कर्जाला कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

0

कर्जत तालुक्यातील शिंदा येथील घटना

कर्जत (वार्ताहर) – सहकारी सेवा संस्था व खाजगी कर्जाला कंटाळून तालुक्यातील शिंदा या गावातील तरुण शेतकर्‍याने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली. शेतकर्‍याचे नाव दत्तात्रय देवराव घालमे (वय 42 वर्षे) असून त्यांच्या मागे वृद्ध आई-वडील, पत्नी, पाच वर्षांचा मुलगा व सात वर्षाची मुलगी असा परिवार आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील शिंदा येथे गेल्या 16 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता दत्तात्रय देवराव घालमे यांच्याकडे त्यांचा पुतण्या शरद आला असता ते अस्वस्थ दिसले. त्याने विचारले, काका तुम्हाला काय होत आहे? तेव्हा त्यांनी सांगितले की, मला एकतर जमीन कमी आहे. यामध्ये फार काही पिकत नाही आणि जे पिकते त्याला भाव नाही.
माझ्यावर सेवा सोसायटीचे एक लाखापेक्षा जास्त आणि खाजगी सावकाराचे दीडलाख रुपये असे कर्ज आहे. शेतामधून मिळणार्‍या उत्पादना मधून मी सर्वाचे नीट पोट पण भरू शकत नाही, तर कर्ज कसे फेडणार? यामुळे मी कंटाळून विषारी पदार्थ घेतले आहे. आता मी जिवंत राहणार नाही, असे म्हणातच कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ नगर येथे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ते मरण पावले होते, अशी माहिती बंडू घालमे याने दिली.मंगळवारी सकाळी शोकाकूल वातावरणामध्ये दत्तात्रय घालमे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संबंधित कुटुंबाला शासनाने मदत करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

LEAVE A REPLY

*