांशी त्या समरस झाल्या. त्यांचा विवाह 1996 मध्ये पाथर्डी तालुक्यातील तत्कालीन जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक माजी आमदार राजीव राजळे यांच्याशी झाला. त्यांचे सासरे माजी आमदार आप्पासाहेब राजळे हे काँग्रेस विचारसरणीचे होते. सासूबाई मोहिनी राजळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भागिनी. सर्व नातेवाईक काँग्रेसचेच. पती राजीव राजळे हे सक्रीय राजकारणात असल्याने विवाहानंतर त्या अनेक वर्ष सक्रीय राजकारणात नसल्या तरी यशोधरा महिला मंडळाच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे मोठे संघटन उभे केले.

पती राजीव राजळे यांच्या बॅक ऑफिसचे काम त्या जबाबदारीने व कुशलतेने सांभाळत होत्या. त्यामुळे त्यांचा कार्यकर्त्याशी जवळचा सबंध होता. संस्थांचा कारभार, प्रशासकीय कामकाजाची माहिती त्यांना होतीच. स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण, राजीव राजळे यांची लोकसभा लढविण्याची तीव्र इच्छा यातून बदलत्या राजकारणाच्या समीकरणात मोनिका राजळे यांनी 2012 साली मिरी जिल्हा परिषद गटात उमेदवारी करत प्रथमच राजकारणात सक्रीय प्रवेश केला. तेथे विजय संपादन करून यशस्वी वाटचालीची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार असताना पक्षांतर्गत कुटनितीने अध्यक्षपदाला हुलकावणी दिली. मात्र उपाध्यक्षपद त्यांनी खेचून आणले.

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी केलेली कामे, संपूर्ण जिल्ह्यात ठेवलेला लोकसंपर्क, प्रशासनावर पकड, अभ्यासूपणाने लोकांचे सोडविलेले प्रश्न यामुळे त्या नेहमीच चर्चेत राहिल्या. 2014 मध्ये राष्ट्रवादी पक्षाकडून राजीव राजळे यांचा पराभव झाल्यानंतर स्व. लोकनेते गोपीनाथ मुंडे व अशोक डोणगावकर यांचे कौटुंबीक संबंध असल्याने मोनिका राजळे यांनी भाजपात प्रवेश केला. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह सुरू झाला. भाजपकडून त्यांना उमेदवारीही मिळाली. अन् थोडे थोडके नव्हे, तर विक्रमी 53 हजारांचे मताधिक्य घेत त्यांनी विजय मिळविला.

आमदार म्हणून मतदार संघात विकास कामे करून एक लोकप्रिय, अभ्यासू, संयमी अशी प्रतिमा निर्माण केली. असे असतानाच पती राजीव राजळे यांचे निधन झाले. पतीच्या निधनाच्या दुःखातून बाहेर पडावे, यासाठी हाजारो कार्यकर्त्यानी त्यांच्या घरी जाऊन आग्रह धरत सांत्वनपर आधार दिला. अखेर राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी कासार पिंपळगाव येथील निवासस्थानी येऊन आ. राजळे यांना मोनिका आपण लाखोंचे पोशिंदे आहोत. आता रडायचं नाही, लढायचं, असे म्हणत राजकीय जीवनात सक्रीय केले. त्यानंतर मात्र पतीचे मतदारसंघ विकासाचे स्वप्न साकार करण्याचा चंग बांधून आ. राजळे यांनी गेल्या दीड वर्षात कधीच मागे वळून पाहिले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री मुंडे व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठा निधी प्राप्त करून घेत मतदारसंघात हाजारो कोटी रुपये खर्चून विकास कामांचा डोंगर उभा केला. पाथर्डी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने भव्यदिव्य जॉगींग पार्क पूर्णत्वास येत आहे. शेवगाव व पाथर्डी नगरपरिषदा, पाथर्डी पंचायत समिती, खरेदी विक्री संघ, वृध्देश्वर साखर कारखाना आदी संस्था त्यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे व योग्य प्रकारे वाटचाल करत आहेत. शेवगाव व पाथर्डी नगरपालिकेला राज्य सरकारकडून मोठा निधी, दोन्ही तालुक्यांतील बसस्थानकाला मोठा निधी तसेच दोन्ही तालुक्यांसाठी अमरापूर येथे वीज केंद्र आदी कामे केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यामार्फत 25 / 15 अंतर्गत मोठा निधी मंजूर करून घेण्यात त्या यशस्वी ठरल्या.

दुष्काळी परिस्थितीत सर्वाधिक जनावरांच्या चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर मतदारसंघात प्रशासनाकडून मंजूर करून घेत जनतेला दुष्काळाच्या झळा कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. गेल्या सहा महिन्यांपूर्वी भाजपने गोपनीय पद्धतीने जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीच्या कामाचे सर्वेक्षण केले. त्यातून आ. मोनिका राजळे यांनी केलेल्या कामावर शिक्कामोर्तब झाले. गेल्या साडे चार वर्षांत त्या मतदार संघातील प्रत्येक गावांत विकासकामे, धार्मिक कार्यक्रम, सामाजिक काम या माध्यमातून त्या सातत्याने भेटी देत असतात. प्रत्येक गावात तेथील कुटुंबियांशी, व्यक्तीशी त्यांचा थेट संपर्क जोडला गेला. यामुळे मतदारसंघात त्या नेत्या, वहिनी, ताई, माई अशा विविध नावांनी ओळखल्या जातात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!