Type to search

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- (अ‍ॅड. सौ.धोर्डे) पक्षकाराच्या आनंदात आनंद मानणार्‍या

Share

अ‍ॅड. सौ. चारूशिला शंतनू धोर्डे

  • गट-विधी-न्याय
  • कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर
  • अन्यायग्रस्त महिलांना मोफत कायदेशीर मदत
  • महिलांच्या हक्क व सुरक्षेसाठी सामाजिक उपक्रमांमध्येसहभाग
  • गोरगरिबांना न्याय देण्यासाठी सतत लढा.
आईने मुलीच्या संसारात केलेल्या हस्तक्षेपामुळे अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आज समाज व्यवस्था ढासळलेली आहे. कुटुंबव्यस्थेत चांगले संस्कार व्हावेत यासाठी आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आई-वडिलांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. आई-वडिलांनी मुलीच्या संसारात डोके घालू नये. तिला उकृष्ट पत्नी, सून, गृहिणी या भूमिका पार पाडू द्याव्यात, असा सल्ला कोपरगाव येथील अ‍ॅड. सौ.चारूशिला शंतनू धोर्डे यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे जन्म झाला. वडील त्र्यबंकराव माधवराव गुंजाळ पेशाने वकील असल्याने लहानपणापासूनच कुटुंबात शिस्तीचे वातावरण होते. आम्ही तिघे भावंडे. मोठा भाऊ वकील तर लहान भाऊ उद्योजक. घरात खेळीमेळीचे वातावरण असल्याने निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होेते. मी 12 वी पर्यंतचे शिक्षण निफाड येथे पूर्ण केले. त्यावेळी बरोबरच्या मैत्रीणींचे लग्न झाले. माझ्याही लग्नाबाबत घरी चर्चा सुरू झाली. आई सुमनबाई ही चौथी शिकलेली. तिने मात्र माझ्या लग्नाला विरोध केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच लग्नाचा विचार करू असे तिने वडिलांना व भावंडांना सांगितले. त्यानंतर मोठ्या भावासोबत मी नाशिक येथील एनबीटी विधी महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच मी निफाड येथील न्यायालयात वकिलीची प्रॅक्टीस सुरू केली. चौथी शिकलेल्या आईने घेतलेल्या निर्णयामुळे मला स्वतःच्या पायावर उभं राहता आले.

1993 साली कोपरगावचे प्रसिध्द विधीज्ञ शंतनू धोर्डे यांच्याशी विवाह झाला. सासरे वकील असल्यामुळे धोर्डे परिवारात आल्यानंतर प्रॅक्टीस करण्यास अडचण आली नाही. सासूबाई कमलताई यांनी घरची जबाबदारी घेत मला कोर्टात प्रॅॅक्टीस करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तर पती शंतनू धोर्डे हे पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने आज कोपरगाव न्यायालयात वकिली पेशाच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिल्याचे मोठे समाधान मिळत असल्याचे अ‍ॅड. चारूशिला धोर्डे यांनी सांगितलेे.

चारूशिला धोर्डे यांनी अनेक निराधार, गरजू, परितक्त्या, महिलांना न्याय मिळवून दिला आहे. वकील फी चे पैसे देण्याची ऐपत नसणार्‍यांनाही त्यांनी कधी कार्यालयाचे दरवाजे बंद केले नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य पक्षकारांमध्ये त्यांच्याबद्दल एक आपुलकीची भावना आहे. छोट्या पुराव्याच्या आधारांवर गेलेल्या जमिनी परत मिळवून देणे असो किंवा त्रास देणार्‍या नवर्‍याला कायद्याचा धाक दाखवून महिलेचा संसार फुलविण्याचे कसब अ‍ॅड. चारूशिला यांनी सहज दाखवून वकीली व्यसायात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. याबाबत आठवणी सांगताना त्या म्हणाल्या, एक दिवस ती अचानक मुलासह आनंदात ऑफिसमध्ये आली. एकदम उत्साहात होती काय सांगू? किती बोलू असे झाले होते तिला. तिला मनसोक्त बोलू दिले. त्यापूर्वी काही वर्षापूर्वी ती तिच्या वडिलांसोबत मनाने खंगलेली, उदासवाण्या चेहर्‍याने आलेली मला आठवली. त्यावेळी तिच्या वडिलांनीच तिच्याबद्दल सर्व माहिती सांगितली.

व्यसनी नवरा, खाष्ट सासू. तिला मन, भावना, विचार आहेत हेच विसरुन तिने केलेला 11-12 वर्षांचा संसार पण आता तिच्या माहेरच्यांनाच तिची अवस्था बघवेना म्हणून वकिलांचा सल्ला घेऊ म्हणून ऑफीसला आलेली ती. तिने वडिलांना सर्व बोलू दिले. तिने काहीतरी बोलावे, सांगावे अशी माझी अपेक्षा. ती फक्त म्हणाली, मला संसार करायचा, मुलांसाठी त्या घरात राहायचंं, काहीही झालं तरी. तिचा निर्धार ऐकून तिचं कौतुक वाटलं. मरण्यापेक्षा जगण्याला जास्त हिम्मत लागते हेच मला तिच्याकडे पाहून जाणवले. यथावकाश तिच्या नवर्‍याला, सासूला न्यायालयाच्या आदेशाने बसलेला दणका, त्यांच्या वागणुकीत बदल करून गेला आणि आज सर्वच सुखात असल्याचे तिच्याकडे पाहून जाणवले. व्यवसायाच्या निमित्ताने आता किती तरी मुली, स्त्रिया, पुरुषही स्वत:चे प्रश्‍न घेऊन जेव्हा समोर येतात. त्यावेळी जाणवतात त्या वेगवेगळ्या समस्या. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती तसेच व्यक्ती तितक्या समस्या.

मग त्या वैवाहिक जीवनासंदर्भातील असोत, भावकीतल्या असोत, प्रॉपर्टी संदर्भातील असोत, मारामारी बद्दल असोत किंवा अगदी बांधाबाबत वकील म्हणून त्या समस्या ऐकून घेताना, त्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन करताना किंवा न्यायालयात बाजू मांडताना त्या प्रत्येक व्यक्तीने वकील म्हणून टाकलेला विश्‍वास आपल्यावर असलेल्या जबाबदारीचे भान ठेवण्यास शिकविते. अनेक खटल्याचे कामकाज पती अ‍ॅड. शंतनू धोर्डे यांच्यासोबत करण्याची संधी मिळाली. जेव्हा निकाल आपल्या पक्षकाराच्या बाजूने येतो तेव्हा त्याच्यासोबत वकील म्हणून स्वत:लाही समाधान देवून जातो. केवळ वहिच्या पानावर लिहून दिलेल्या पावतीच्या आधारे खरेदीखत करून द्यावे म्हणून दावा करून त्यासाठी न्यायालयात एका विधवा स्त्रीला मिळवून दिलेला न्याय नक्कीच मनाला आनंद देऊन जातो. पक्षकारासाठी प्रामाणीकपणे काम करणे हिच ऑफिसची शिस्त. अनेक मुलींचे संसार मार्गाला लावून काहींना स्वत:चे पायावर उभे राहण्यास प्रवृत्त करून समाधान मिळवता आले.

पक्षकाराच्या नवर्‍याचे अपघाती निधन झाल्यानंतर अपघात नुकसान भरपाईची रक्कम मिळाल्यानंतर त्या विधवेची होणारी मानसिक घालमेल, वृद्ध आईचा एकुलता एक मुलगा खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर त्या आईच्या भावना, वडिलांनी लहानपणी टाकून दिलेल्या मुलीला वडिलांच्या मिळकतीत हिस्सा मिळवून दिल्यानंतर तिच्या चेहर्‍यावरचा आनंद, खाष्ट बायकोपासून फारकत मिळाल्यानंतर नवर्‍याने सोडलेला नि:श्‍वास, मुलाकडून पोटगी नको त्याने फक्त माझेशी बोलावे, माझी विचारपूस करावी असे म्हणून वृद्ध पित्याने केलेली याचना, केवळ वडिलांच्या हट्टापायी मुलीचा संसार मोडता-मोडता वाचविल्यानंतर त्या मुलीच्या डोळ्यातून दिसलेला आनंद, असे कितीतरी अनुभव प्रोफेशनल फी पेक्षा नक्कीच आनंददायी आहेत. एखादी अलका जेव्हा म्हणते मॅडम तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य राहील तेव्हा तिने टाकलेला विश्‍वास सार्थ होण्यासाठी धडपड चालू असते.

मुलींनी या व्यवसायात यावे, वकिली क्षेत्र हे खूप विस्तारी असून अनेक चॅलेंजिंग कामे करता येतात. व्यवसाय सांभाळून समाजसेवा करता येते. अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देताना आपले कसब पणाला लावावे लागते. मात्र त्यातून पक्षकाराच्या चेहर्‍यावर दिसणारा आनंद पैशात मोजता येत नाही. वकिली पेशात येणार्‍या मुलींनी पैशाच्या मागे न लागता वकीली व्यवसायाकडे एक ‘नोबेल प्रोफेशन’ म्हणून पहावे. असे अ‍ॅड. सौ.धोर्डे म्हणतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!