अहमदनगर (कर्मयोगिनी) : डॉ. लीलाताई गोविलकर – शब्द लीलामृत !

0

अहमदनगर
कार्य – महाराष्ट्र शासन दासोपंतांचे समग्र वाङ्मय प्रसिद्ध करणार आहे. त्या संपादन समितीवर लीलाताई कार्यरत. ‘आनंदघन’वर संपादक मंडळात आहेत. मसाप तसेच शहर सहकारी बँकेवरही त्यांनी काम केले आहे. गट : कला-साहित्य 

इंग्रजी भाषेपेक्षा मराठी अवघड आहे. हे खरे वाटत नसलेल्यांनी उचित उकार, वेलांटीनिशी मराठीत चार ओळी लिहून दाखवाव्यात. तेव्हा कळेल मराठीचे पाणी. मराठीत पांडित्य मिळवणे सोपी गोष्ट नाही. नगरच्या लीलाताई व्याकरणावर अधिकार वाणीने बोलतात आणि त्यावर पुस्तके, ग्रंथ लिहितात. ही पुस्तके मराठीचे अभ्यासकच नव्हे तर एमपीएससी, यूपीएससीचे विद्यार्थीही पठण करतात. ताईच्या पुस्तकांमुळे स्पर्धा परीक्षेत मोठी मदत झाली, असे दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील जाहीर भाषणात सांगतात. ताई 81 वर्षांच्या आहेत. तरीही त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. सारडा महाविद्यालयातून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ नागरिक मंचाच्या माध्यमातून मोठं काम सुरू आहे.

साहित्य, व्याख्याने, सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या लीलाताईंचा उत्साह वयाच्या 81व्या वर्षीही कमी झालेला नाही. हिंदीत जी जान के मेहनत म्हणतात ती डॉ. लीलाताईंनी मराठीच्या अभ्यासाबाबत केली. आयुष्यभर त्यांनी मराठी वाङ्मयाच्या माध्यमातून प्रभुत्व गाजविले. सावेडीभूषण म्हणून डॉ. लीलाताईंना मागे एकदा गौरविण्यात आलं. खरे तर त्या नगरभूषण आहेत. ही उपाधीही त्यांच्या वाङ्मयीन कार्याला खुजी करणारी ठरेल. कारण त्यांची ख्याती अवघी महाराष्ट्रभर आहे. त्यांच्या व्याकरणाच्या पुस्तकांचा संदर्भ मराठीचे अध्यापन करताना आजही दिला जातो. त्यांचे मराठी व्याकरणाचे पुस्तक वाचल्यावर कळते आपण कोणत्या कळेची मराठी भाषा बोलतो. संत साहित्यावरही त्यांचा मोठा अभ्यास आहे. ज्ञानेश्‍वरीचे वाङ्मयीन वैभव या ग्रंथाचे मोठे कौतुक झाले. या साहित्यकृतीस मोठा प्रतिसाद मिळतो आहे. संत एकनाथ, संत नामदेव यांच्या साहित्यावर त्या विवेचन करायला लागल्यावर श्रोते मंत्रमुग्ध होतात.

डॉ. लीलाताई आता पक्क्या नगरकर झाल्या असल्या तरी त्या मूळ आहेत मुंबईकर. विल्सन कॉलेजातून त्यांनी एम.ए. मराठी केलं आणि पीएचडीही मिळवली. नगरच्या सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी करीत असताना त्यांची कारकीर्द फुलली. त्या विदुषी म्हणून नावारूपाला आल्या. कडक शिस्तीच्या आणि हुशार प्राध्यापक म्हणून त्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित होत्या. त्यांचा दबदबा आणि भीतीही आहे, मात्र आदरयुक्त. त्यांचे व्याख्यान म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा झराच असायचा. अध्यापन करताना मिळणारे संदर्भ साहित्य तोकडे आहे, हे निदर्शनास आल्यावर लीलाताईंनी स्वतःच पुस्तके लिहिली. त्याचा नगरमधील विद्यार्थ्यांनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील अभ्यासकांनाही फायदा झाला. प्राध्यापक मंडळीही त्यांची पुस्तके फॉलो करतात.

ज्ञानेश्‍वरी हा त्यांचा आवडता विषय. त्या तासनतास विवेचन करण्यास तयार असतात. आजही निवृत्तीनंतर त्या ज्येष्ठ नागरिक मंचातील महिलांसाठी प्रेरणास्थान आहेत. एकनाथ, नामदेव, रामायण, महाभारतातील दाखले देऊन आधुनिक जगाशी त्या सांगड घालतात. आजही दररोज दीड तास त्यांचा वाग्यज्ञ सुरू असतो.महाराष्ट्र शासन दासोपंतांचे समग्र वाडमय प्रसिद्ध करणार आहे. त्या संपादन समितीवर लीलाताई आहेत. आनंदघनवर त्या संपादक मंडळात आहेत. मसाप तसेच शहर सहकारी बँकेवरही त्यांनी काम केले आहे. त्यांनी लिहिलेली पुस्तके स्पर्धा परीक्षेसाठीही उपयुक्त ठरत आहेत. थेट पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे यांनीही जाहीररित्या त्यांच्या पुस्तकांचे कौतुक केले आहे.

लीलाताई निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या कार्यकाळात अनेक विद्वान व्याख्यात्यांच्या व्याख्यानांची मेजवानी नगरकरांना मिळाली. त्यांची ही व्याख्यानमाला नगरमध्ये चांगलीच गाजली. लीलाताई आता लेडिज होस्टेल चालवतात. स्वतःच्या लेकीसारखी माया लावून त्यांचा सांभाळ करतात. पण मुलींवर त्यांचा वॉचही असतो. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. या मुलींच्या माध्यमातून ताईंचे अनेक कुटुंबांशी नाते जडले आहे. मुली होस्टेल सोडून बाहेर पडल्यानंतरही ताईंचा आजही संपर्क आहे. साहित्य, शिक्षण, समाजसेवा या पलिकडेही डॉ. लीलाताईंचा परिघ विस्तारला आहे. मात्र, त्यांच्या शब्दांच्या लीला खरोखरच अनुभवण्यासारख्या आहेत.

LEAVE A REPLY

*