कर्मयोगिनी- शेतकर्‍यांच्या कल्याणाचा वसा घेणारी मार्गदर्शिका

0

सौ. कविता प्रवीण जाधव-बिडवे

  • गट- कृषी
  • जोगेश्‍वरी आखाडा, ता. राहुरी
  • कृषी वाचनालयाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना मार्गदर्शन
  • सहा वर्षांपूर्वी अ‍ॅग्रोमॉलची स्थापना
  • 6500 शेतकर्‍यांचे माती परीक्षण
  • 2000 हजार शेतकर्‍यांचे पाणी परीक्षण
  • माती व पाणी परीक्षणासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा
सासर आणि माहेरचे कुटुंब शेतकरी! लहानपणापासूनच शेतीची आवड असलेल्या कविता जाधव-बिडवे यांनी आपल्या वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शक ठरणार्‍या अ‍ॅग्रो मॉलची स्थापना केली. शेतकर्‍यांनी केवळ खते व औषधांवर अनावश्यक खर्च न करता माती व पाणी परीक्षण करूनच खतांची मात्रा द्यावी, यासाठी स्वतःचीच माती व पाणी परीक्षण करणार्‍या स्वतंत्र प्रयोगशाळेची स्थापना केली. आता त्यांच्या या उपक्रमाला तब्बल 12 वर्षे पूर्ण झाले आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करताना शेतकर्‍यांनाही मार्गदर्शन करण्यासाठी सौ. जाधव यांनी स्वतःला त्यात झोकून दिले आहे. अ‍ॅग्रोमॉलमध्ये आणखी नवनवीन तंत्रज्ञान आणून बळीराजा सुखी झाला पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. त्यासाठी त्यांची अपार मेहनत सुरू आहे.

नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे सौ. कविता जाधव यांचा जन्म झाला. माहेरचे कुटुंबही शेतकरीच! त्यामुळे त्यांना लहानपणापासूनच शेतीची आवड निर्माण झाली. विवाहानंतर सासरही शेतकरी कुटुंबातील मिळाल्याने त्यांच्या आवडीचे रूपांतर संकल्पनेत झाले. कविताने शेतकर्‍यांसाठी काहीतरी करावे, त्यासाठी स्वतःचा कृषी व्यवसाय सुरू करावा, त्यातून केवळ व्यवसाय न बघता शेतकर्‍यांचे हित जोपासावे, ही त्यांच्या वडिलांची प्रबळ इच्छा होती. त्यामुळे सौ. कविता यांनी कृषी पदवी संपादन केली. मात्र, तत्पूर्वीच त्यांचे पितृछत्र हरपले. कवितावर दुःखाचा डोंगर कोसळला. दुःख बाजुला सारून वडिलांनी सांगून दिलेल्या मार्गावर जाऊन त्यांची स्वप्नपूर्ती करण्याची खुणगाठ मनाशी बांधून त्या दिशेने पावले टाकायला सुरूवात केली. आई नोकरी करीत असल्याने कुटुंबाचा भार त्यांच्यावर पडला. या पुरूषप्रधान संस्कृतीत जिथे पुरूषांनाही शेती आणि व्यवसाय करताना अनेक अडचणींचे गतिरोधक पार करावे लागतात, तेथे तर महिलांना अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून मार्गक्रमण करावे लागते.

त्याचा अनुभव कविता यांना आला. कृषी पदवी धारण केल्यानंतर स्वतःचे कृषीकेंद्र स्थापन केले. त्यासाठी परवानाही मिळविला. आता केवळ व्यवसायाचा दृष्टीकोन न ठेवता शेतकर्‍यांचे हित जोपासले पाहिजे. त्यातून अगोदर शेतकर्‍यांचा आर्थिक फायदा करून देताना बळीराजाचे समाधान झाले पाहिजे, हा निश्‍चय त्यांनी केला. तब्बल बारा वर्षे म्हणजेच एक तप अविश्रांत परिश्रम घेत आज सौ. कविता शेती व अ‍ॅग्रोमॉल व्यवसायात एक महिला असूनही खंबीरपणे उभ्या आहेत. शेतकर्‍यांच्या कल्याणाचा त्यांनी वसा घेतला आहे. अनेक शेतकरी माती व पाणी परीक्षण न करताच खते व औषधे घेऊन आर्थिक नुकसानीत जातात. शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी कविता यांनी स्वतःचीच स्वतंत्र माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू केली. अगोदर आपल्याच शेतात नवनवीन तंत्रज्ञान आणून प्रयोग केले. त्यातून त्यांना शेतकर्‍यांसाठी दिशा मिळाली. त्यांच्या कृषीकेंद्रात आलेल्या अनेक शेतकर्‍यांना त्या अनमोल मार्गदर्शन करतात.

आतापर्यंत त्यांनी सुमारे 6 हजार 500 हून अधिक शेतकर्‍यांना माती परीक्षण करून देऊन त्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वाटप केले. तर 2 हजार शेतकर्‍यांच्या पाण्याचे परीक्षण करून शेती करताना खते व औषधे वापरण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार अनेक शेतकरी प्रयोगाअंती यशस्वी झाल्यानंतर शेतकर्‍यांच्या कौतुकाचे बोल हाच त्यांच्या दृष्टीने आनंदाचा क्षण असतो. त्यांचे हे तब्बल 12 वर्षाचे योगदान पाहून त्यांचा अनेक संस्थांनी यथोचित गौरवही केला आहे. शासनानेही जिजामाता कृषीभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यकर्तृत्वावर शाबासकीची थाप दिली आहे. बारामती येथील संस्थेनेही आदर्श उद्योजिका पुरस्कार देऊन त्यांना पाठबळ दिले आहे. त्यांच्या दैनंदिन कामाचे स्वरूप अत्यंत व्यस्त असते. अ‍ॅग्रोमॉलच्या माध्यमातून शेतकर्‍यांसाठी लागणार्‍या सर्व निविष्ठा उदा. रासायनिक खते, बियाणे, किटकनाशके, पाईप, स्प्रिंकलर, यासारख्या शेतकर्‍यांना आवश्यक सुविधा एकाच छताखाली देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्या स्वतःच शेतकरी कुळातील असल्याने त्यांना शेतकर्‍यांच्या वेदना चांगल्याच माहिती आहेत. त्यासाठीच त्यांनी शेतकर्‍यांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न केला आहे.

माती व पाणी परीक्षण करून शेतकर्‍यांना पिकास लागणार्‍या रासायनिक व जैविक खतांची मात्रा सांगून पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी त्या शेतकर्‍यांना मार्गदर्शन करतात. कृषी वाचनालयाच्या माध्यमातून विविध विषयांवरील पीक, कीड रोग नियंत्रण, लागवडीच्या पद्धती, उत्पादनावरील प्रोसेसिंग यासारख्या पुस्तकातून शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन, उदा. ऊस लागवड, एकात्मिक कीड, रोग नियंत्रण आदीबाबत माहिती देणे, तसेच पाण्याची अनावश्यक उधळपट्टी न करता ठिबक व स्प्रिंकलरच्या माध्यमातून कमी पाण्यात अधिक उत्पादन देणार्‍या जातींचा शेतकर्‍यांना वापर करण्यास प्रवृत्त करणे, जैविक कीड व रोग नियंत्रणाविषयी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे, प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी करून रोग व कीड नियंत्रणासाठी उपाययोजना सांगणे, अ‍ॅग्रीकल्चर विषयात शिक्षण घेणार्‍या विविध संस्थांच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणे, नाबार्डच्या अंतर्गत काम करणार्‍या महिला बचत गटांचे शेतीविषयीचे प्रश्‍न जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करणे, अशी कामे त्या शेतकर्‍यांसाठी करीत आहेत.

प्रारंभीच्या काळात कृषीकेंद्राच्या व्यवसाय उभारणीत आर्थिक समस्या उभी राहिली. त्यावर मात करून शेतकर्‍यांच्या बळावर हा व्यवसाय भरभक्कमपणे उभा राहिला असून शेती आणि कृषी केंद्र या माध्यमातून शेतकर्‍यांचे कल्याण यातून वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी त्या प्रयत्नशील आहेत. सन 2005 साली केवळ 2 लाख रुपये उलाढाल असलेला हा व्यवसाय आता कोटीच्या कोटी उड्डाणे करीत आहे. एक महिला शेतकरी आणि कृषी केंद्रचालक म्हणून समाजात वावरताना समाजाचा दृष्टीकोन बदलविणे ही अत्यंत अनुभवाची व जिकिरीची गोष्ट आहे. माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा या सर्वच ठिकाणी शासनाची यंत्रणा असते. अशा परिस्थितीत खासगी पातळीवर प्रयोगशाळा सुरू करणे आणि ती व्यावसायिकदृष्ट्या चालविणे ही खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून सौ. कविता जाधव यांनी चार कुटुंबाला कायमस्वरूपी रोजगार मिळवून दिला आहे. शेती करताना शेतकर्‍यांच्या हिताचा विचार करणारी एक सक्षम शेतकरी महिला म्हणून सौ. कविता जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

LEAVE A REPLY

*