अहमदनगर (कर्मयोगिनी) : अंजली अंगद गायकवाड – स्वरांजली !

0

गायिका, अहमदनगर.
कार्य – दूरचित्रवाहिन्यांवरील गाण्यांच्या रिअ‍ॅलटी शोद्वारे भारतीयांचे मन जिंकणारी हरहुन्नरी गायिका. वयाच्या 13 वर्षी गायनक्षेत्रात थक्क करणारा प्रवास. गट : कला-संस्कृती  

खेड्यातील मुलं शहरी मुलांपेक्षा कोणत्याच बाबतीत कमी नसतात. क्रीडा, शिक्षणासह प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दाखवून दिलं. कलेच्या प्रांतही त्याची प्रचित येत आहे. दररोज होणारे रिअ‍ॅलिटी शो, विविध स्पर्धांमध्येही ते दिसते आहे. अंजली गायकवाड या चिमुरडीने टीव्हीवरील संगीताची लिटिल चॅम्प स्पर्धा जिंकून देश आणि देशाबाहेरील संगीत क्षेत्राचे लक्ष वेधून घेतलं आणि नगरचं नाव मोठं केलं. मराठीतही ती संगीत सम्राट ठरली आहे. सचिन अ बिलियन ड्रीम या चित्रपटातही तिने गाणं गायलंंंय. आता तिचे महाराष्ट्रातच नव्हे तर देश-विदेशांत कार्यक्रम होतात. गायकीत इतकी माहीर आहे की तिच्या एका आलापाने मोठमोठ्या गवय्यांना वेडं व्हायला होतं. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी यशाच्या आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अंजलीचा सांगीतिक प्रवास आश्‍चर्यकारक आहे.

अंजली गायकवाड या चिमुरड्या गायिकेने देशाला भुरळ घातली आहे. आपल्या मुलीने आखाडा गाजवावा, असं दंगलमधील गीताच्या बापाला वाटत असतं. खरे तर त्याला आपल्या अपेक्षा, स्वप्न मुलांकडून पूर्ण करायची असतात. कुस्तीसाठी ते मुलींना आखाड्यात उतरवतात. यामुळे त्यांच्यावर टीकाही होते. पण सुवर्णपदक जिंकल्यावर मात्र, सर्वांचीच तोंडं गप्प होतात. गीता-बबिताच्या स्टोरीची नगरमध्ये अंजली-नंदिनी गायकवाड यांच्या रूपाने पुनरावृत्ती होत आहे. फरक इतकाच गायक-वादक असलेल्या अंगद गायकवाड यांच्या या गुणवान मुली बळजबरी नव्हे तर स्वतःहून पुढे आल्या आहेत.

बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है, हे गीत अंजली-नंदिनीच्या आवाजात ऐकायची मजा काही औरच! अंजलीची आज देश-विदेशांत ओळख आहे. गाण्याचा वारसा म्हणाल तर घरातच होता. तिचे वडील अंगद हे पट्टीचे गायक-वादक. त्यांनीही कधी काळी रिअ‍ॅलिटी शोचा मार्ग चोखाळला होता. तेथील अनुभवही त्यांच्यासाठी फार काही चांगला नव्हता. मुलींना त्याच रस्त्याने पाठवायचे म्हणजे मनाविरुद्ध होतं. दुसरं म्हणजे गायक कितीही पट्टीचा असला तरी त्याला व्यासपीठ मिळाल्याशिवाय लोकमान्यता मिळत नाही. आणि टीव्हीवरील रिअ‍ॅलिटी शो तर प्रसिद्धीसाठी मोठी पर्वणीच. अंजली आणि नंदिनीला याच व्यासपीठाने मोठं केलं असलं तरी त्यापूर्वीच्या स्पर्धांही त्यांनी गाजवल्यात.

अंजलीची मोठी बहीण नंदिनी वयाच्या पाचव्या वर्षी गायला लागली तर अंजलीची सुरुवात अवघ्या चौथ्याच वर्षी झाली. खडा आवाज हे तिचे गुणवैशिष्ट्य. तिच्यातील स्पार्क पाहून वडिलांनी या हिर्‍याला पैलू पाडायला सुरुवात केली. गायकीचा अंगभूत गुण असल्याने त्यांना फार सायास पडले नाहीत. गेल्या चार वर्षांपासून ती स्टे शो करायला लागली. स्पर्धा गाजवायला लागली. रसिक श्रोते आणि परीक्षकांनाही अंजलीने भुरळ घातली. लातूरचा तर एक अजबच किस्सा आहे. अंजली त्या स्पर्धेत पहिली आली. पण तिचे वय बसत नसल्याने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शास्त्रीय संगीतात त्या तरबेज आहेत. तिच्या गायकीतील हरकतीवर अनेक दिग्गज फिदा आहेत. पोरवयातील ही चिमुरडी गायकीतील बाप बनलीय.

झी युवावरील संगीत सम्राट या स्पर्धेत ती आपली मोठी बहीण नंदिनीसह उतरली आणि विजेतेपदाचा मुकुट घेऊनच ती परतली. त्यानंतर अंजलीची सारेगमप या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे एंट्री झाली. स्पर्धा जसजशी पुढे जात होती तसतसे तिचे फॅन फॉलोअर्स वाढत होते. शेवटी त्याही स्पर्धेत अंजली स्वरांजली ठरली. नगरकरांनी तिची जंगी मिरवणूक काढली. अंजलीची गाणी यू ट्यूबवर ऐकली जातात. कार्यक्रमासाठी निमंत्रणावर निमंत्रणं येतात. स्पर्धेदरम्यान गायलेली नजर जो तेरी लागी, मैं दिवानी हो गयी, छल्ला वल्ला या गाण्यांना तर थेट पाकिस्तानातून दाद मिळाली. आई-वडिलांच्या प्रोत्साहनाच्या बळावर ती इथवर पोहोचली आहे. केवळ ती गायकीतच नव्हे तर अभ्यासातही तितकीच स्कॉलर आहे, असं निरीक्षण तिच्या आंनद शाळेतील मुख्याध्यापिका अनुपमा जाधव-वाखारे नोंदवतात. तिला आणखी शिखरं गाठायची आहेत. त्यासाठी ती सज्ज आहे.

LEAVE A REPLY

*