‘कनोलीतील मृत्यू डेंग्यूमुळे नाहीत’ : रक्ताचे नमुने न घेताच वैद्यकीय अधिकार्‍यांचा जावई शोध

0
संगमनेर (प्रतिनिधी)-तालुक्यातील कनोली येथील महिलांचा मृत्यू डेंग्यूने नव्हे तर अन्य गंभीर आजाराने झाल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी म्हटल्याने त्यांच्या या जावई शोधाने कनोली ग्रामस्थांमधून संतापाची लाट उसळली आहे. मृत व्यक्तींचे रक्ताचे नमुने नसताना वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोणत्या आधारे प्रसारमाध्यमांना माहिती दिली? असा सवाल करीत तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांच्या गलथान कारभाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी कनोली ग्रामस्थांनी केली आहे.
कनोलीतील तीन महिलांचा डेंग्युसदृश आजाराने मृत्यू झाला. त्याच परिसरात 25 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 8 नोव्हेंबर 2017 रोजी चहाबाई शिवाजी वर्पे (वय 60) तर 12 नोव्हेंबर 2017 रोजी सुमन जगन्नाथ वर्पे (वय 65) त्यानंतर तबस्सूम बिलाल शेख (वय 28) या महिलांचा मृत्यू डेंग्यू आजाराने झाला आहे, असे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. असे असताना पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, कनोलीतील महिलांचे मृत्यू डेंग्यूमुळे नसून ते अन्य गंभीर आजाराने झाले आहे.
त्यामुळे कनोलीसह तालुक्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. डॉ. घोलप यांना मृत शेख यांच्या नातेवाईकांनी तबस्सूम शेख यांचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. तसेच कनोलीत झालेल्या मृत्युबाबत जिल्हास्तरीय डेंग्यू मृत्यू संशोधन कमिटी व विभागीय स्तरावरील कमिटी नाशिक यांच्यात बैठक होणार आहे. सदर बैठकीतून या व्यक्ती या खरोखर कुठल्या आजाराने मरण पावल्या हे जाहीर होणे बाकी आहे, असे असताना डॉ. घोलप यांनी परस्पर प्रसार माध्यमांना माहिती देऊन नागरिकांपुढे संभ्रमावस्था निर्माण केली आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांनी प्रसारमाध्यमांना वरिष्ठांच्या परवानगीने माहिती दिली का? कोणाच्या अहवालाआधारे त्यांनी झालेले मृत्यू डेंग्यूमुळे नसून वैयक्तीक आजारामुळे झाले आहे, असे म्हटले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. घोलप यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कनोली ग्रामस्थांनी केली असून कारवाई न झाल्यास पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सभापती पंचायत समिती, संगमनेर, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आले आहे. निवेदनावर संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य सुरेश थोरात, अमृतवाहिनी बँकेचे संचालक शिवाजी जगताप,
कनोलीचे माजी उपसरपंच लहानू वर्पे, दूध संस्थेचे अध्यक्ष बंडू वर्पे, माजी सरपंच प्रकाश वर्पे, किसन हारदे, स्वप्नील वाबळे, सागर वर्पे, निसार शेख, सुलतान शेख, अमजद शेख, राहुल जगताप, अभिजीत वर्पे, मुन्ना शेख, सीताराम वर्पे, हरिभाऊ वर्पे, मनीषा वर्पे आदींच्या सह्या आहेत.

मृत रुग्णांच्या रक्ताचे नमुने नसताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी सदर रुग्णांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला नसून अन्य गंभीर आजारामुळे झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्या हॉस्पिटलने दिलेल्या अहवालात रुग्ण डेंग्यूमुळे दगावल्याचे म्हटले आहे, असे असताना वैद्यकीय अधिकारी नागरिकांची दिशाभूल करीत असून या प्रकरणाची व वैद्यकीय अधिकार्‍याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी.
– सुरेश थोरात, माजी पं. स. सदस्य, संगमनेर

 

LEAVE A REPLY

*