विनयभंगप्रकरणी कर्जत न्यायालयाचा 48 दिवसांत निकाल : आरोपीला एक वर्षाची सक्तमजुरी

0

कर्जत (वार्ताहर) – विनयभंगाची घटना घडल्यानंतर अवघ्या 48 दिवसांमध्ये निकाल लावून आरोपीस एक वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा कर्जत न्यायालयाने सुनावली आहे.

कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथीलल सुनील त्रिबंक गाढवे (वय 27) याने गावातील एका महिलेचा विनयभंग केला. त्याप्रकरणी भा.दं.वि. कलम 354 नुसार त्याला प्रथम न्याय दंडाधिकारी ध.ज.पाटील यांनी एक वर्ष सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने सक्त मजुरी कलम 506 प्रमाणे सहा महिने व 1000 रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना शिक्षा व दंडाची एकूण रक्कम 7000 हे पीडितेस देण्याचा निकाल दिला आहे.

या अतिजलद निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे ही घटना 23 ऑगस्ट रोजी घडली. पोलिसांनीही तेवढीच तत्परता दाखवत त्याच दिवशी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला. 24 तारखेला चौकशी करून कर्जत येथील न्यायालयात त्याच दिवशी पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.

कोणत्याही घटनेत एका दिवसामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची पोलीस खात्याची ही अतिशय दुर्मीळ घटना आहे. येथील न्यायाधीश ध.ज.पाटील यांनीही या खटल्याचे गांभीर्य पाहून हा खटला अतिजलद चालवला व घटना घडल्यापासून अवघ्या 48 व्या दिवशी आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा देखील ठोठवण्यात आली.

या खटल्यामध्ये सरकारी पक्षाच्यावतीने एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. यापैकी तीन साक्षीदार फितूर झाले. मात्र न्यायालयाने फिर्यादी, डॉ जगताप, पोलीस नाईक करूंद व तपासी अधिकारी यांची साक्ष ग्राह्य मानत वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकिल अ‍ॅड.गहिनीनाथ नेवसे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*