अहमदनगर (कर्मयोगिनी) : अ‍ॅड. ज्योती प्रदीप मालपाणी – समाज संवादिनी !

0

एम.एस्सी., एल. एल. बी. अ‍ॅडव्होकेट
अभिनवनगर, संगमनेर, जि. अहमदनगर
कार्य : – वकिली व्यवसाय, विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्य, एकमेकांपासून दूर होणारी अनेक जोडपी पुन्हा एकत्र ठेवण्यासाठी यशस्वी प्रयत्न, गट : न्याय व विधी  

माहेर विदर्भाचे… लग्नानंतर संगमनेरला आले. आजेसासरी वर्‍हाडातून आल्यानंतर भाषा, खाणे-पिणे हे सर्व वेगळे होते. माहेरी असताना शिक्षण घेत असल्यामुळे कोठे जाण्याचा फारसा प्रसंग आला नाही. ‘सातच्या आत घरात’ व अभ्यास ही शिस्त व आई-वडिलांच्या आदरयुक्त धाकात आम्ही वाढलेलो. आम्ही हिंदी भाषिक. येथे मात्र सर्वच मराठीतून बोलत असत, सुरुवातील थोडेसे जरा जड गेले. परंतु आजेसासूच्या मायेने व मालपाणी सारख्या जोडीदाराच्या साथीने सर्वात मिळून मिसळून जायला वेळ लागला नाही…डॉ.ज्योतिताई आपल्या प्रवासाबद्दल सांगत होत्या.

अ‍ॅड. ज्योतिताईंनी आपला प्रवास उलगडताना सांगतात, संगमनेरात अ‍ॅड. मालपाणी, डॉ. सुरेश सराफ, आर्किटेक्ट रवींद्र जोशी व इतर सर्वांनी जेसीज संस्था चालू केली. त्यात अनेक विधायक कामे हाती घेतली गेली. श्याम भंडारी, प्रकाश बर्डे, अनिल राठी, यांची पण ज्युनिअर जेसीज संस्था स्थापन झाली व महिलांची जेसिरेट विंग ही शाखापण स्थापन झाली. जेसिरेट विंग च्या माध्यमातून आम्हीही सर्वांच्या बरोबर वेगळे वेगळे उपक्रम हाती घेतले. त्याच वेळेस माहेश्‍वरी महिला मंडळाचे सदस्यत्व मिळाले. तेथून पुढे सर्वांशी परिचय वाढत गेला.

1980 साली लग्नानंतर एलएलबी पास झाले. परंतु मुले लहान असल्याने 1985 साली वकिली व्यवसाय सुरू केला. संगमनेरातील माहेश्‍वरी समाजातील प्रथम महिला वकील म्हणून काम सुरु केले. या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक गरजू महिलांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. साधारण एक वर्षापूर्वी सुशिक्षित नवरा बायको दोघांचे पटत नसल्यामळे व अनेकदा समजूनही नवरा ऐकत नसल्यामुळे बायको फार जेरीस आली होती. बायकोला चांगले उत्पन्न, बायकोची कायम झालेली नोकरी, यातच नवरा सुखावलेला होता. नवरा अतिशय संशयी होता. परंतु नवर्‍याचे स्वतःची वागणूकच चांगली नव्हती. त्याला अनेक मैत्रिणी होत्या व त्यातच तो रमत असे. याच गोेष्टीवरुन दोघांचे एके दिवशी खूप कडाक्याचे भांडण झाले व रागाच्या भरात ते घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात एका तरुण वकिलाकडे आले.

या तरुण वकिलाने भरमसाट फी सांगून तुम्हाला लगेचच घटस्फोट मिळेल म्हणून आश्‍वासन दिले. त्यानंतर दोघेही माझ्याकडे आले व आम्हाला घटस्फोट पाहिजे, तुम्ही माझे वकीलपत्र घ्या असे त्या महिलेने सांगितले. त्या वेळेस कायद्याने असा घटस्फोट होऊ शकत नाही. रागाच्या भरात अशा पद्धतीने कोर्टात येणे चुकीचे आहे. तुम्ही माझ्या मुलाच्या वयाचे आहात शांतपणे आता घरी जा व स्वतः दोघे जण आत्मपरीक्षण करा, आपण कोठे चुकलो याचा शोध घ्या, असे सांगितले व त्यांना घरी पाठविले. आज ते दोघेजण चांगला संसार करीत आहेत.

1987 साली मी व माझ्या मैत्रिणींनी मिळून माहेश्‍वरी ज्युनियर महिला मंडळाची स्थापना केली. 1990 साली मी मंडळाची अध्यक्षा झाले. त्यावेळेस शोभाताई भागवत, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालक मेळावा आयोजित केला होता. पूर्ण वर्षभरात महिलांसाठी व मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेतले. 1990 पासून पोलीस दक्षता समितीची सदस्या म्हणून काम करत असताना पोलीस स्टेशनला येणारे नवरा-बायको यांचे भांडण मिटवून समेट घडविण्याचा प्रयत्न केला. सन 1995 ते 2000 या काळात चाईल्ड वेलफेअर बोर्डची अध्यक्षा म्हणून काम करण्याचा योग आला. जेसीज मधून वय वर्ष 40 नंतर निवृत्त झाल्यानंतर अ‍ॅड. मालपाणी, प्रकाश बर्डे, श्याम भंडारी, डॉ. सराफ यांनी अनंत फंदी प्रतिष्ठानची स्थापना केली. जेसीज व या प्रतिष्ठानमार्फत गेल्या 42 वर्षांपासून निरनिराळ्या वक्त्यांची व्याख्याने आयोजित केली जातात.

आता 2018 ते 2021 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी फंदी प्रतिष्ठानची अध्यक्षा म्हणून माझी निवड झाली. राहत असलेल्या अभिनवनगर येथे अभिनवनगर महिला मंडळाची स्थापना केली. त्यात सुरुवातीला व 25 वर्षानंतर अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. 2000 सालापासून लोकपंचायत या स्वयंसेवी संस्थेशी मी जोडली गेले. गेल्या 10 वर्षापासून लोकपंचायतची मी ट्रस्टी व खजिनदार म्हणून काम पाहत आहे. निराधार महिलांना आधार देण्यासाठी लोकपंचायत संस्थेचे महिला विकास केंद्राचे काम पाहत आहे. निराधार महिलांना व बचत गटातील महिलांना कायदेशीर सल्ला व त्यांना सक्षम करण्याचा वसा आम्ही सर्वांनी घेतला आहे. लोकपंचायत संस्थेच्या ‘संवादिनी’ केंद्रामार्फत साधारण 1600 ते 1700 टाकून दिलेल्या स्त्रियांचे समुपदेशन करून नवर्‍याकडे नांदायला पाठविले आहे. या सर्व स्त्रीयांना कोर्टात जाण्यापासून परावृत्त केले. लोकपंचायत संस्थेने लोकांचे आरोग्य चांगले रहावे या दृष्टिकोनातून लोकांनी सेंेद्रीय मालाचा वापर जास्त करावा व त्यासाठी त्याचा प्रसार करण्याचा अटोकाट प्रयत्न आम्ही करत आहोत. तसेच लोकपंचायत संस्थेमार्फत चालविले जाणारे ‘बहिणा’ मासिकाची संपादिका म्हणून काम पाहत आहे.

LEAVE A REPLY

*