कन्हैय्या कुमारची संगमनेरात सभा : भाजपाचा विरोध

0
 परवानगी न देण्याची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी)-देशद्रोहाचे आरोप असलेला विद्यार्थी नेता कान्हैय्याकुमार याच्या सभेस परवानगी नाकारावी अशी मागणी संगमनेर भाजपने तहसिलदार, पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
संगमनेर भाजपचे ज्येष्ठ नेते राम जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे व शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले
. या निवेदनात मागणी केली आहे की,दि. 5 नोव्हेंबर रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे दुपारी 12 वाजता कन्हैय्याकुमार या तथाकथित कमुनिस्ट विद्यार्थी नेत्याच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर व्यक्तीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला आहे.
भारत तेरे तुकडे होंगे अशा देशद्रोही घोषणा देताना तो टीव्ही कॅमेरात चित्रित झालेला आहे. अशा देशद्रोही आणि असभ्य व्यक्तीची सभा आयोजित करणेच मुळात चुकीचे आहे. यापूर्वी जामिनावर सुटलेले कबीर कला मंचाचे पूर्वाश्रमीचे नक्षलवादी, आदिवासी विद्यार्थी मेळाव्यास आलेले वामपंथी व आता कन्हैय्याकुमार या सभांच्या साखळी मागे प्रचलित लोकशाही व्यवस्था व प्रशासनाविरुद्ध भडकविणे, असे हे छुपे नक्षलवादी सूत्र जाणवत आहे.
तरी या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून अशा कन्हैय्याकुमार सारख्या देशद्रोही व्यक्तीस संगमनेर परिसरात येऊ दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्‍न निर्माण होईल. तरी या सभेस परवानगी देऊ नये, व दिलेली असल्यास रद्द करण्यात यावी.
या सभेमुळे राष्ट्रप्रेमी नागरिक व कन्हैय्या समर्थक यांच्यात संघर्ष होवून शहरातील वातावरण खराब होण्याची शक्यता आहे, असे झाल्यास त्यास सभेचे संयोजक जबाबदार राहतील, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला.

 

LEAVE A REPLY

*