शिर्डी (काकडी) विमानतळाचे उदघाटन : काकडीच्या शेतकर्‍यांना वाटाण्याच्या अक्षता!

0

विमानतळ उद्घाटनापासून ठेवले दूर : योगदानाचा पडला विसर

कोपरगाव/संगमनेर (प्रतिनिधी) – शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ज्या शेतकर्‍यांनी आपली बहुमूल्य शेतजमीन दिली, त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम सरकारकडून झाले आहे.
रविवारी विमानतळाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी काकडीकरांना बेदखल करण्यात आले. समारंभात या शेतकर्‍यांच्या योगदानाचा साधा नामोल्लेखही न झाल्याने नाराजी व्यक्त झाली आहे. तसेच प्रोटोकॉलच्या नावाखालीगावाची कोंडी करण्यात आली.
रविवारी शिर्डी विमानतळाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पण झाले. कोपरगाव, राहाता आणि संगमनेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या काकडी गावात विमानतळ आहे. मात्र सरकारी पत्रिकेत काकडीचा तालुका बदलण्यापासून गावाला बेदखल ठेवण्यापर्यंतचे सरकारी कुभांड काकडी ग्रामस्थांना आवडलेले नाही.
या विमानतळासाठी जमीन उपलब्ध करून देणार्‍या शेतकर्‍यांच्या योगदानाची कोणतीही दखल घेण्यात न आल्याने नाराजीत भर पडली आहे. समारंभापासून काकडीच्या ग्रामस्थांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विमानतळाचा पहिला आराखडा स्व.विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना आकारास आला. देशमुख साईबाबांचे निस्सिम भक्त होते. त्यामुळे त्यांनी या विचाराला चालना दिली. राज्याची स्वत:ची विमानतळ विकास कंपनी असावी, या विचारालाही देशमुख यांनी बळ दिले.
त्यामुळे राज्यात आणि शिर्डीतही विमानतळ विकासाचा मार्ग खुला झाला. आज राज्य सरकारने उभारलेले पहिले विमानतळ म्हणून शिर्डी विमानतळाचा उल्लेख होतो, हे त्याचेच फलित.
विमानतळासाठी काकडीची निवड झाली. लोणीचे विखे पाटील आणि संगमनेरचे थोरात अशा दोघांच्या पथ्यावर पडणारे ठिकाण असल्याने या प्रकल्पाला चालनाही मिळाली. प्रारंभी शेतकर्‍यांना एकरी 3 लाखांचा मोबदला दिला जाणार होता.
मात्र विलासराव देशमुखांनी शेतकर्‍यांच्या योगदानाचे महत्त्व ओखळून तो एकरी 7 लाखांपर्यंत वाढवला. पुढे आ.बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण मंत्रिमंडळात महसूलमंत्री झाले. त्यानंतर कामाला वेग आला. प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत जमीनींचे दर वाढल्याने शेतकर्‍यांना एकरी 10 लाखांवर दर मिळाला.
तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विमानतळाचे भूमिपूजन केले. जिल्ह्यातील दोन्ही मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघांना फळ, भाज्या, दूग्धपदार्थ निर्यातीला या विमानतळाचा फायदा होणार असल्याने त्यांनीही यासाठी जोर लावला.
मात्र या सर्व घडामोडीत काकडीच्या शेतकर्‍यांचे योगदान मोठे आहे. आपल्या शेतजमीनी त्यांनी या प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्या. विमानळाच्या निमित्ताने रोजगारासोबत गावातही काही सुविधा निर्माण होतील, अशी गावकर्‍यांची अपेक्षा होती.
आज विमानतळ साकारले मात्र गावाची दैनावस्था तशीच आहे. काकडी गावासाठी एसटी महामंडळाची साधी बस सुरू करण्याचे औदार्य सरकार दाखवू शकले नाही. रविवारी गावातून विमान उडणार म्हणून लोकलज्जेखातर शनिवारपासून घाईगर्दीत गावासाठी एसटीच्या फेर्‍या सुरू करण्यात आल्या.
विमानतळ उद्घाटनासाठी काकडीच्या सरपंच नानूबाई सोनवणे यांना निमंत्रण देण्यात आले. मात्र सुरक्षा पास पुरवला नाही. त्यामुळे गावाकडून प्रातिनिधीक स्वरूपात उपस्थित राहण्याची त्यांची संधी हुकली. दोन दिवसांपूर्वी काकडी गाव राहाता तालुक्यात असल्याची नोंद अधिकार्‍यांनी निमंत्रण पत्रिकेवर केली.
त्यावरून कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे आणि बिपीनदादा कोल्हे यांनी अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली होती. आज काकडीच्या शेतकर्‍यांच्या योगदानाचा उल्लेख मुख्यमंत्री किंवा अन्य पाहुण्यांकडून होईल, अशी अपेक्षा असताना तो जाणीवपूर्वक टाळण्यात आला, अशी भावना काकडी ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.

खेदजनक –
विमानतळ उभारणीसाठी जमीन देणार्‍या काकडीच्या शेतकर्‍यांचे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या योगदानाचा साधा उल्लेख करण्याचे औदार्य सरकारला दाखवता आले नाही, हे खेदजनक आहे. व्यासपीठावर स्थानिक नेतेही होते. त्यांना संपूर्ण परिस्थितीची जाणीव होती. त्यांनाही विसर पडावा, हे अधिक क्लेषदायक आहे. -आ.बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

*