Type to search

कर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य

Karmayogini सार्वमत

कर्मयोगिनी- वकिली सांभाळून सामाजिक कार्य

Share

अ‍ॅड. सौ. शारदाताई सुरेश लगड

  • अहमदनगर
  • गट- न्याय व कायदा
  • भूषविलेली व भूषवत असलेेली पदे-

1) प्रदेश उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सन 2012 पासून)
2) मा. चेअरमन, दि अंबिका महिला सहकारी बँक अहमदनगर (सन 2001 पासून संचालक)
3) व्हा. चेअरमन, लॉयर्स को-ऑप. सोसायटी जिल्हा न्यायालय अहमदनगर (पाच वर्षे संचालक)
4) अध्यक्षा, स्फुर्ती महिला आधार केंद्र, अहमदनगर
5) अशासकीय सदस्या, जिल्हा दक्षता कमिटी अहमदनगर (15अ वर्षे )
6) मा. जिल्हाध्यक्ष, अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (11 वर्ष)
पुरस्कार : 1) महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागातर्फे देण्यात येणारा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (सन 2004-2005)

चुलते कै. बी. जी. काळे हे फौजदारी कायद्याचे प्रसिध्द वकील असल्याने घरातच लहानपणापासून वकिली वातावरण होते. त्याच वातावरणात वाढल्याने वकिलीचे बाळकडू लहानपणीच कुटुंबात मिळाले. पुढे कर्म धर्म संयोगाने पतीही वकील मिळाले. दोन दीर व पुतण्या देखील राहाता न्यायालयात वकीली व्यवसाय करतात. माहेरी देखील एक भाऊ व एक बहिण वकील आहेत. लहानपणापासूनच कायद्याची भाषा घरी दररोज कानावर पडत होती. या वातावरणातून वकीली व्यवसाय स्वीकारला. या व्यवसायात यायचं असं काही निश्‍चित ठरलं नव्हतं अन् ठरविलेही नव्हते. परंतु घरातील एकंदरित वातावरणाने वकील होण्यास उत्तेजित केले. केवळ वकिल एवढेच मर्यादित कार्यक्षेत्र न ठेवता आर्थिक, राजकीय क्षेत्रातही कामगिरी करत आज अ‍ॅड. शारदा लगड यांनी स्वतःचे अस्तित्त्व निर्माण केले आहे.

लग्न लोणी बुद्रुक (ता. राहाता) येथील कै. आबासाहेब पुंजाजी लगड (गुरूजी) यांचे चिरंजीव अ‍ॅड. सुरेश लगड यांच्याशी 1986 साली झाले. त्यावेळी अ‍ॅड. लगड नुकत्याच बी. कॉम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या होत्या. पती वकील असल्याने बी. कॉम नंतर विधी शाखेकडे जाण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. विधी शाखेकडे जाण्याची इच्छाही होतीच. 1992 मध्ये वकिलीची सनद घेतल्यानंतर लगेचच वकिली सुरू केली. वकिली व्यवसाय हा अत्यंत चांगला व्यवसाय. समाजात आपण खर्‍या अर्थाने न्यायदानाचे काम करतो. वकील व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्य म्हणून सामाजामधील निराधार, अत्याचारीत, घटस्फोटीत, विधवा व परितक्तया महिलांना आधार देण्याचे काम रात्रंदिवस केले. 16.09.2003 पासून सामाजिक कार्याबरोबरच अहमदनगर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष म्हणून 11 वर्षे काम केले. याही काळात पक्ष संघटना वाढीसाठी प्रभावीपणे रात्रंदिवस काम केले. राजकीय पक्षांत काम करीत असताना पक्षांचे अध्यक्ष माजी कृषीमंत्री शरद पवार यांचे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य लाभले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली व सुचनेनुसार पक्ष संघटनेत काम करत असताना 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण केले. या काळात अनेक महिला बचत गटांचे वेळोवेळी शिबिरे घेऊन त्यांना मार्गदर्शन करून समस्यांचे निराकरण केलेले आहे. साधारणपणे 3500 ते 4000 महिला बचत गटांना वेळोवेळी मार्गदर्शन करून त्या बचत गटातील महिलांना त्यांनी तयार केलेल्या वस्तू व पदार्थांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. त्याकामी मला तत्कालीन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सहकार्य लाभले. हे सर्व काम करीत असताना यशस्वीनी सामाजिक अभियान अहमदनगर जिल्ह्याची जिल्हा समन्वयक म्हणून खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यामध्ये बचत गटातील महिलांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढेच नव्हे तर महिलांसाठी काहीतरी आपण वेगळे करावे, असे सतत मला वाटू लागल्याने पुढे स्फुर्ती महिला आधार केंद्र अहमदनगर येथे चालू केले.

या केंद्राला महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली. आजही हे केंद्र अत्याचारीत महिलांच्या प्रश्‍नांच्या व अडीअडचणीच्यावेळी मार्गदर्शन व कायदेविषयक शिबिर घेऊन मानसिक आधार देत आहे. ज्या महिलेवर अन्याय, अत्याचार होत असे त्या महिलेबरोबर स्वत: पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. हे करत असताना जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे कार्यरत असलेल्या लॉयर्स को-ऑप सोसायटीचे व्हा. चेअरमन म्हणून बिनविरोध निवड झाली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कार्यरत असले तरी संघटनेचे काम करताना समाजकारणास जास्त प्राधान्य दिले. याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विभागातर्फे देण्यात येणारा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला.

वकील व्यवसाय हा अत्यंत चांगला व्यवसाय आहे. वकीलाला न्यायदानाचे काम करण्याची खूप संधी असते. समाजात कितीतरी गुन्हे घडतात. काही गुन्हेगार खरोखर असतात तर काही निरपराधी संशयावरून पकडल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल झालेले असतात. विशेषतः महिला अत्याचाराच्या केसेसबाबत जाणीवपूर्वक रस घेऊन ते खटले न्यायालयात चालविले. शक्यतो उभयतांमध्ये तडजोड कशी होईल याबाबत त्यांना समजावून सांगितले जाते. वकील मॅडम माझा नवरा मला नांदवत नाही, मारहाण करतो, छळ करतो असे सांगत एक महिला आली असताना तू आठ दिवसांनी वडील व भावाला घेऊन ये, असे सांगितले. त्याप्रमाणे दोघांना स्वतंत्रपणे कायद्याचे होणारे संभाव्य परिणाम सांगितले. दोघांना एकत्र बोलावून, दोघांकडील वडीलधारी बोलावून भविष्यात काय होऊ शकते, याची सविस्तर माहिती देत समजावले. त्यानंतर दोघेही संसार करण्यास तयार झाले. या घटनेस चार वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला. ते दोघेही आता संसारात व्यस्त झाले आहेत.

सामाजिक कार्याची आवड असल्याने कुठलाही खटला चालविताना प्रथम समाजसेवा म्हणून वकिली व्यवसायाकडे पाहण्याची अ‍ॅड. लगड यांची सवय आहे. चूल आणि मूल या सनातन विचाराचा विचार करताना वकीली व्यवसायात काही बाबतीत मात्र नक्की अडसर येतो. मुलं शाळेत जात नाहीत तोपर्यंत त्यांच्या काळजीने सांभाळ करण्यातच वेळ जातो. नव्हे, त्यासाठी वेळ द्यायलाच हवा. वकिली व्यवसायाचा कुटुंब व्यवस्था व संसारावर कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. तसे होऊ देऊ नये, असे अ‍ॅड. लगड यांचे स्पष्ट मत आहे. वकिली ही करियर म्हणूनच केली पाहिजे, असे त्या मानतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, आपली समाजाशी बांधीलकी आहे. वकीली व्यवसाय करताना सामाजकार्य हा हेतू समोेर ठेवून सामाजिक, राजकीय व वकील व्यवसायात काम करीत आहे. अनेकदा महिलांचे प्रश्‍न बिकट असताना ते त्यांना स्पष्टपणे सांगता येत नाहीत. अशावेळी त्या महिला त्यांचे प्रश्‍न महिला वकिलांना स्पष्टपणे सांगू शकतात. एवढेच नव्हे तर महिला वकिलांना वकिली क्षेत्राव्यतिरीक्त न्यायदान क्षेत्रात न्यायधीश म्हणून खूप प्राधान्य आहे. अनेक महिला न्यायाधीश म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. म्हणून महिला वकिलांनी कायद्याचा सखोल अभ्यास करूनच न्यायदानाचं काम यशस्वीरित्या कसं करता येईल, यासाठी धडपड केली पाहिजे, असे अ‍ॅड. लगड सांगतात.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!