Type to search

कर्मयोगिनी- (मीनल काळे) आर्किटेक्ट ते उद्योजक, संघर्षशील प्रवास

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (मीनल काळे) आर्किटेक्ट ते उद्योजक, संघर्षशील प्रवास

Share

मीनल काळे

  • गट- वास्तू विशारद
  • आर्किटेक्ट, अहमदनगर
  • भूषविलेली पदे..
  • आर्किटेक्ट, इंजिनिअर, सर्व्हेअर असोसिएशनच्या अध्यक्षा
  • वाडियापार्क लेडीज क्लबच्या सेक्रेटरी
  • शेळीपालन संस्थेच्या संस्थापक
स्लॅब, सेंटरी, स्टील, खडी, वाळू, सिमेंट आणि त्याची धूळ सहन करत इमारत उभी करता करता वास्तुविशारद होण्याचे स्वप्न पूर्ण करणार्‍या आजच्या आघाडीच्या आर्किटेक्चर मीनल काळे यांनी सुरुवातीचे काही दिवस वस्तीवर राहून मातीचाही गंध घेतला. मुंबई ते अहमदनगर असा प्रवास करत त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला.

वास्तुविशारद होण्याचे स्वप्न असले तरी ते नाजूक प्रकृतीला मानवेल का, असा नातेवाईकांना प्रश्‍न पडला होता. माझ्यासमोर मात्र असा कोणताही प्रश्‍न नव्हता, असे आजही ठामपणे मीनलताई सांगतात. आईवडिलांच्या प्रोत्साहानाने हा अभ्यासक्रम कोणत्याही त्रासाविना पूर्ण झाला. ते करत असतानाच स्वावलंबनाचे धडे गिरवले. मुंबईसारख्या बहुरूपी शहरात राहिल्यामुळे निरनिराळ्या आर्किटेक्टकडे काम करायची संधी मिळाली. मोठ मोठ्या इमारतीचे आराखडे तयार करायला मिळाले. पण त्याचबरोबर रिपेअर बोर्डेमध्ये काम करताना मुंबईच्या अंत्यत बकाळ रस्त्यांच्या दर्शनाने मन विषण्ण झाले. एकाकडे नेपियनसी रोडवरची स्वप्नलोक तर दुसरीकडे अब्दुल रहेमान स्ट्रीटवरची सुतार चाळ, असे चित्र होते. तेव्हाच ठरवले की आपण दुसर्‍या शहरात जाऊन काम करायचे.

मातीचा गंध फक्त पुस्ताकातच वाचलेला. काळ्या आईचे दर्शन नव्हते. लग्न झाल्यावर वस्तीवर विसावले. वस्तीवरील मोठा रांजण अगदी छोटी विहीर वाटली. मुंबईच्या रॅटरेसमधून बाहेर पडायचे ठरवल्याने अशोक काळे यांचे अहमदनगर डोळ्यासमोर आले. प्रथम कायम राहायचे नव्हते, मुंबई कायम सोडायचे विचार नव्हता पण काम वाढल्यावर नगरलाच शिफ्ट झाले आणि स्थिरावलेही.

अहमदनगरमध्ये वाडियापार्क स्टेडियम, मार्केट यार्डची डेव्हलपमेंट, किसान क्रांती, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत, महावीर आर्ट गॅलरी तसेच हाऊसिंग बोर्डाची कामे केली. खेड्यापाड्यातल्या विकास सोसायट्या, रयत शिक्षण संस्थाच्या शाळेच्या इमारतींचेही कामे केली. वाडियापार्क लेडिज क्लबची सेक्रेटरी झाल्या. त्याच वर्षी सुवर्ण म्होत्सवाचा जंगी कार्यक्रम केला. लायन्स क्लबची सेक्रेटरी झाले. डॉ. मोदींच्या आय कॅम्पमध्ये काम केले. नगरच्या प्रथम 1982 भरलेल्या भव्य अ‍ॅग्रो इंडस्ट्रीयल प्रदर्शनाचे प्लॅनिंग केले. 15 दिवस चाललेल्या या प्रदर्शनामुळे निरनिराळ्या समाजिक संस्थाशी संबंध आला. आर्किटेक्टस्, इंजिनीअर व सर्व्हेअर आसोसिएशनची संस्थापक सदस्य आणि नंतर अध्यक्षपद भूषविले. अहमदनगर जिल्ह्यातील पहिली महिला आर्किटेक्ट असल्यामुळे ड्राफ्टमनच्या कोर्स केलेल्या मुली व टायपिस्ट या मुलींना सर्वांगाने घडविण्याचा प्रयत्न करु लागले.

या सर्व गडबडीत युरोपखंडातही भटकंती झाली. पहिल्या व दुसर्‍या महायुद्धाची झळ सोसलेल्या युरोपियन नागरिकांत सरकारच्या भिकेवर, सवलतीवर अवलंबून राहण्याची वृत्ती दिसली नाही. प्रचंड आघात सोसूनही लोक स्वाभिमानाने, आपल्या देशाची अस्मिता जागी ठेवून, समृध्द जीवन जगण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. प्रखर देशभक्ती दिसत होती. सहाजिकच आपले चित्र डोळ्यासमोर आले. समाजासाठी वर्षानुवर्षे शेती करुनही शेतकरी आहे त्याच परिस्थितीत आहे. त्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, असे प्रकर्षाने जाणवले. वैशाली टोमॅटो लावली, विक्रमी उत्पादन झाले, पण भाव? जवळ जवळ शून्य! वेळ आणि पैसा गेला.

यापेक्षा हॉर्टिकलचर फायद्याचे, असा सल्ला मिळाल्याने 1200 डाळिंबाची झाडे लावली. मित्रमंडळी डाळिंबाचा वाणवळा पाहून खूष झाली. पण अनुभव मात्र टोमॅटोचाच आला. मग भव्य शेती करायची ठरवली त्यासाठी खूप वाचन केले. सुरुवात छान झाली, पण वारंवारच्या दुष्काळामुळे नियोजन करणे कठीण झाले. संसाररथाचा गाडा दोघांच्या एक विचारांने व्यवस्थित ओढत होतो. घरच्या आणि दारच्या कामाची विभागणीही अत्यंत साधली होती. तळागाळातील लोकांसाठी, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काहीतरी केलेच पाहिजे ही सामाजिक जाणिव टोचणी देऊ लागली. त्यातूनच शेळीपालन हा जोडधंदा जिरायत भागातील लोकांना वरदान ठरु शकेल, हे लक्षात आले.

तज्ज्ञांच्य मदतीने चर्चासत्राचे आयोजन केले. अशोक काळे यांनी म्हैसूर व मुंबईच्या व्हेटर्नरी कॉलेजमधून कोर्स पूर्ण केला. परदेशी जाऊनही माहिती मिळवली. जनजागृतीसाठी सुरुवातीला एक-दोन वर्षे रोज संध्याकाळी प्रोजेक्टवर घेऊन निरनिराळ्या गावांत शेतकर्‍यांना बंदिस्त शेळिपालन बाबत माहिती दिली. शेळीपालन संस्थेची महाराष्ट्रात प्रथमच नगर तालुक्यात स्थापना केली. आर्किटेक्चर व शेळीपालन या दोन टोकांवर तारेवरची कसरत त्यावेळी होती. शेळीपालन व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठीची योजना नाबार्डसह इतर बँकांना समजावून सांगण्यासठी पुणे-मुंबई वार्‍या झाल्या. एक वर्षाने त्याला यश आले. प्रक्रिया प्रकल्पाची तयारी सुरू झाली.

जागा बघणे, प्रोजेक्ट रिपोर्ट, परत मुंबई-दिल्लीच्या फेर्‍या सुरु झाल्या. केंद्र सरकारने भरीव अनुदान दिले आणि परत गँग बघणे, सिमेंटची धूळ, नवीन स्लॅब आदी तयारी सुरू झाली. इंडियन आर्मीला मटन पुरवठा करणारे काळे यांची संस्था पहिली सप्लायर ठरली. आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करत असतांना उद्योजकांच्या भूमिकेत कधी शिरले ते कळले नाही. जो ध्यास धरला तो पूर्ण होईपर्यंत थांबायचे नाही. मागे वळून पहायचे नाही. भूतकाळात जाऊन कोणी नविन सुरवात करू शकत नाही. मात्र आजपासून प्रारंभ केल्यास कोणतेही नवे उद्दिष्ट साध्य करू शकतो, याची खुणगाठ मनाशी पक्की आहे. हीच खूणगाठ बांधून पुन्हा वाळू, खडी, स्टील आणि स्लॅबच्या तयारीला काळे दाम्पत्य लागले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!