अहमदनगर (कर्मयोगिनी) : जयश्री नामदेव काळे-घोरपडे – मोडलेल्या संसारांना पुन्हा बहर !

0

पोलीस उपनिरीक्षक, भिंगार (अहमदनगर)
कार्य – महिला शाखेत काम करताना मोडलेले संसार समुपदेशनाने पुन्हा सांधण्याचे कार्य. समाजस्वास्थासाठी कठोर कारवाई करताना समाजिक जाणीवाही जागृत,  गट : प्रशासन

संसार म्हणजे गाडीची दोन चाके! त्यात एक चाक जरी निखळले तरी संसार कोलमडण्यास वेळ लागत नाही. असे मोडून पडलेले दीड हजार संसार पुन्हा मार्गावर आणणार्‍या पोलीस उपनिरीक्षक जयश्री काळे यांचे काम उल्लेखनिय आहे. प्रशासकीय सेवा बजावत असताना या कामाला सामाजिक जाणीवांचा ओलावा देण्याचे काम त्या करत आहेत.

आई-वडिलांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी मुलींनीच पहिला पुकार घेतला आहे. हे नव्याने सांगायला नको. अशीच एक राहुरी तालुक्यातील कोल्हार परिसरातील तरुणी. पालकांचे स्वप्न साकार करण्यासाठी ध्येयवेडी झाली. घरात अठराविश्वे दारिद्य्र असताना लेकीच्या अंगावर खाकी वर्दी असावी, असे वडिलांचे स्वप्न. ते सत्यात उतरावे, यासाठी ग्रामीण भागात कच्च्या रस्त्यांवर पळून पोलीस भरतीचा सराव केला. अनेकदा अपयश आले. मात्र जिद्द सोडली नाही. अथक प्रयत्नानांतर सन 2008 साली जयश्री काळे यांना यश आले. त्यांनी पोलीस कॉन्स्टेबलचा गणवेश अंगावर चढविला. एक स्वप्न साकार झाले.

मात्र महिलांवर अत्याचार होतात, किरकोळ कारणास्तव संसार मोडतात, पुरुष प्रधान संस्कृतीमुळे महिलांना बळी पडावे लागते, मुलींच्या छेडछाडी, लवकर विवाह, अपुरे शिक्षण, पालकांचे अज्ञान, अशा अनेक प्रकारांत महिला पिचते याची पोलीस खात्यात आल्यावर त्यांना जवळून ओळख झाली. त्यांचे मन या प्रकारांनी अस्वस्थ झाले. पोलीस विभागात असल्यामुळे आपण या महिलांसाठी काही तरी केले पाहिजे. मोडकळीस पडलेले संसार पुन्हा उभे केले पाहिजेत, असा विचार मनात सतत उचल खात असे.

महिला अत्याचाराच्या प्रतिबंधासाठी केवळ महिला पोलीस हा प्रांत पुरेसा नाही, त्यासाठी अधिकारी होणे आवश्यक आहे, असा विचार मनात येताच त्यांनी नोकरी करत असताना राज्यसेवेची तयारी सुरू केली. दिवसभर काम तर संध्याकाळी अभ्यास, असा दिनक्रम होता. नोकरी आहे, मग का हा खटाटोप असा विचारही कधीतरी यायचा. पण आयुष्यात काहीतरी असे केले पाहिजे, ही इच्छा प्रेरणा देत होती. 2013 साली जयश्री काळे पोलीस उपनिरीक्षक झाल्या.

पोलीस खात्यात आल्यानंतर पोलीस ठाणे नव्हे तर महिला पोलीस शाखेत त्यांची नियुक्ती झाली. जिल्हा महिला शाखेचा पदभार हाती घेतल्यानंतर सलग तीन वर्षे महिलांची प्रकरणे हाताळली. हुंडाबळी, छेडछाड, कौटुंबीक अत्याचार असे अनेक गुन्हे हाताळले. हे काम करत असताना दीड हजार संसार पुन्हा पूर्वपदावर आणण्यात जयश्री यांना यश आले. या दरम्यान चार हजार महिला व पुरुषांचे समुपदेशन करण्यासाठी त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले होते. एकाच जोडप्याला दहा ते पंधरा वेळा बोलावून मुलेे, सासू, सासरे व नातेवाईक यांच्यात समन्वय साधण्याची कसरत पार पाडावी लागत होती. दीड हजार कुटुंबांच्या जीवनाला पुन्हा बळ देता आले, याचा त्यांना आनंद आहे.

कौटुंबीक वादात मुलांची ओढाताण होते. अशा मुलांचा मदतीसाठी काळे यांनी सतत पुढाकार घेतला. या मुलांच्या शैक्षणीक शुल्कापासून मानसिक आधार देण्यापर्यंतचे काम त्या करतात. मुलींनी स्वसंरक्षणाचे धडे गिरविले पाहिजे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. 20 पेक्षा जास्त शाळा-महाविद्यालयांत जाऊन मुला-मुलींच्या जागरुकतेसाठी व्याख्याने दिली आहेत. त्यांनी दामिनी पथक, निर्भया पथक, दिलासा सेल येथेही कामगिरी बजावली आहे. त्यांनी छेडछाडीचे गुन्हे हताळताना अनेक प्रकरणांचा शिक्षेपर्यंंत पाठपुरावा केला आहे.

नोकरी म्हणजे केवळ शासनाने ठरवून दिलेले काम नाही. तर ते काम करताना त्यात गुणवत्ता व आपल्या मनाला आत्मिक समाधान लाभले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो. ही जाणीव मनातून आली पाहिजे. तेव्हा कामात सुसुत्रता येते. अशा विचारांनी त्यांना नेहमी काम करण्यास प्रेरीत केले आहे. काळे यांनी स्त्री जीवनावर चांगला अभ्यास करून काही लेख लिहिले आहेत. जगात संसार नावाची गोष्ट शक्यतो कोणी टाळू शकत नाही.

त्यातील जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला तर कौटुंबीक कलह निर्माण होतो. त्याचे तोटे प्रशासन, कुटुंब, मुले, नातेवाईक अशा अनेकांना कसे सोसावे लागतात. यावर त्यांनी एक अहवाल केला, असून तो शासनजमा केला आहे. त्यातून प्रशासनाची व कुटुंबाची भूमिका काय असावी, याचे विवेचन त्यांनी मांडले आहे. प्रशासकीय कामासोबत त्यांची सामाजिक दृष्टी नक्कीच कौतुकास्पद आहे.

LEAVE A REPLY

*