कर्मयोगिनी- नगरची सुरमयी स्नुषा

0

डॉ. धनश्री मकरंद खरवंडीकर

  • गट- कला व संस्कृती
  • अहमदनगर
  • गानहिरा पुरस्कार, सुलोचना नातू ट्रस्ट पुरस्कार, हरिओम ट्रस्टतर्फे संगीता वसंत बेंद्रे पुरस्कार
  • श्रृती संगीत निकेतनच्या संचालिका
कालाकार जन्माला यावा लागतो असे म्हणतात, पण कलाकारांच्या घरात जन्माला येणं, संगीताचा उपजत वारसा लाभणं हे खूप मोठे भाग्य असते. संगीत क्षेत्रात एक एक शिखरे पादाक्रांत करणार्‍या डॉ. धनश्री खरवंडीकर यांचा हा प्रवासही चकित करणारा आहे.

माहेरी त्यांच्या आई सतार शिकत असे आणि वडिलांना संगीताची आवड होती. यापेक्षा फार काही संगीताचे वातावरण घरात नव्हते. म्हणायला करवीरपीठाचे शंकराचार्य जगत्गुरू विद्याशंकरभारती (लोकप्रिय कीर्तनकार रामचंद्रबुवा कव्हाडकर) हे डॉ. धनश्री यांच्या वडिलांचे काका होते. रामचंद्रबुवा कव्हाडकर यांचे वडिल प्रसिध्द कीर्तनकार नरहरीबुवा कव्हाडकर हे थोर गायक भास्करबुवा बखले यांचे शिष्य होते. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून ही स्वरगंगा पाझरत आली असावी, एवढेच म्हणता येईल. आईवडिलांना असणारी संगीताची विलक्षण आवड, त्यांनी कायम डॉ. धनश्री यांना दिलेले प्रोत्साहन यामुळे त्यांची सांगितिक वाटचाल आधिकाधिक सुरेल होत गेली.

डॉ. धनश्री यांना संगीताची आवड आहे, किंवा त्या उपजत सुरांसहच जन्माला आल्या आहेत, हे लक्षात आले ते त्या अगदी सहा वर्षाच्या असतांनाच. आंतरशालेय गायन स्पर्धेत इयत्ता पहिलीत असताना त्यांनी एक बालगीत सअभिनय सादर केलेे. त्या बालगीताला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. त्यातूनच खरी गाण्याची आणि अभिनयाची चुणूक आईवडिलांना जाणवली. वडिलांच्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक असल्याने त्या पुण्यातील नामवंत हुजूर पात्रा शाळेत शिक्षण घेत होत्या. त्यांच्यावर संगीताचे संस्कार व्हावे यासाठी संगीताचे योग्य शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे डॉ. भाग्यश्री नातू म्हणजे डॉ. धनश्री यांच्या मावशींनी सुचविले. मावशीच्याच परिचयाच्या असलेल्या ज्येष्ठ गायिका अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्याकडे नाट्यसंगीताचे शिक्षण वयाच्या 9 व्या वर्षापासून घ्यायला सुरूवात केली.

गंधर्वगायकी वारसा अविरतपणे जपणार्‍या शिलेदार कुटुंबियांच्या सहवासात डॉ. धनश्री यांना गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार, लता शिलेदार उर्फ दिप्ती भोगले या सर्वांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत गेले. शिलेदारांच्या मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अनेक संगीत नाटकांमध्ये (सौभद्र, मानापमान, कान्होपात्रा, संशयकल्लोळ, स्वरसम्राज्ञी) कीर्ती शिलेदार यांच्याबरोबर अनेक छोट्या मोठ्या भूमिका करण्याची संधी मिळत गेली. त्यामुळे खर्‍या अर्थाने अभिनय आणि संगीत दोन्हींचे शिक्षण जवळून घेता आले. त्यामुळे संगीत, नाटक आणि नाट्यसंगीत हा त्यांचाही जिव्हाळ्याचा विषय बनत गेला. हार्मोनियम वादनाचेही प्राथमिक शिक्षण जयमाला बाईंकडूनच घेतले. पुढे अभिजात शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेण्याचे ज्येेष्ठ कीर्तनकार दत्तदासबुवा घाग यांनी सूचविले. नववीत असतांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण घ्यायला सुरूवात केली.

गुणवर्धिनी संगीत विद्यालयाच्या संचालिका आणि शास्त्रीय संगीत गायिका सौ. हेमा गुर्जर यांचेकडे डॉ. धनश्री यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. प्रारंभिक ते विशारदपर्यंतच्या आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या हार्मोनियम आणि गायन दोन्ही परीक्षा विशेष योग्यतेसह संगीत विशारद पदवी संपादन केली. पुढे संगीत अलंकार (गायन, हार्मोनियम) आणि एस. एन. डी. टी महिला विद्यापीठातून संगीत विषयात एम. ए. पदवीही संपादन केली. संगीत अलंकार (हार्मोनियम) मध्ये भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकाविला. त्यासाठी गानहिरा पुरस्कार माधवी सिन्हा रॉय, प्रभाकर साने, शंकरराव व्यास पुरस्कार, सुलोचना नातू ट्रस्ट पुरस्कार, हरिओम ट्रस्टतर्फे संगीता वसंत बेंद्रे पुरस्कार अशी अनेक पारितोषीके डॉ. धनश्री यांना मिळाली. एम. ए. संगीत करत असतानाच विद्यापीठाच्या युवा संगीत महोत्सवात मुंबईला गायची संधी मिळाली. त्यावेळी शास्त्रीय संगीताची तयारी करून घेण्यासाठी आग्रा घराण्याचे गायक आणि किर्ती शिलेदार यांचे गुरू पं. नीळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. पुणे आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार म्हणूनही त्यांची निवड झाली.

आकाशवाणीबरोबरच गोवा, दिल्ली, गुजरात, कोकण, सांगली, जळगाव, कोल्हापुर, पारनेर, मुंबई याठिकाणी त्यांनी संगीताचे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले. एम. ए. च्या व्दितीय वर्षात शिकत असताना अहमदनगर येथील मकरंद खरवंडीकर यांच्याशी त्या विवाहध्द झाल्या. संपुर्ण खरवंडीकर कुटुंब संगीतातील असल्यामुळे तेथेही डॉ. धनश्री यांना प्रोत्साहन मिळत गेले. गेली आठ वर्षे श्रृती संगीत निेकेतनच्या संचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रारंभिक ते अलंकार परीक्षा तसेच बी.ए., एम. ए परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करत आहेत. नगरला त्यांच्याकडे आखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे परीक्षा केंद्र असून केंद्र व्यवस्थापक मकरंद खरवंडीकर आणि सह केंद्र व्यवस्थापक म्हणून डॉ. धनश्री कार्यरत आहेत.

विवाहानंतर नाट्यसंगीत विषयात डॉक्टरेट पदवी संपादन केली. अहमदनगर जिल्ह्यात संगीत विषयातील पहिल्या महिला डॉक्टरेट होण्याचा मान त्यांना मिळाला. विविध संगीत नाटकांतील प्रवेश, संगीत संशयकल्लोळ आणि संगीत एकच प्याला नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. महाराष्ट्र शासनाच्या 56 व्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सांगली येथे नगरच्या श्रुती संगीत निकेतनने सादर झालेले संगीत संशय कल्लोळ तसेच 56 व्या संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेत भरत नाट्य मंदिर, पुणे येथे श्रुती संगीत निकेतनने राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डॉ. देवीप्रसाद खरवंडीकर यांनी लिहिलेल्या अपुर्वयोग:1 या संस्कृत नाटकाचे सादरीकरण केले. 58 व्या संगीत राज्य नाट्यस्पर्धेचे पारितोषिकही मिळविले. अहमदनगर येथे झालेल्या 58 व्या संगीत राज्य नाट्यस्पर्धेचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. नाट्य संगीतातील कार्याबद्दल डॉ. धनश्री यांना आखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे वसंत देसाई पुरस्कार, स्वरानंद प्रबोधीनीतर्फे स्वरानंदभूषण पुरस्कार, आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विशेष अभ्यासक गौरव पुरस्कार, जयराम शिलेदार ट्रस्ट नाट्य प्रवेशासाठी विशेष लक्षवेधी गायिका आभिनेत्री पारितोषिक, दिल्ली येथे झालेल्या 28 व्या बृहन्महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत गंधर्व भूषण, जयराम शिलेदार ट्रस्ट यांच्यातर्फे सादर केलेल्या सं-शाकुंतल नाटकातील प्रियवंदा या भूमिकेसाठी विशेष प्रशंसनाचे पारितोषिक, जयराम शिलेदार करंडक स्पर्धेत एस. एन. डी. टी. महाविद्यालयाने सादर केलेल्या संगीत अनवट नाटकातील भूमिकेसाठी उत्कृष्ट गायिका अभिनेत्रीचे प्रथम पारितोषिक, याशिवाय विविध नाट्यसंगीत स्पर्धा, कै. गोविंदराव टेंबे स्मृती स्पर्धा, अण्णासाहेब कराळे ट्रस्टसह अनेक स्पर्धांमध्ये त्यांच्यावर पारितोषिकांचा वर्षाव होत होता.

डॉ. धनश्री श्रुती संगीत निकेतनबरोबरच संस्कारभारतीच्या अहमदनगर शाखेच्या उपाध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. श्रुती संगीत निकेतनच्या खजीनदार म्हणून त्या कार्यरत आहेत. डॉ. धनश्री यांची संगीतविषयक लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत कलाविहार या मासिकात त्यांचे संगीतविषयक अनेक लेख प्रसिध्द झाले आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या साहित्य पत्रिकेत त्यांचे नाट्य संगीतविषयक लेख आहेत. साप्ताहिक विवेक (मुंबई) यांच्यातर्फे प्रकाशित केलेल्या शिल्पकार चरित्रकोष या ग्रंथात संगीताच्या बुजुर्ग कलाकारांविषयींचे लेखनही त्यांनी केले आहे. बालगंधर्व रसिक मंडळ, पुणे संस्थेच्या स्मरणीकेतही लेखन केलेले आहे. नुकतेच सं. एकच प्याला या नाटकातील संस्कृतप्रचूर नाट्यपदाचा अर्थ उलगडून दाखविणारे डॉ. धनश्री खरवंडीकर लिखित कशिया त्यजु पदाला हे पुस्तक श्रुती संगीत निकेतनतर्फे प्रकाशित झाले आहे. नगर येथील ज्येष्ठ साहित्यीक डॉ. अनिल सहस्त्रबुध्दे लिखीत मन मेघा रे या खरवंडीकर रचित गीतरंग या बंदिशींच्या शास्त्रीय संगीतातील सीडीमध्ये डॉ. धनश्री यांनी गायन केले आहे. सध्या पुणे येथील एस. एन. डी. टी. विद्यापिठात पदव्युतर संगीत विभागात एम. ए. (संगीत) विषयासाठी अभ्यागत व्याख्यात्या म्हणून गेली 11 वर्षे त्या कार्यरत आहेत.

 

LEAVE A REPLY

*