अ‍ॅड. करुणा रामदास शिंदे – न्यायासाठी संघर्ष !

0

अहमदनगर
शिक्षण- बी.ए., एल.एल.बी.
कार्य -कौटुंबीक वाद सामोपचाराने सोडविणे, ही खासीयत. अनेकांचे संसार त्यामुळे पुन्हा रूळावर. मुलांनी अव्हेरलेल्या माता-पित्यांना पोटगी मिळावी यासाठी कायद्याच्या माध्यमातून संघर्ष. गट : न्याय-विधी  

समाजसेवेचे व्रत तसे उपजतच. वडिल न्यायदानाच्या क्षेत्रात असल्याने कलम आणि त्यांचे अर्थ यांच्याशी त्यांची ओळख लवकरच झाली. आपणही न्यायपालिका क्षेत्रात काम करावे, ही प्रेरणा वडिलांकडूनच मिळाली. मात्र वकील म्हणून काम करत असताना पीडितांची सेवा हेच आपले लक्ष्य असेल, हे त्यांनी या व्यवसायात येण्याआधी ठरवले आणि आजपर्यंत कसोशीने पाळले!

वडील रामदास शिंदे मुख्य न्यायदंडाधिकारी असल्याने मुलीने देखील न्यायदान क्षेत्रात यावे अशी त्यांची मनीषा होती. 2007 साली करूणा यांनी बी.ए.ची पदवी मिळताच एल.एल.बीच्या पहिल्या वर्गात प्रवेश घेतला. नावाप्रमाणे करूणा स्वभावात असल्याने समाजसेवेचा निर्धार त्यांनी शिक्षण सुरू असतानाच मनाशी केला होता. समाजात पीडित महिला, उद्ध्वस्त झालेले संसार, मुलांनी घरातून काढून दिलेले वृद्ध अशा व्यक्तींना न्याय देण्यासाठी त्या झटत असतात. विविध शिबिरे, वृक्षारोपण, न्यायासाठी उपक्रम यांच्या माध्यमातून त्या समाजाची सेवा करतात.

शिक्षण पूणर्र् झाल्यानंतर त्यांनी अ‍ॅड. शिवाजी कराळे यांच्या मार्गदर्शनात न्यायालयीन कामाला प्रारंभ केला. पुरुषांच्या हक्कासाठी उभी राहणारी वकील अशीही त्यांची ओळख. कौटुंबीक वादात शक्यतो सलोखा घडवून आणणे, असा त्यांचा प्रयत्न असतो. अशा 60 पेक्षा जास्त प्रकरणांत त्यांनी मार्ग काढले. संसार पुन्हा पूर्वपदावर आले याचा त्यांना मनस्वी आनंद! काम करीत असताना त्यांच्या लक्षात आले की, बहुतांशी ठिकाणी कलमांचा गैरवापर करून अन्याय होतो. निरापराधांना पोलिसांच्या चौकशीला किंवा शिक्षेला सामोरे जावे लागते. यात पुरूष अधिक आणि यात सर्वात जास्त फटका नोकरदार वर्गाला बसतो. नोकरीतील दबाव, त्यातून उद्ध्वस्त होणार्‍या कुटुंबाची अनेक उदाहरणे त्यांनी पाहिली. हे थांबले पाहिजे. यासाठी शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले. पतीपत्नीचे वाद आले की, त्यांचे समुपदेशन करणे, दोन्ही व्यक्ती, कुटुंब व मुलांमध्ये एकोपा घडवून आणणे. त्यासाठी करूणाताईंनी स्वतः वेळ आणि पैसा खर्च केला. अनेक संसार पूर्वपदावर आणले आहेत.

हे काम करीत असताना दाम्पत्यात जो कोणी कायद्याचा गैरवापर करीत असेल त्याच्या विरोधात उभे राहून न्याय देण्यासाठी अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न करणे त्यांनी सुरू ठेवले. खटला दाखल करण्यापासून तर न्याय मिळेपर्यंत सर्व सेवा मोफत देणार्‍या करूणाताई उठून दिसतात. संविधानाच्या कलमांचा गैरवापर होऊ नये, निरापराधास शिक्षा होऊ नये, अशी त्यांची प्रांजळ इच्छा.

एखादी महिला हुंडाबळीचा किंवा कौटुंबीक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करते, तेव्हा त्यात अनेक नावे गोवली जातात. अशा प्रकारचे खटले देखील त्यांनी चालवून न्याय देण्याचे काम केले आहे. करुणाताईंची बीड व नगरमध्ये एक नवी ओळख आहे. त्यांनी आजवर 20 पेक्षा जास्त वृद्ध महिलांना व पुरूषांना त्यांच्या मुलाकडून पोटगी मिळवून दिली आहे. एकदा त्या एका आश्रमात गेल्या होत्या. तेथे अनेक वृद्धांच्या कैफियती त्यांच्या कानावर आल्या. उतारवयात आजार जडतात, त्यावर उपचार करण्यासाठी जवळ पैसा नसतो. दोन वेळचे अन्न मिळण्याची मारामार असते. अशांना न्याय मिळवून देण्याचे काम करूणाताई यांनी केले आहे. या कामाचा गौरव अनेकांनी केला. शासनाच्या विधी सेवा प्राधिकरणामार्फत दारोदारी जाऊन कायद्याविषयी जनजागृती त्यांनी केली आहे. कायद्याची नि:स्वार्थ सेवा कायम आपल्या हातून घडावी, असा मानस त्या व्यक्त करतात. समवयस्क पिढीसाठी त्यांचे हे कार्य नक्कीच प्रेरणादायी आहे. कायद्याच्या सेवेसाठी झटणारी ही कर्मयोगिनी आपल्या कार्यात यशस्वी ठरो!

LEAVE A REPLY

*