आमदारकीच्या वक्तव्यानंतर कर्जतमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा!

0

11 नोव्हेंबरला मेळावा; पालकमंत्र्यांना देणार शह

कर्जत (प्रतिनिधी) – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कर्जत-जामखेड मधून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एका क्षणाचा विलंब न करता तयारी सुरू केली आहे. या तयारीचाच एक भाग म्हणून अजितदादांच्या उपस्थितीत 11 नोव्हेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मतदारसंघातील पकड व कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
या शेतकरी मेळाव्यातून पालकमंत्र्यांना शह दिला जाणार असल्याने मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. याकडे राजकीय जाणकारांसह मतदारांच्या भुवया उंचावल्या आहे.
दोन दिवसापूर्वी अजित पवार कर्जत तालुक्यातील राशीन येथे एका कार्यक्रमानिमीत्त आले होते. यावेळी त्यांनी कर्जत-जामखेड विधानसभा लढविण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले होते. याबाबत दैनिक सार्वमत मध्ये ठळक वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर त्यांच्या वक्तव्याला पाठबळ देण्यासाठी कार्यकत्यांनी त्यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
कर्जत मध्ये शेतकरी मेळावा घेण्याबाबत राष्ट्रवादीची तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, जि. प. माजी माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुंड, श्याम कानगुडे, युवकचे तालुका अध्यक्ष नितीन धांडे, लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुरेश शिंदे, सरंपच वसंत कांबळे, उपाध्यक्ष दत्ता पोटरे, रज्जाक झारेकरी, अध्यक्ष स्वप्नील तनुपरे, सचिन मांडगे, बाळासाहेब सपकाळ, हरीश भैलुमे, सुधीर जगताप, रघुनाथ काळदाते, गजेंद्र यादव, धनराज उबाळे, गोदड तांबे, भागवत काळदाते, महेंद्र उबाळे आदी उपस्थित होते.

अजितदादा कर्जत-जामखेड विधानसभा निवडणूक लढवणार असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अजित पवार हे कारखान्याच्या माध्यमातून अनेकवेळा कर्जत तालुक्यात येत असतात. त्यांचा स्वभाव स्पष्ट आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यांची तयारी नसती तर त्यांनी लगेच सर्वासमोर नकार दिला असता. शेतकरी मेळाव्यातून कार्यकर्त्यांची जुळवाजुळव, निवडणूक भूमिका, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर मेळाव्यात काय बोलणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या मेळाव्यानंतर जामखेडमध्येही मेळावा घेतला जाणार आहे. यामुळे आगामी काळात कर्जत-जामखेडकडे जाणकरांच्या नजरा असणार हे मात्र खरे.

LEAVE A REPLY

*