अहमदनगर (कर्मयोगिनी) : डॉ. सौ.ज्योत्स्ना पांडुरंग डौले – आधुनिक धन्वंतरी

0

एम.बी.बी.एस, डी.जी.ओ.
अहमदनगर
कार्य- महिलांसाठीही आरोग्य, आहार, व्यायाम व कॅन्सरबद्दल जागरुकता यासाठी अनेक ठिकाणी व्याख्याने, ‘बेटी बचाव बेटी पढाव चा प्रचार. गट : वैद्यकीय 

ज्योत्स्नाताईना वैद्यकीय व्यवसाय करत असताना जाणवले की, समाजात ‘वंध्यत्व’ ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. त्यावेळी घटस्फोट देणे, पुरुषांनी दुसरे लग्न करणे हे पाहून खूप ताईंना वाईट वाटले. याच जाणिवेने ताईंनी ‘टेस्ट ट्यूब बेबी’ तंत्रज्ञान परदेशात जाऊन अवगत केले. त्याचबरोबर दुर्बिणीतील शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञानही शिकल्या. 14 वर्षांपूर्वी नगर जिल्ह्यातील पहिले ‘मातृृत्व टेस्ट ट्यूब बेबी सेंटर’ सुरू केले. यापूर्वी नगर जिल्ह्यातील रुग्णांना मुंबई, पुणे येथे जावे लागे व खूप वेळ आणि पैसा खर्च होत असे. या तंत्रज्ञानाद्वारे अनेक अपत्यहीन जोडप्यांना अपत्यप्राप्ती होऊन त्यांच्या जीवनात आनंद नांदत आहे.

ज्योत्स्नाताईंचे माहेर औरंगाबाद. आई शिक्षिका व वडिल विद्यापीठात असल्यामुळे लहानपणापासून घरात शिक्षणाचे महत्त्व होते. आई शिस्तप्रिय स्वभावामुळे आम्हालाही प्रत्येक कामात शिस्तीची सवय लागली. सगळे कलागुणसुद्धा आईमुळे जपले गेले. 10 वी व 12 वी मेरिटमध्ये पास झाले व औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला. लहानपणापासूनच ग्रामीण भागाशी संबंध असल्यामुळे तेथील मुली व स्त्रियांच्या समस्या हळुहळू लक्षात येऊ लागल्या.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण होताच त्यांचा विवाह नगरचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. पांडुरंग डौले यांच्याशी झाला.राहुरी येथील प्रगतिशील शेतकरी श्री. मारूतराव डौले त्यांचे सासरे होत. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सहभाग होता. लग्नानंतर ‘स्त्रीरोग शास्त्रतज्ञ’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पुणे येथील के.ई. एम. रुग्णालयात घेतले. त्यानंतर दोघांनी खाजगी दवाखाना ‘डौले हॉस्पिटल’ अहमदनगर येथे सुरू केला. आज त्या एक प्रथितयश डॉक्टर आहे ते केवळ पती डॉ. पांडुरंग डौले यांचे सहकार्य व प्रोत्साहनामुळेच. घर मुले आणि दवाखाना या तिन्ही गोष्टी सांभाळणे अवघड जात होते. आणि मनातील सामाजिक कार्याची ओढही स्वस्थ बसू देत नव्हती त्यावेळी हॉस्पिटलमध्येच मोफत वैद्यकीय कॅम्प घेतले. वर्षभर अनाथश्रम, वृद्धाश्रम येथील रुग्णांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मो़फत उपचार व मोफत ऑपरेशन करण्यात येत होते.

वैद्यकीय व्यवसाय करताना स्त्रियांच्या अनेक आरोग्य समस्यांची जाणीव झाली. महिलांचे शारिरीक व मानसिक आरोग्य जपणे खूप महत्त्वाचे आहे हे लक्षात आले. म्हणून स्त्रीला निरोगी बनवायचे असेल तर लहानपणापासून तिचे आरोग्य उत्तम असावे या जाणिवेने किशोरवयीन मुलींसाठी अनेक व्याख्याने घेतली. वेगवेगळ्या शाळा व महाविद्यालयात जाऊन त्यांना आहार, व्यायाम, मासिक पाळीचे ज्ञान व स्वच्छता यावर व्याख्याने दिली. डिसेंबर 2017 मध्ये 500 मुलींसाठी सहकार सभागृहात एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. महिलांसाठीही आरोग्य, आहार, व्यायाम व कॅन्सरबद्दल जागरुकता यासाठी अनेक ठिकाणी व्याख्याने घेतली. लोणी, राहाता, केडगाव, सोनई, नेवासा, राहुरी याठिकाणी कॅन्सर निदानाचे कँप घेतले. बचत गटातील महिलांसाठी व्याख्याने घेतली. ‘बेटी बचाव बेटी पढाव’चाही प्रसार व प्रचार केला.

हे सगळे करताना त्यांनी डॉक्टरांच्या अनेक राष्ट्रीय, अंातरराष्ट्रीय परिषदांमध्येही भाग घेतला व व्याख्याने दिली. शिर्डी येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय स्त्रीरोग शास्त्र अचजॠड 2016 तज्ज्ञ डॉक्टरांची परिषद शिर्डी येथे आयोजित करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांतील 1200 स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांनी सहभाग घेतला. या परिषदेपूर्वी त्यांनी व त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी अनेक ठिकाणी स्त्रियांसाठी आरोग्यविषयक व्याख्याने घेतली.
सध्या ज्योत्स्नाताई अहमदनगर स्त्रीरोगशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष आहे. संघटनेने अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबविले आहेत. ताई कॅन्सर विभागाच्या राज्यप्रमुख आहेत. महिलांसाठी ताईनी कॅन्सरविषयक अनेक उपक्रम राबविले. सामाजिक उपक्रम घेतल्याने ताईंचा व नगर संघटनेचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्याबद्दल 2008 साली मधुरांगण सकाळतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्त्री संसाराचा महत्त्वाचा खांब असल्यामुळे स्त्रीने घरातील लोकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी स्वतः निरोगी राहावे यावर ताईंचा भर आहे. आहार व्यायाम व मानसिक आरोग्यावर प्रत्येकाने लक्ष द्यावे असा ताईंचा सर्व स्त्रियांना मोलाचा सल्ला आहे.

LEAVE A REPLY

*