सप्तशृंगीगडावर पायी जाणाऱ्या भाविकांना चिरडले; तीन ठार, दोन गंभीर

0

देवळा | प्रतिनिधी

चैत्र यात्रोत्सवानिमित्ताने सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांना भरधाव वाहनाने जबर धडक दिल्याने तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मृतांमध्ये देवळा शहरानजीकच्या गुंजाळनगर येथील तेरा वर्षीय बालकाचा समावेश असुन अन्य दोघा मयतांची अद्याप ओळख पटलेली नाही.

जखमींवर नाशिक येथे उपचार सुरु आहेत. याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास कळवण जवळील कोल्हापूर फाट्याजवळ पायी गडावर जाणाऱ्या भाविकांना भरधाव वेगाने जाणाऱ्या एम.एच.१९ – सी.एफ – ०७५१ या ट्रक्स वाहनाने जोरदार धडक दिली.

या घटनेत देवळा तालुक्यातील गुंजाळनगर येथील शुभम बापू देवरे (वय १३) या बालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार जखमींवर नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.

गुंजाळनगर येथील शुभम हा तालुक्यातील खालप येथे आपल्या आत्याकडे गेला होता व तेथूनच इतर भाविकांबरोबर पायी गडावर जात होता असे समजले.

या दुर्दैवी घटनेने देवळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. मयत शुभमच्या पश्चात आई, वडिल, व एक बहिण असा परिवार आहे. त्याच्यावर आज दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

*