Video : नवीन सुकाणू समिती गठीत होणार; नवलेंनी केली शेतकऱ्यांची दिशाभूल

कल्पना इनामदार यांचा आरोप

0
नाशिक : तत्वत: कर्जमाफीवर विरोध असून लवकरात लवकर शासनाने कर्जमाफीवर निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या वीस दिवसांत शेतकरी प्रश्न सोडवण्यासाठी नवीन सुकाणू समिती गठीत केली जाईल, असे कल्पना इनामदार यांनी आज सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीवर जे स्पष्टीकरण दिले होते, तेच या सुकाणू समितीने केलेल्या चर्चेत आहे. असे सांगत त्यांनी सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप कल्पना इनामदार यांनी केला आहे. त्या नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

दरम्यान, कल्पना इनामदार यांच्याबद्दल मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही असे स्पष्टीकरण सरकारशी चर्चा झालेल्या सुकाणू समितीच्या डॉ. अजित नवले यांनी देशदूत डिजिटलशी बोलतांना दिले आहे.

इनामदार यांनी सांगितले की, हमीभावावर कुठलीही चर्चा झाली नाही. हमीभावाचे काय होणार आहे याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन आहे त्याचे नेतृत्व शेतकऱ्यांनीच केले पाहिजे.

या समितीमध्ये फक्त शेतकरी आणि शेतीतज्ञ असतील कुणीही राजकीय नेता नसेल. तसेच नाशिकमधील सुकाणू समितीचे निमंत्रक अजित नवले यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आंदोलन हायजॅक करायला सरकारला मदत केल्याचा आरोप इनामदार यांनी केला आहे.

जसे मराठा आंदोलन झाले त्याचा कुठेही आता विषय घेतला जात नाही, तसेच शेतकरी आंदोलनही सरकारने राजकीय नेत्यांना गळाला लावून हायजॅक केले आहे. आपण शेतकरी प्रश्न सोडविण्यासाठी आता लढा तीव्र करणार असून तत्वत: कर्जमाफी हा फसवा शब्द आहे असेही इनामदार यांनी म्हटले आहे.

एका बाजूला कल्पना इनामदार यांनी सुकाणू समितीच्या सदस्यांवर आक्षेप घेत असतानाच आंदोलनाशी संबंधित काही शेतकऱ्यांनी मात्र आम्ही त्यांना ओळखतच नाही, कोण आहेत त्या? इथपासून ते सुकाणू समितीत त्या कशा आल्या? त्या शेतकरी आहेत का? असे आक्षेप घेतले आहे.

गिरणारे येथील आंदोलनकर्ते म्हणाले की नुकत्याच झालेल्या शेतकरी परिषदेत या कल्पना इनामदार थेट व्यासपीठावर येऊन बोलणाऱ्या वक्त्याच्या हातातला माईक काढून घेतला होता. ही बाब नक्कीच खटकणारी होती. त्यांचा या आंदोलनात वादग्रस्त वक्तव्य करण्याचा नक्की काय हेतू आहे, याबद्दलही शंका असल्याचे या शेतकऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान कल्पना इनामदार यांच्या सांगली येथील कार्यकर्त्यांशी देशदूत डिजिटलने संपर्क केला, तेव्हा त्यांनी जत आणि आटपाडी येथील पाणीप्रश्न उपोषण आणि आंदोलनाच्या मार्गातून सोडविल्याचे त्यांनी सांगितले.
त्या मूळच्या मुंबईतील असून सामाजिक कार्यकर्त्या आहेत अशी पुष्टीही त्यांनी दिली.
(आमची भूमिका : शेतकरी आंदोलनाचा कुणी स्वत:च्या राजकीय आशा आकांक्षासाठी फायदा घेऊ नये, त्यात फूट पाडू नये आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मुळापासून सुटावेत ही भावना शेतकऱ्यांप्रमाणेच देशदूत (डिजिटलची) आहे. शेतकरी आंदोलनाचे वेळोवेळी लाईव्ह वृत्तांकन देशदूत डिजिटलने निष्पक्षपणे केले आहे. खऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न शाश्वत सुटावेत असे आम्हाला मनापासून वाटते. – देशदूत डिजिटल)

 

LEAVE A REPLY

*