Type to search

कर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- सालगड्याच्या मुलीची गरूडझेप

Share

प्रा. डॉ. गुंफा कोकाटे

 • गट- साहित्य
 • एम.ए,एम.फिल,नेट,
 • पीएच.डी(मराठी),
 • मराठी विभाग प्रमुख, कला व वाणिज्य महाविद्यालय, बेलापूर.
 • प्रकाशित साहित्य-
 • रानभरारी
 • मी सूर्याच्या कुळाची
 • वादळांना झेलताना
 • मौखिक ओवी गीतांचे स्वरुप
 • सावित्रीबाई फुले यांच्या कवितेचे स्वरुप
 • साहित्य संवाद
 • वांझोटे वार
 • मी जिंकत गेले आयुष्य (प्रकाशनाच्या वाटेवर)
ध्येय उराशी बाळगून पारनेर तालुक्यातील पळशीसारख्या दुर्गम भागातून नजरेत शिक्षणाच्या आभाळाचं एक सुंदर स्वप्न पाहिलं. दगडधोंड्यांच्या वेड्यावाकड्या वळणांवरून अनवाणी चालताना ध्येय पक्क होत गेलं. चिमणीच्या उजेडात अंधाराला बाजुला करत ज्ञानाची धगधगती मशाल घेऊन ध्येयवाद गाठला.

वडील अनेक मालकांच्या शेतात सालगडी होते. गुराढोरासारखे राबराब राबले. त्यांच्या या ढोरमेहनतीला मी माझ्यापरीनं समजून घेण्याचा प्रयत्न करीत ध्येयवादी राहिले. त्यांच्या घामाच्या प्रत्येक थेंबाला सलाम करण्यासाठी मी क्रांतीशिखा बनले. जीवनाला शिवत गेले. टाके घालताना सुई हातात टोचली. मन रक्तबंबाळ झाले पण कायम अढळ राहिले. ध्येय पूर्ण करण्यासाठी मी ऊन, वारा पावसाची पर्वा केली नाही. वादळांना झेलीत ठामपणे उभे राहिले. संयम सुटू दिला नाही. रोजगार हमी योजनेत नालाबल्डिंगची कामे केली. सरपण आणले,गोवर्‍या वेचल्या, कांदे लावणी, कांदे खुरपणी व कांदे काढणी केली. टिकाव, खोरे व घमेले घेऊन कष्टाची समिधा वाहिली. प्राथमिक शाळेनं मला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. ‘मी करू शकते आणि मी ते करेनच’ या आत्मविश्वासाच्या जोरावर वाटचाल झाली. माझ्या ज्ञानासाठी, कामांसाठी मी वादळांशी झुंजत राहिले. जिद्द बाळगून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मी सालगड्याची मुलगी असूनही सकारात्मक प्रवास केला. यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. अडचणींना तोड नव्हती. आवतीभोवती खोट्यांचे जग होते. कातडीबचाऊ, मुखवटे पांघरलेले, ओठात एक पोटात एक अशी अक्कड असणारे होते, भेदभावाचे राजकारण करणारे होते. तोंड पाहून काम करणारी स्वार्थी जनता होती. संघर्षाच्या वाटेवर काटे पेरणारे अनेक जण भेटले. उभ्या आयुष्याचा वणवा सोसत गेले. संकटांवर मात करीत गेले. अतोनात संघर्ष करावा लागला.त्यातूनच कर्तृत्वाला अवकाश मिळत गेला. एक अस्मितेचं, स्वातंत्र्याचं, माणुसपणाचं, ज्ञानाचं आभाळ मिळाले. माझ्या भविष्याला आकार मिळाला. आयुष्यात प्रत्येक पायरीवर नवे धडे शिकायला मिळाले.

पहिली ते सातवी पळशी, आठवी ते दहावी वासुंदे, अकरावी-बारावी विद्याधाम प्रशाला शिरूर (प्रथम क्रमांक), पदवीचे शिक्षण चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर (प्रथम श्रेणी), पदव्युत्तर शिक्षण मराठी विभाग पुणे विद्यापीठ येथे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. 1999 ला नेट परीक्षा पास झाले आणि आयुष्य नीट व्हायला लागले. 4 सप्टेंबर 2000 पासून मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या हडपसर आकुर्डी,नसरापूर,ओतूर या विविध शाखांमध्ये प्राध्यापिका म्हणून तीन वर्षे काम केले. अमृतेश्वर कला महाविद्यालय, विंझर येथे तात्पुरत्या जागेवर काम केले. उमेदवारीची तीन वर्षे काम केल्यानंतर मी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथे 20 ऑगस्ट 2003 मध्ये नियमित सेवेत येऊन विद्यापीठ नियमानुसार रुजू झाले. 14 नोव्हेंबर 2003 मध्ये या महाविद्यालयाची पहिली पीएचडीधारक महिला प्राध्यापिका झाले. 2015 मध्ये सहयोगी प्राध्यापिका झाले. गेले 19 वर्ष अध्यापनाचे कार्य इमाने इतबारे करीत आहे. आय क्यू ए सी समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, परीक्षा विभाग चेअरमन, बहिःशाल केंद्रकार्यवाह, महिला सक्षमीकरण, अंतर्गत तक्रार समितीची प्रमुख,अ‍ॅण्टी रॅगिंग, एक गाव एक परिवार अशा विविध समित्यांमध्ये सक्षमपणे काम केले.अंतर्गत गुणवत्ता समितीची समन्यक म्हणून कार्य करत असताना महाविद्यालयाला नॅक मानांकनात बी ग्रेड मिळाली याचा आनंद आहे.

आयुष्यात मला भरभरून यश मिळाले, यशाचा कैफ मी अनुभवला.पण प्रचंड दमछाक झाली, परिस्थिती खूप प्रतिकूल होती. माझे म्हातारे आई-वडील माझ्या ध्येयाच्या केंद्रस्थानी होते. भाऊ नव्हता. कमवा आणि शिका योजनेतून शिकले. स्वावलंबनातून शिक्षण केले, वादविवाद, कविता वाचन, वक्तृत्व अशा अनेक स्पर्धा जिंकल्या. या अफाट यशाची धनी झाले. या कष्टामागे माझ्या आई-वडिलांची पुण्याई आहे. त्यांनी आम्हा बहिणींना शिकविण्यासाठी आयुष्यभर सालं घातली. रक्ताचे पाणी करून शिकविले. विद्यापीठात शिकताना रविवारी रात्री अनेकदा उपाशी राहिले. पाणी पिऊन भूक मारली, झोपून भूक मारली पण अनेकदा पोटात अन्नाचा कण नसेल तर झोप येत नाही, अशा भूकेनं तडफडत रात्रीच्या रात्री काढल्या. पण हे दिवस बदलू या आशेवर उच्चशिक्षणाचा मोठा टप्पा पूर्ण केलाय. उकिरड्याचा सुद्धा पांग फिटतो आपण तर हाडामासाची जितीजागती माणसं आहोत. आता स्थिरस्थावर झालेय. 19 वर्ष अध्यापन सेवा झाली, अनेक विद्यार्थी विविध पदांवर काम करीत आहेत याचे समाधान आहे. 8 पुस्तके लिहून झालीत. 2007 पासून पुणे विद्यापीठाच्या संशोधक मार्गदर्शक म्हणून काम करते. 12 विद्यार्थी एमफिल झाले, 2 पीएचडी करीत आहेत.करिअरसाठी खूप खस्ता खाव्या लागल्या, मग नोकरी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला, नोकरी लागल्यानंतर ती टिकवण्यासाठीही संघर्ष सहन करावा लागला, गेली अनेक वर्षे अन्यायाची परिसीमा गाठणारी भ्रष्ट विषम व्यवस्था अनुभवली,पाठीवर वांझोटे वार करणारे भ्याड भेटले तसे पोटावर पाय देणारे महाभाग भेटले. आणि मग अन्याविरुद्ध पेटून उठले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वसा घेऊन न्यायाची, स्वाभिमानाची, सत्याची, खरेपणाची, स्वत्वाची,समतेची, समानतेची प्रामाणिकपणे लढाई लढते आहे.

मिळालेले पुरस्कार – 1)विद्यारत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2008, 2)संत कबीर काव्यसरिता राज्यस्तरीय पुरस्कार 2012, 3)शिवांजली साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2014, 4) पद्मा मोरजे राज्यस्तरीय पुरस्कार 2014, 5)शांता शेळके साहित्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2018, 6) सावित्रीबाई फुले उपक्रमशील शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार (दोनदा2017/2018), 7) जिजाऊ स्री सन्मान तालुकास्तरीय पुरस्कार 2017, 8) मराठा भूषण राज्यस्तरीय पुरस्कार 2018 अशा अनेक पुरस्कारांनी समाजाने सन्मानित केले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!