चहा विकणारे देश विकायला निघालेत : कन्हैय्या कुमार यांची टीका

0
संगमनेर (प्रतिनिधी)-विविधतेने नटलेल्या देशाला संकुचित करण्याचा प्रयत्न करू नका. चहा विकणारे आता देश विकायला निघाले आहेत. या नकली हिंदू भक्तांना पराजित करण्याचा संकल्प करा, आज भगवा रंग कुणी खराब करत असेल तर हीच नेते मंडळी आहेत. विकासाची स्वप्न दाखवणार्‍यांनी जनतेचा अंत पाहू नये, आता संघर्ष अटळ आहे, असा इशारा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी दिला.
कॉम्रेड दत्ता देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी महसूलमंत्री व कॉम्रेड दत्ता देशमुख जन्मशताब्दी सल्लागार समितीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, कॉम्रेड भालचंद्र कांगो, कॉ. एम. व्ही. जोगळेकर, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. मोहन देशमुख उपस्थित होते.
कन्हैय्याकुमार म्हणाले, सर्वसामान्यांबद्दल या सरकारला कळवळा राहिला नाही. तरुण बेरोजगार, दिशाहीन झाला आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत आहेत. जनतेच्या प्रश्‍नांचा विचार होत नाही. ज्या मुद्यावर काँग्रेसला जनतेने हटविले होते तो मुद्दा आज बाजूला ठेवण्यात आला आहे. जनता आपल्या प्रश्‍नांपासून बाजूला गेली आहे का? याचाही विचार करावा लागणार आहे. विदेशातील काळा पैसा देशात आणल्यावर प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येतील, या आशेवर जनतेला ठेवलं. नोट बंदीनंतर खरचं काळा पैसा येईल असं वाटू लागलं.
मात्र रिझर्व बँकेने सांगितलं की, काळा पैसा आलाच नाही, जेवढे रुपये छापले होते. तेवढेच रुपये बँकेत जमा झाले. तेव्हा प्रश्‍न उपस्थित होतो की काळा पैसा गेला कुठे? काळ्या पैशाच्या नावावर गुलाबी धन आले ते म्हणजे 2 हजार रुपयांची नोट. आता पिवळा रंग आणि नंतर हिरव्या रंगाचे धन येण्याची चर्चा होऊ लागली आहे. मात्र काळा पैसा खात्यावर जमाच झाला नाही.
त्यानंतर सरकारने पलटी मारली आणि कॅशलेस करिता नोटबंदी केल्याचं सांगितलं. नंतर असं आम्ही सांगितलंच नव्हतं की सर्व काळा पैसा आणू, मात्र कॅशलेसच्या नावावर जनतेला रांगेत उभं केलं. आणि कॅशलेसमुळेच अनेकांना जीव गमवावा लागला. यावर कुठल्याही नेत्यानं भाष्य केलं नाही की, या व्यक्तींच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. किती मल्ल्या, आदाणी, अंबानी रांगेत उभे राहिले होते हा प्रश्‍न सरकारला कुणी विचारू शकलं नाही, मी हा प्रश्‍न केला मात्र उत्तर आलं नाही. त्यानंतर जीएसटीचं नवं नाटक सुरू केलं.
जीएसटी कायदा देशाची परिस्थिती बघून जर बनविला गेला असता तर तो निश्‍चितच योग्य ठरला असता. मात्र तसं झालं नाही, मुलांच्या शैक्षणिक फी वर जीएसटी लावला मात्र मंदिरातील प्रसादावर जीएसटी नाही, ही परिस्थिती निर्माण करण्यात आली. या परिस्थितीचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे.
ज्या गोष्टींवर विचार करायला पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. 2014 मध्ये भाजपाला जनतेने का मत दिलं? खिचडी, गंगा, देश भ्रमण या मुद्द्यांसाठी जनतेनं मत दिलं होतं का? किमती सूट घालण्यासाठी मत दिलं होतं का? या देशात पुन्हा हिंदू-मुस्लीम साठी मत दिलं होतं का? आणि आज पंतप्रधान यांचे नव्याने भाषण येत आहे. दुःख याचं आहे की हेच प्रेक्षक आता बेरोजगार होऊ लागले आहेत.
गरीबाचं मूल पंतप्रधान झालं हे काँग्रेसला पचलं नाही, असं पंतप्रधान म्हणाले. ते खरं बोलले मात्र ते गरीब आहेत का? त्यांच्या सोन्याच्या तारेनं सजविलेल्या जाकीटवरूनच कळतं. आदाणीचं खासगी विमान त्यांच्या दिमतीला आहे. हे पाहिल्यावर पंतप्रधान गरीब आहे असं वाटणार नाही. पंतप्रधान गरीब असतील पण ते धनाने नाही तर मनाने, मात्र तसं नाही ते गरीब असते तर त्यांनी लाल किल्ल्यावरून जनतेची माफी मागितली असती. काय केलं त्यांनी 16 महिन्यांत 19 वेळा गॅसचे दर वाढविले. महागाई वाढतच आहे.
वाढत्या महागाईचा फटका गरीब जनतेला बसत आहे. सरकारी संस्था बंद केल्या जात आहे. गरीब कुटुंबातील मुलाला इंजिनिअर व्हायचं आहे. झालाच इंजिनिअर तर त्याला रोजगार नाही. कॉ. दत्ता देशमुख देखील इंजिनिअर होते. सामाजिक प्रश्‍नांसाठी त्यांनी चळवळीत भाग घेतला. काँग्रेस पार्टीत सहभागी झाले. काँग्रेस पार्टीचं नेतृत्व केलं. तीन टर्म आमदार राहिले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी नेतृत्व केलं.
पाण्यासाठी संघर्ष केला. आज देशातील गरीब युवक दत्ता देशमुख यांच्या विचारांना पुढे नेईल का? हा प्रश्‍न आपणा सर्वांपुढे आहे. असे सांगून ते म्हणाले, ‘अब की बार मोदी सरकार’, बहुत हुआ भ्रष्टाचार ‘अब की बार मोदी सरकार’ असा नारा देण्यात आला. जनतेने हे स्विकारलं. मोदीजी निवडून आले. त्यानंतर ते म्हणाले, एकही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’. मात्र आता भ्रष्टाचारांच्या यादीत त्यांच्याच पार्टीतील नेत्यांची नावे येऊ लागलीत. ही गोष्ट कळाली नाही मात्र ‘सबको भाजपा मे सामील कराऊंगा’ हे लक्षात आलं.
काँग्रेसच्या नेत्यांपाठीमागे सीबीआयचं भूत लावलं. अनेकजण त्यामुळे भाजपाच्या वाटेने गेले. कारण भाजपाबाहेर राहिलं तर भ्रष्टाचार, आणि भाजपात आलं तर राष्ट्रहित आहे म्हणे. वैचारिक मतभेद असू शकतील मात्र तिरस्कार करणं अमानवीय आहे. त्यामुळे मोदीजींबद्दल देखील मला तिरस्कार नाही. वैचारिक मतभेद आहेत, असे सांगत ते म्हणाले, हिंदू धर्माला सर्वाधिक धोका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आहे.
भगव्या रंगाचं महत्त्व यांना काय माहित? भगवा रंग त्यागाचं प्रतिक आहे. ही महाराष्ट्राची भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत तुकाराम, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची भूमी आहे. आणि आज भगव्या रंगाला कुणी बदनाम करत असेल तर ही खोटी नेते मंडळी आहेत. आमदार, खासदार बनण्याच्या हेतूने ही मंडळी भगव्या रंगाला बदमान करत आहेत.
भारताचा धर्म कुठल्याही धर्माला पराजीत करण्यासाठी नाही तर प्रत्येक धर्माला स्विकारणारा धर्म आहे. भारत विविध संस्कृतीने नटलेला आहे. या देशाला संकुचित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू व हिंदुत्व यातील फरक समजण्याची गरज आहे. इस्लाम आणि इस्लामीक यातील फरक समजण्याची गरज आहे. जातीवर राजकारण केलं जात आहे हे चुकीचं आहे. धर्माच्या मूळ भावनेला समजून घेतलं पाहिजे. धर्माची मूळ भावना त्याग व समर्पण आहे. देशात ही गोष्ट जनता समजू शकली नाही तर राम राम करत नथूरामचे मंदिर घराघरांत निर्माण होईल हे समजून घेण्याची गरज आहे. आणि यासाठी जी पावलं उचलली जात आहे ती म्हणजे पुस्तकातून मुघलांचा इतिहास हटविला जात आहे.
चहा विकणारे लोक आता देश विकायला निघाले आहेत. तेव्हा आम्ही हे ठाम केलं आहे की आम्ही डॉ. आंबेडकरांचा विचार घेऊन जाणारे सावरकरांच्या विचाराने जाणार्‍या विरुद्ध लढा देऊ, आणि याच लढाईसाठी, क्रांतीसाठी आज मी येथे आलो आहे. ही लढाई मित्र विरुद्ध दुश्मन अशी नाही तर संविधानला वाचविणारे विरुद्ध संविधानला तोडणारे अशी आहे. संविधानच्या विरोधात असणार्‍यांविरुद्ध ही लढाई आहे.
आगामी 2019 च्या लढाईत संविधानला सांभाळणार्‍यांना साथ देत नथूरामच्या विचारांना घेऊन फिरणार्‍या नकली हिंदू भक्तांना पराजीत करण्याचा संकल्प करा असे आवाहन करत ते म्हणाले, देशाला वाचविण्याचे असेल तर विविधतेमध्ये एकता आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे, बेरोजगारांना रोजगार नाही, महिलांवर अत्याचार होत आहे. मान सन्मानची लढाई होत आहे. दुय्यम नागरिक नाही तर बरोबरीचा सन्मान मिळविण्यासाठी ही लढाई आहे. या लढाईसाठी एकजूट व्हा, अखेरपर्यंत लढा द्यायचा आहे. कोण देशभक्त आहे कोण देशद्रोही आहे ही गोष्ट भाषणावर नाही तर कर्मावर अवलंबून असल्याचे कन्हैय्याकुमार म्हणाले.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले, दिशाहीन तरुणांना दिशा देण्याचं काम कन्हैय्याकुमार करत आहे. दत्ता देशमुख यांनी डाव्या विचारांना ताकद देण्याचं काम केलं. विधानसभेत त्यांनी तीव्र स्वरुपात विचार मांडले. त्यांचा विचार घेऊन प्रतिगामी शक्तींना गाडण्याचे काम करायचे आहे. ज्या राज्यघटनेनं मताचा अधिकार दिला ती जपणं हे आपलं कर्तव्य आहे.
सत्ता कुणाचीही येवो मात्र त्यावर धाक असला पाहिजे. कुणी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे. डाव्या विचारसरणीने हेच काम केलं असल्याचं ते म्हणाले.
यावेळी कॉ. दत्ता देशमुख कला मंचच्यावतीने गीतगायन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास पगडाल, नंदकुमार सुर्वे यांनी केले. उपस्थितांचे आभार कॉ. मोहन देशमुख यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*