अहमदनगर (कर्मयोगिनी) : सौ. ममताताई देवराम भांगरे- इकोफ्रेंडली जीवनाचा आदर्श

1

देवगाव, ता. अकोले
कार्य – काळभात या सुगंधी भात वाणाच्या दर्जेदार बियाण्याची निर्मिती, शेतीत नवीन प्रयोग. गांडूळखताच्या गोळ्या बनविल्या. डांगी जनावरांचे संगोपन, भाज्या टिकविण्यासाठी सोलर ड्रायरचा वापर , गट : कृषी 

ममताबाई देवराम भांगरे या निरक्षर आदिवासी महिलेने शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांतून एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. आपल्या घराच्या सभोवताली केलेली परस बागेची निर्मिती, काळ भाताचे बियाणे प्लॉट, जंगली भाज्या सुकविण्यासाठी सोलर ड्रायरचा वापर आणि भातासाठी खत म्हणून युरियाच्या गोळीला पर्याय म्हणून शोधलेला गांडूळखताच्या गोळीचा पर्याय या सर्वांमधून पर्यावरणपूरक शेती कशी करता येते आणि पर्यावरणपूरक साधे, सोपे पण समाधानी जीवन कसे जगता येते हे दाखवून दिले आहे. आजपर्यंत हजारो शेतकरी, अध्यापक, प्राध्यापक, शास्त्रज्ञांबरोबर परदेशी तज्ज्ञांनीही भेट देऊन त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

अकोले तालुक्याचा पश्चिम भाग डोंगराळ असून आदिवासी समाजाची तेथे वस्ती आहे. पावसाच्या पाण्यावरची शेती आणि पशुपालन हाच आदिवासी शेतकर्‍यांच्या जीवनाचा आधार. पावसाच्या अनियमितपणामुळे भात आणि खरिपाची अन्य पिके चांगली येतीलच याची शाश्‍वती नाही पण ममताताईंनी सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आणि त्याला परस बाग, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, रानभाज्याचे जतन व संवर्धन यांची जोड देत आदिवासी भागातील शेती कशी किफायतशीर होऊ शकते हे दाखवून दिले आहे.

देवगाव हे आदिवासी भागातील एक खेडे. मुख्य रस्त्याच्या कडेलाच एका टेकडीवजा उंच जागी ममताबाई भांगरे यांचे घर आणि शेती आहे. कौलारू घर, घरासमोर बोगण वेलीचा ऐसपैस मांडव, घराच्या सभोवताली असणार्‍या इंच न इंच जागेचा भाजीपाला व फळझाडांच्या लागवडीसाठी केलेला वापर, कारले, दोडके, भोपळे यांचे उंचावर गेलेले वेल, बांधावर पसरलेले डांगराचे वेल, रताळे, सुरण, हळद, टोमॅटो, वांगी अशा असंख्य भाज्या, त्याबरोबर चाई करजकंद, बडगा, कौदर, चंदन बटवा, कोहिरी, काळा आळू, चिचोंडी, अशा विविध रानभाज्या तसेच जागोजागी लावलेली फळझाडं.

पावसाळ्यात-केव्हाही या आधुनिक कृषिक्षेत्राला भेट दिली असता असा प्रसन्न वातावरण पाहायला मिळते. बायफ या संस्थेने आदिवासी शेतकर्‍यांना वर्षाचे चार सहा महिने तरी पोषणयुक्त आहार मिळावा यासाठी परसबागेची चळवळ सुरू केली आहे. बायफच्या माध्यमातून ममताबाई भांगरे यांनी उभी केलेली परसबाग आदर्श ठरली आहे.

ममतााई व त्यांचे पती देवराम भांगरे यांची सर्व शेती सेंद्रिय पद्धतीची आहे. भात हे मुख्य पीक रासायनिक खताऐवजी गांडूळ खताचा उपयोग करायचे त्यांनी ठरवले. एकदा त्यांनी गांडूळ खत शेतात टाकले पण त्या नंतर जोराचा पाऊस आला आणि वजनाने हलके असणारे गांडूळ खत त्यांच्या डोळ्यादेखत वाहून गेले. ते पाहून ममताताईंना रडूच कोसळले. वाया गेलेली ही मेहनत त्यांना स्वस्थ बसू देईना. यावर उपाय म्हणून त्यांनी गांडूळ खताच्या गोळ्या बनविल्या आणि चार भातांच्या रोपांसाठी एक याप्रमाणे बरोबर मध्यभागी जमिनीत गोळ्या गाडल्या.त्यांचा हा उपाय परिणामकारक ठरला. पिकाची जोराने वाढ होऊ लागली.

त्यांच्या या प्रयोगाची दखल बायफ संस्थेने राष्ट्रीय पातळीवर घेतली व 2015 मध्ये उत्कृष्ट शेतकरी म्हणून त्यांना सन्मानित केले. त्यामुळे त्यांचा उत्साह आणखीनच वाढला.आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली.गांडूळ खताच्या गोळ्यांमध्ये वाल, भेंडी यासारख्या भाज्यांचे बियाणे बंद करून लागवड केल्यास त्याची उगवण लवकर होते तसेच रोपे दर्जेदार होतात असा त्यांचा अभ्यास आहे, असे अनेक प्रयोग त्या सातत्याने करीत असतात.

सेंद्रिय पद्धतीने गांडूळ खतांच्या गोळीचा भात पिकासाठी वापर, दर्जेदार बहू वर्षायू व हंगामी परसबागेची निर्मिती सेंद्रीय पद्धतीने काळ भात या सुगंधी भात वाणाच्या दर्जेदार बियाण्याची निर्मिती, रानभाज्यांचे जतन व संवर्धन, वर्षभर भाज्या मिळाव्यात यासाठी भाज्या सुकविण्यासाठी सोलर ड्रायरचा वापर, कमी खर्चात बायो गॅस बसवून महिलांना धुरापासून वाचविण्याचा प्रयत्न, कुक्कुटपालन, गांडूळ खत निर्मिती, सोलर युनिट द्वारे घरासाठी विजेची निर्मिती, स्वच्छ व भरपूर प्रकाश असणार्‍या स्वयंपाकघराची निर्मिती, डांगी जनावरांचे संगोपन करून पशुसंवर्धनात घेतलेला पुढाकार अशा विविध प्रकारे निरक्षर असणार्‍या ममताताईंनी आदिवासी शेतकर्‍यांना शेती व जीवन जगण्याचा नवीन मंत्र दिला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

*