अहमदनगर | डॉ. सुचेता राजेंद्र धामणे : अनाथांना निवारा देणारी माऊली

0

डॉ. सुचेता राजेंद्र धामणे

रा. शिंगवी, ता. अहमदनगर
शिक्षण – बीएचएमएस
संस्था- माऊली सेवा प्रतिष्ठान
कार्य- अत्याचारग्रस्त, मनोरुग्ण महिलांचा सांभाळ, सेवा

अत्याचारग्रस्त स्त्रिया, कुटुंबाने आणि व्यवस्थेने नाकारलेल्या मनोरुग्ण स्त्रियांसाठी आणि त्यांच्या मुलांना समाज व्यवस्था स्विकारण्यास तयार नाही, अशा महिलांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले मनोबल निर्माण करणे व त्यांचा आयुष्भर सांभाळ करणे हेच आयुष्याचे ध्येय बाळगणार्‍या डॉ. सुचिता राजेंद्र धामणे! समाजात आजही महिलांची स्थिती भयंकर आहे, याची जाणीव होती. नातेवाईकांसह समाजानेच नाकारलेल्या या महिलांसाठी काही तरी करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातूनच माऊली सेवा प्रतिष्ठानचा उदय झाला. कपड्यांचे, देहाचे भान नसणार्‍या, रस्त्यावर फिरणार्‍या अशा अनेक अनाथ आणि मानसिकदृष्ट्या उद्धस्त स्त्रियांची ‘माऊली’ बनून त्यांना हक्काचा निवारा देणार्‍या डॉ.सुचेताताईंचे कार्य जगावेगळे आणि तेवढेच आदर्श आहे!

अहमदनगर शहरापासून २० किलोमीटरवर असलेल्या नगर – मनमाड रस्त्यावर शिंगवी या गावी धामणे यांचा रहिवास. जवळपास तीन हजार लोकसंख्या असलेल्या गावी १९९८ साली ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. व्यवसायाने डॉकटर असलेल्या धामणे यांच्या आयुष्यत एक घटना घडली. ती घटना मन अस्वस्थ करणारी होती.आजही रस्त्यावर अत्याचार ग्रस्त महिला फिरतात. या पीडित महिलांसाठी काही करण्याची इच्छा मनात निर्माण झाली. मनाला सुन्न करणारी एक घटना समोर आली आणि अशा मनोविकलांग महिलांसाठी ‘माऊली सेवा प्रतिष्ठान’ विचार मनात घर करून गेला. समाजाने नाकारलेल्या महिलांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘माऊली’ संस्थेत धामणे दाम्पत्य अहोरात्र सेवा करण्यात मग्न आहे. या अनाथालयात तब्बल ११० अनाथ, मनोविकलांग महिला आणि त्यांची १९ मुले कायमस्वरूपी वास्तव्य करतात.

अत्याचाराने पिडीत, समाजातील वंचित घटकांसाठी माऊली आज आधार आहे. रस्त्यावरून आणलेल्या बेवारस मनोरुग्ण महिलेचे सर्वच प्रश्न गंभीर असतात. बर्‍याचदा त्या अत्याचारांच्या शिकार झालेल्या असतात. अन्यही बरेच आजार, व्याधी त्यांना जडलेल्या असतात. शुश्रूषा, स्वच्छता दूर राहिली. संस्थेत दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस त्या कोणाला जवळही येऊ देत नाहीत. मुळातच सैरभैर आयुष्य जगणार्‍या या महिलांना कशाचेच भान नसते. त्यांच्यामध्ये आधी आपलेपणाचा विश्वास निर्माण करणे, हेच काम अत्यंत कौशल्याचे व जिकिरीचे आहे. हे काम डॉ. सुचेताताई तरलपणे हाताळतात. न कंटाळता, चिकाटी व जिव्हाळ्याने या महिलांना आपलेसे करण्याचे कसब त्यांना प्राप्त झाले आहे. आजारातून कमी-अधिक बर्‍या झालेल्या महिलाही त्यांना या कामात मदत करतात. धामणे दाम्पत्याचा सध्या तरी एकाकी संघर्ष सुरू आहे. मनोरुग्णाला सांभाळणे हे अत्यंत जिकरीचे काम! मात्र या कार्यात धामणे यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. समाजानेही त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे. त्यामुळे काही मदतही मिळते. त्याबद्दल हे दाम्पत्य समाधानी आणि आशादायी आहे. मात्र कामाचा विस्तार लक्षात घेता ही मदत पुरेशी नाही. घरातील एखाद्या नातेवाईकाला कुटुंबीय स्वीकारत नाहीत, तिथे अशा अनेकांच्या आयुष्यात रंग भरण्याचे काम मनोभावे होत आहे.

मानसिक आजारातून एखादी महिला बरी झाल्यानंतर नातेवाईकही तीला स्वीकारत नाही. त्यामुळे संस्थेत येणार्‍या गरवंतांची संख्या वाढती आहे. वास्तव हे अनेकदा कडवट असते, त्याचा परिचय या स्भितीतून होता. गरज लक्षात घेऊन मनगाव येथे ५०० बेड असलेल्या प्रकल्पाचे नियोजन सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पात या मनोरुगांसाठी हॉस्पिटल देखील सुरु करण्यात येणार आहे. यामुळे या महिलांना हक्काचे घर मिळणार आहे. समाजानेच नाकारलेल्या या महिलांसाठी पुनर्वसन प्रकल्प चालवताना आणखी एक गोष्ट प्रकर्षांने पुढे आली, ती म्हणजे अशा महिलांना होणारी अपत्ये. बेवारस स्थितीत फिरणार्‍या अशा बहुसंख्य महिला अत्याचारांच्या बळी ठरतात. एवढे सगळे करून अशा महिला आपल्याच मुलांना ओळखू शकत नाहीत. अशा मुलांचे प्रश्न आणखी वेगळे. त्यांच्यासाठीही आता संस्थेतच वेगळा प्रकल्प सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने डॉ.सुचेताताई कार्यरत आहे. अनाथांना निवारा देणारी ही ‘माऊली’ जगासमोर आदर्श उभा करते.

LEAVE A REPLY

*