कर्मयोगिनी- चारचौघीतील तडफदार दीपा

0

दीपा रासने-बिहाणीे

  • अहमदनगर
  • गट- उद्योग
  • संचालिका, पूजा स्टॅम्पिंग प्रा. लि.
उच्च शिक्षित कुटुंब, सारे कसे हसत खेळत, सुखा समाधानाने चालले असतानाच नियतीने घाला घातला. वडिलांचे छत्र अचानक गेले. घरात उरल्या चौघीजणी. आई आणि तीन मुली. अभियांत्रिकीचा पहिलाच पेपर वडील गेल्याने देता आला नाही. मात्र त्यानंतर दुःख झटकून कामाला लागलेली आई आणि तिचे हे धारिष्ट्य पाहून तेवढ्याच तडफेने उभी राहिलेली मोठी कन्या. या कन्येने उद्योग जगतात स्वतःचे नाव करताना आपल्या उत्पादनाचा ब्रँड केला. उद्योजिका दिपा रासने-बिहाणी यांचा हा जीवनप्रवास अंगावर काटा आणणारा जसा आहे, तसाच तो अनेकांना मार्गदर्शकही आहे.

एमआयडीसी मधील पूजा स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संचालिका, सर्वेसर्वा असलेल्या दिपा रासने-बिहाणी अनेक संकटांचा सामना करत अथक परिश्रमाने त्यांनी हे विश्‍व उभे केले. वडील स्व. दिलीप जी. रासने व आई श्रीमती सुनंदा दिलीप रासने दोघेही नगरचेच. सेंट्रल एक्ससाईजमध्ये सुप्रिटेंडन्ट पदावर कार्यरत असलेले. त्यांना तीन मुली. सर्वात मोठी दिपा, नीता व सर्वात लहान सोनाली. वडिलांचे व्यक्तिमत्त्व अतिशय तडफदार, हुशार आणि समाजात मोठी उठ बस असणारे. सतत लोकांच्या उपयोगी पडणारा माणूस अशी त्यांची ओळख होती. घरातले वातावरण खेळीमेळीचे. तीन मुली असल्या तरी मुलगा नाही, म्हणून कधीच त्यांना उणीव भासली नाही. मुलगी आणि मुलगा हा भेदभाव कधीच केला नाही. मुलीने आमकी गोष्ट करू नये म्हणूनही कधी विरोध केला नाही व तशा मर्यादा देखील घातल्या नाहीत. बालपणापासूनची जडण घडण मुलासारखीच झालेली. क्रिकेट, गोट्या, भोवरे हे त्यांचे खेळ. मुलींचा आवडीचा असलेला भातुकलीचा खेळ त्यांना कधी माहितच नव्हता.

वडील एम. एससी. केमेस्ट्री व आई एम. ए. इंग्लिश. त्यामुळे घरात शिक्षणाला विषेश महत्त्व. आजही शिक्षणाला तेवढेच महत्त्व दिले जाते. दिपा रासने-बिहाणी यांचे शिक्षण पदविका यंत्र शाखा गर्व्हमेंट पॉलिटेक्निकमध्ये झाले.पदवी विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात घेतली. पदविका शिक्षणातील पहिले वर्ष इंस्ट्रुमेंटेशन शाखेत झाले. दुसर्‍या वर्षी मेकॅनिकल शाखेच्या प्रवेशासाठी अर्ज केला. मॅकेनिकल शाखा मुलींसाठी नसते, असे सांगत सरांनी वडिलांना संपर्क साधला. मात्र वडिलांनीही तिला मॅकेनिकललाच प्रवेश द्यावा, असे ठामपणे सांगितले. त्यामागे त्यांचा असलेला दूरदृष्टीकोन यथावकाश लक्षात आला. मॅकेनिकल करत असताना वर्गात 95 टक्के मुले आणि अवघे पाच टक्के मुली होत्या. बीई पर्यंतच शिक्षण व्यवस्थित पार पडले. सर्व काही सुरळीत सुरू होते. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होत. इंजिनिअरींगच्या दुसर्‍या वर्षाला असताना वडिलांचे छत्र हरपले.

कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. वडिलांचे निधन झाले त्यादिवशी शेवटच्या वर्षाचा पहिला पेपर होता. वडिलांच्या निधनामुळे तो पेपर देता आला नाही. दुसर्‍या दिवशी सुट्टी होती आणि तिसर्‍या दिवसापासून परीक्षा दिली आणि उत्तीर्णही झाल्या. अर्थातच हे सारे सोपे नव्हते. वडील गेल्यामुळे घरात चार महिला उरल्या होत्या. त्या वेळेस दुसर्‍या क्रमांकाची बहीण बारावी आणि धाकटी सोनाली दुसरीत होती. एवढ्या कठीण काळात आईने दाखविलेली हिम्मत वाखाणण्याजोगी होती. आईने वडिलांची जाणीव कधी होऊच दिली नाही. आईने दोन्हीही भूमिका मोठ्या जिगरबाजीने पार पाडल्या. वडिलांच्या अंत्यविधीला दिलेला खांदा आणि अग्नी आजही तिघी बहिणींच्या डोळ्यासमोर जसाच्या तसा आहे. मुलगा नाही म्हणून कोणताही विधी चुकला नाही. आयुष्याची खरी कसरत वडील गेल्यावर सुरू झाली. कठीण समय येता कोण कामास येतो याचीही प्रचिती आली. मृत्यूसमयी वडिलांनी आईला कंपनीकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यावेळी कंपनीची फक्त नोंदणी झाली होती. एक प्रेस मशीन आणि एक टूल एवढच काय ते होते. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने पडेल ते काम करण्याची तयारी ठेवली.

आईने स्वेच्छा निवृत्ती घेतली. हातात काहीही दुसरे उत्पन्न नसताना घेतलेला तो निर्णय धाडसीच म्हणावा लागेल. आज केवळ आईच्या हिम्मतीमुळे इथंपर्यंत पोहोचल्याचे दिपा आवर्जून सांगतात. वडील गेल्यानंतर पहिल्यांदाच दिपा आपल्या धाकट्या बहिणीसोबत कंपनीत आल्या. शटर उघडल्यानंतर आत जाळे जळमटं आणि धूळ याशिवाय काहीही नव्हते. डस्टबीनमध्ये पडलेल्या कागदाच्या तुकड्यावरून कंपनीचे नाव शोधले. जिद्दीने उतरलेल्या दिपा यांनी कंपनीच्या उत्पादनासाठी पहिले ग्राहक शोधले. हे सर्व करत असताना नातेवाईकांनी कंपनी विकण्याचा सल्ला दिला. ‘मला एकदा प्रयत्न करू द्या, नाही जमले तर पुढचे पुढे पाहू’, असे सांगून दिपा यांनी ती वेळ मारून नेली.

स्वेच्छा निवृत्तीनंतर आईने कंपनीचा पदभार हाती घेतला. एका एका गोष्टीचा अभ्यास चालू होता. मटेरियल कुठून मागवायचे, कसे मागवायचे, कुणाला विकायचे, ह्या सर्व गोष्टीचा ताळमेळ घालण्यात बरीच वर्ष खर्ची पडली. दरम्यानच्या काळात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाले. नीता पुण्याला एमसीएस करत होत्या. सोनाली यांचे माध्यमिक शिक्षण सुरू होते. जसे दिवस सरत होते, तसे बर्‍या वाईट अनुभवाचे गाठोडे वाढत चालले होते. अनेक बर्‍या वाईट प्रसंगांना आई खमकेपणाने सामोरे जात होत्या. कठीण प्रसंगात समाज वगैरे, संकल्पना भ्रामक ठरतात. कुणीही कुणाचे नसते याची प्रचिती वेळो वेळी येत राहते. प्रॅक्टिकल लाईफ जगण्याचा मार्ग आईनेच दाखविला. कंपनीत एक एक ग्राहक जोडत गेलो. काही माणसं अगदी देवासारखी भेटली, त्यांनी खूप साथ दिली. काहींनी तर महिला काम करतात म्हणून प्रोत्साहनही दिले.

काहींनी मात्र फसवले. अशा प्रसंगातूनच माणूस घडतो, असे म्हणत आलेल्या प्रसंगाला सामोरे जात राहिल्या. पुढे दिपा रासने यांचे लग्न झाले आणि त्या बिहाणी कुटुंबात गेल्या. सासर्‍यांच्या प्रेमळ स्वभावाने वडील नाहीत याचे दुःख कमी झाले होते. सासरकडील कौतुक करावे तेवढे कमी आहे. पती योगेश बिहाणी केवळ दिपा यांच्यासाठी अहमदनगरला स्थायिक झाले. ते त्यांचा खाद्यतेलाचा व्यवसाय पाहतात व कंपनीकडे लक्ष देता यावे म्हणून सासू, सासरे व कुटुंबातील इतर सदस्य दिपा यांना सहकार्य करतात. कालांतराने पूर्वजाच्या रूपाने कन्यारत्न प्राप्त झाले. तिला सांभाळत कंपनीचा कारभार दिपा हाताळतात. आज कंपनीत दहा ते पंधरा जण अतिशय आनंदी वातारणात काम करतात. कंपनीतले कामगारही जुनेच. त्यांनीही पडल्या काळात कंपनीत खूप साथ दिली आणि आजही त्यांची साथ तेवढीच मोलाची ठरत आहे.

काळ कुणासाठी थांबत नाही. आज कंपनी एका चांगल्या पायरीवर उभी आहे. बहीण नीता व आईच्या साथीने दिपा आज समर्थपणे कंपनीचा कारभार पहात असून, विश्‍वासार्ह व्यवसाय करत आहेत. पूजा स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव पुढे न्यायचे, हेच वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न उराशी बाळगून झटत आहेत. कंपनीचे हे यश पाहण्यासाठी वडील नसल्याचे दुःख त्यांना आहेच, पण त्यांची प्रेरणा आयुष्यभरासाठी साथ देईल, असा विश्‍वासही आहे. हे सर्व करत असताना आईचा आध्यात्मिक वारसा जपण्याचा मनापासून प्रयत्न होत आहे.

LEAVE A REPLY

*