Type to search

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (सौ. कावेरी कृष्णा पटारे)-आत्मविश्‍वासाने दिली गावगाड्याला ऊर्जा

Share

सौ. कावेरी कृष्णा पटारे

  • वांबोरी, ता. राहुरी
  • महिला सबलीकरणावर भर
  • सरपंचपदाच्या कार्यकाळात स्वच्छतेला प्राधान्य
  • स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू केली
  • विकास कामे पाहून परदेशी पाहुण्यांनाही पडली भुरळ
  • आदर्श सरपंच म्हणून गौरव.

माहेरचे कुटुंब शेतकरी, त्यामुुळे शेतीतच कष्ट करून राबणार्‍या या कुटुंबाकडून सौ. कावेरी पटारे यांना कोणताही राजकीय वारसा मिळाला नाही. मात्र, विवाहानंतर पारंपरिक शेतीबरोबरच सासरकडून राजकारणाचे बाळकडू मिळाले. सौ. पटारे यांचे पती कृष्णा पटारे यांनी राहुरी तालुक्यातील वांबोरी गावचे सरपंचपद यशस्वीपणे भूषविले. माहेरचा उंबरठा ओलांडून सासरी आल्यानंतर कावेरीताईंनी राजकारणाचे धडे गिरविले. त्यातच वांबोरी गावचे भूमिपुत्र आणि राहुरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील व शशिकलाताई पाटील यांचे राजकीय मातृ-पितृछत्र कावेरीताईंच्या पाठीशी आधारवड बनून राहिल्याने त्यांनाही पतीच्या पाठोपाठ वांबोरीसारख्या आदर्श गावची सरपंच म्हणून नावलौकिक मिळविता आला.

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रिक या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात सौ. कावेरी पटारे यांचा जन्म झाला. माहेरचे कुटुंब शेतकरी पंथातील! त्यामुळे तेथे केवळ शेती आणि मेहनत एवढेच संसाराचे कालचक्र सुरू असताना त्यांनी पाहिले. शेती आणि शेतीच करताना तेथे राजकारणाला मुळीच थारा नव्हता. त्यामुळे कावेरीताईंनीही आपली शेतीची आवड माहेरी जोपासली. दरम्यान, माहेरचा उंबरठा ओलांडल्यानंतर माहेरवाशीणीपासून सासरवाशीण झालेल्या कावेरीताईंना राजकारणाचे धडे वांबोरीला आल्यानंतर मिळाले. वांबोरीचे पटारे कुटुंब आदर्श राजकारणी म्हणून परिचित आहे. ज्येष्ठ नेते अ‍ॅड. सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली पटारे कुटुंबाची राजकारणाच्या पटलावर यशस्वीपणे आगेकूच सुरू आहे. त्यातच पटारे कुटुंबातील चारजण भारतीय सैन्यदलात आहेत. त्यामुळे राजकारणाबरोबरच पटारे कुटुंबात देशभक्तीचीही ज्योत अखंडपणे तेवत आहे.

पर्यायाने कावेरीताईंना राजकारण आणि देशसेवेचा वसा सासरी मिळाला. सन 2004 साली त्यांचे पती कृष्णा पटारे वांबोरी गावचे सरपंच झाले. त्यांची कारकीर्द यशस्वी झाली. त्यानंतर सन 2016 साली कावेरीताईंना महिला आरक्षणामुळे राजकारणाचा श्रीगणेशा करण्याची संधी चालून आली. त्यांनी राजकारणात पहिले पाऊल ठेवले. त्या पटारे कुटुंबाच्या लोकसंपर्कामुळे ग्रामपंचायत सदस्यपदी विराजमान झाल्या. सन 2017 साली त्यांना आरक्षणामुळेच सरपंचपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. पती सरपंच असताना कावेरीताईंच्या पाठीशी असलेली राजकीय शिदोरी त्यांना कामी आली. त्या सरपंच झाल्यानंतर त्यांनी वांबोरीसारख्या विकासाच्या वाटेवर असलेल्या गावच्या विकासाचे शिवधनुष्य हाती घेतले. तब्बल 27 हजारांवर लोकसंख्या असलेल्या वांबोरी गावच्या त्या कारभारी बनल्या. आरक्षणामुळे सत्तेच्या पदावर बसलेली महिला ही केवळ नावापुरतीच सत्ताधारी असते. तिच्या कारभारात अन्यजण हस्तक्षेप करतात. महिलांना राजकारणातील काही कळत नाही.

\असा अनेकांचा गैरसमज असतो. मात्र, लोकांच्या मनात रुजलेली ही संकल्पना काढून टाकून एक महिला सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर किती सक्षमपणे काम करू शकते? याचे आदर्श उदाहरण कावेरीताईंनी आपल्या कार्यकर्तृत्वातून जनतेसमोर ठेवले. ग्रामपंचायतीच्या दरबारात आलेल्या जनता जनार्दनासाठी किती आणि कशी मदत करता येईल? यावर त्यांनी जास्त भर दिला. गावपातळीवर राबविल्या जाणार्‍या प्रत्येक योजनांपासून येथील जनता वंचित राहू नये, यासाठी त्या कायम प्रयत्नशील राहिल्या. जनतेने दिलेल्या सत्तेचा वापर जनतेसाठीच करण्याचा त्यांनी वसा घेतला. गावची स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज या मुलभूत गरजा पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे सरपंचपद हे केवळ स्वार्थाचे पद नसून त्यागाचे पद असल्याचे त्यांनी समाजाला व राजकीय वर्तुळाला दाखवून दिले.

त्यामुळे वांबोरी ग्रामपंचायतीच्या सुयोग्य व्यवस्थापनाची भुरळ हिमाचल प्रदेशातील जिल्हा पदाधिकार्‍यांना पडली. त्यांनी वांबोरी गावाला स्वतः भेट देऊन व्यवस्थापनाचे धडे गिरविले आणि गावाच्या आणि कारभार्‍यांच्या पाठीवर शाबासकीची थापही टाकली. तर इस्त्राईलसारख्या प्रगत राष्ट्रातील शेतीतज्ज्ञांनीही वांबोरी येथील तेलघाणा प्रकल्प, नैसर्गिक खाद्यतेल निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन या प्रकल्पाचे कौतुक केले. परदेशी पाहुणे वांबोरीला आल्यानंतर गावच्या गौरवशाली इतिहासात मानाचा तुरा रोवला गेला. कावेरीताईंच्या विकासकामांमुळे, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक तयारीच्या दृष्टीने त्यांना पुढचे पाऊल टाकता यावे, यासाठी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी अभ्यासिका स्थापन करून त्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली. एक महिला सरपंच किती आणि कसा आदर्श कारभार करू शकते? याचे ज्वलंत उदाहरण कावेरीताईंनी सर्वांसमोर ठेवले आहे.
सरपंचपदाचा कोणताही गर्व नाही, अत्यंत मनमिळावूपणे गावातील आबालवृद्धांशी तेवढ्याच आपुलकीने वागणार्‍या कावेरीताईंची स्वतः महिला असल्याने महिलांसाठी सबलीकरणावर भर दिला आहे.

ग्रामीण भागातील महिलांनी चूल आणि मूल या संसार चक्राबरोबरच समाजात आदर्श गृहिणी म्हणून राहिले पाहिजे, अर्थकारण, समाजकारण करताना साक्षर होऊन महिलांनीच महिलांच्या वेदना समजून घेताना स्त्रीजन्माला प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी त्यांची धारणा आहे. त्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. पुुरूषप्रधान बनलेल्या राजकारणात वावरताना आपण एक महिला म्हणून कामाचा ठसा उमटविला पाहिजे, जिच्या हाती सत्तेची दोरी, ती समाज आणि गावाला उद्धारी, असे समीकरण तयार झाले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. राजकारणाबरोबरच समाजकारणातही महिलांनी उभे राहिले पाहिजे, नवी पिढी घडविली पाहिजे, आपले अंगण, आपले गाव, आपला परिसर स्वच्छ आणि साक्षर केला पाहिजे, अशी इच्छा त्या व्यक्त करतात. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करताना राजकारणविरहित एखादे विचाराचे व्यासपीठ असले पाहिजे, यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. महिलांनी नुसती सत्ता सांभाळू नका, तर एक महिला म्हणून सत्तेची सुवर्णसंधी प्राप्त करा, सत्तेचा फायदा आपल्या गावाला झाला पाहिजे, यासाठी कार्यक्षम होण्याचे आवाहन त्या महिलांना करतात. आपले कुटुंब आणि राजकारण सांभाळताना आत्मविश्‍वास वाढवा, हतबल होऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!