हरिश्चंद्र गडावर रंगणार ‘काजवा महोत्सव’

वनविभागाकडून तयारी सुरू; स्थानिकांनाही रोजगार संधी

0
नाशिक : अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्याच्या परिसरात यंदा काजवा महोत्सव होणार असून त्यासाठी वनविभागाकडून तयारी सुरू आहे.

एक आठवडाभर हा महोत्सव सुरू राहणार असून याद्वारे स्थानिकांना रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

काजवा महोत्सवाचे ‘ब्रॅन्डिंग’ मोठ्या प्रमाणात झाल्याने दरवर्षी या ठिकाणी पर्यटकांची संध्याकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी उसळते. या अभयारण्याच्या क्षेत्रात सादडा, बेहडा, उंबर, बोंडारा, करंज, हिरडा हे वृक्ष असल्याने या वृक्षांवर काजवे मोठ्या प्रमाणावर असतात.

रात्रीच्या वेळेला काजवे बाहेर येऊन झाडांची पाने खातात. त्यामुळे संपूर्ण परिसर चमकतो. संपूर्ण परिसरात एक वेगळेच जादुमयी वातावरण असते. हा महोत्सव पाहण्यासाठी नाशिक, नगरहून मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. वनविभागाकडून यंदा नियोजन सुरू असून होणार्‍या गर्दीचे नियोजन करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या मदतीने तयारी केली जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महमंडळामार्फत जाणार्‍या पर्यटकांना वगळले तर कोणतेही पर्यटक जे स्वयंस्फूर्तीने या अभयारण्याच्या परिसरात हजेरी लावतात त्यांच्याकडून स्वयंशिस्तीचे पालन कसे होईल यादृष्टीने नियोजन केले जात आहे.

हा आगळावेगळा महोत्सव नाशिककरांनी अनुभवावा यासाठी नियोजन केले जात आहे. परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारे निसर्गाची हानी होऊ नये यासाठी जनजागृती करण्यावर भर असणार आहे. हॉर्नच्या आवाजावर नियंत्रण, डीजे आदींसह वाहनांचा आवाज कमी राखावा यासाठीही नियोजन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*