कैलास गिरवले मृत्यू प्रकरण : मामांचा मर्डर !

0

बंधू बाबासाहेब गिरवले यांची पोलिसांविरुध्द तक्रार

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि फटाका असोसिएशनचे अध्यक्ष कैलासमामा रामभाऊ गिरवले यांचे उपचार सुरू असताना पुण्यात सोमवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास निधन झाले. पोलिसांच्या मारहाणीत मामांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी त्यांचा मर्डर केल्याची तक्रार त्यांचे बंधू बाबासाहेब गिरवले यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. एसपी ऑफिसला त्यांची चौकशी सुरू असताना त्यांच्या समर्थकांनी एसपी ऑफिसवर दगडफेक करत त्यांना पोलिसांच्या ताब्यातून पळवून नेल्याचा आरोप आहे. या संदर्भात भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कैलास गिरवले हे या गुन्ह्यातील एक आरोपी आहेत. याच गुन्ह्यात पोलिसांनी गिरवले यांना 8 एप्रिल रोजी अटक केली. या गुन्ह्यात कोर्टाने गिरवले यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर गिरवले यांना नाशिक सबजेलमध्ये हलविण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी माळीवाड्यातील एका गाळ्यावर छापा टाकून तेथून फटाके व इतर मुद्देमाल जप्त केला.

महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी गिरवले यांना नाशिक सबजेलमधून वर्ग करून घेत 13 एप्रिल रोजी रात्री 10.40 वाजता अटक केली. 14 तारखेला त्यांना कोर्टासमोर उभे केले गेले. त्यात कोर्टाने एक दिवसांचा पीसीआर दिला. 15 तारखेला सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास गिरवले यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना तत्काळ सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याच्या ससून हॉस्पिटलला रेफर केले. त्याच दिवशी गिरवले यांच्या मेडिकल उपचाराचे कागदपत्र पोलिसांनी कोर्टासमोर हजर केले. कोर्टाने त्यांना त्यात 27 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
14 तारखेला गिरवले यांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर पीसीआर मिळाला.

त्यावेळी अडीज वाजेच्या सुमारास बाबासाहेब गिरवले हे कैलास गिरवले यांना तेथेच भेटले. त्यावेळी मामांनी ‘पोलिसांनी मला काठीने ठोसून लाथाबुक्क्यांनी पोटात व छातीत तसेच पाठीवर मारहाण केली. तेव्हापासून माझ्या पोटात मोठ्या प्रमाणात वेदना चालू झाल्या असून तेव्हापासून मी काही अन्न खाल्ले की माझ्या पोटात प्रचंड वेदना होत असल्याचे सांगितले. पोलिसांकडे तक्रार करून घेत उपचार करून घे असे बाबासाहेबांनी मामांना सूचविले. त्यानंतर मामाने सांगितले ‘पोलीस निरीक्षक दिलीप पवार, श्रीधर गुठ्ठे, पोलीस काळे व इतर दोन-तीन पोलिसांनी मला बेदम मारहाण केली.

मामांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आणले त्यावेळी त्यांचे हातपाय थंड पडले होते. छातीत दुखत होते. घामही येत होता. त्यामुळे नगरच्या डॉक्टरांनी पुण्याला हलविण्याचा सल्ला दिला. मामा स्वत: व्हिल चेअरवर बसून अ‍ॅम्बुलन्समध्ये बसले. तीन वाजता ते ससूनला पोहचले. रात्री 9 वाजेच्या सुमारास मामांची तब्येत अचानक बिघडली. ससूनच्य डॉक्टरांनी दुसरीकडे शिफ्ट करण्याचे सांगितले, पण जावई शशिकांत गायकवाड हे एकटेच असल्याने निर्णय घेण्याचे सांगत बाबासाहेब 16 तारखेला सकाळीच ससूनला पोहचले. त्यावेळी मामा शुध्दीवर होते. पोलिसांनी मारल्यामुळेच माझी ही परिस्थिती झाली आहे. हे सांगताना मामांच्या डोळ्यात पाणी आले. त्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. लगचेच व्हेंटीलेटर लावून उपचार सुरू झाले. डॉक्टरांनीही पेशंट हाताबाहेर गेल्याचे सांगितले. मामांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून त्याला जबाबदार असणार्‍या पोलिसांवर कारवाई करावी अशी तक्रार बाबासाहेब गिरवले यांनी बंडगार्डन पोलिसांकडे दिली आहे.

पोलीस म्हणतात हार्टअ‍ॅटक आला
मामांना ससूनमधून रुबीमध्ये शिफ्ट करताना डॉक्टरांनी कोर्ट ऑर्डरशिवाय परवानगी दिली नाही. नातेवाईकांच्या मागणीनुसार कोर्ट आदेशानंतर रुबीला शिफ्ट करण्याची परमीशन दिली गेली. 16 तारखेला दुपारी एक वाजता रुबीच्या डॉक्टरांची टीम ससूनला पोहचली. त्यांनी तपासणी केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने रुबीला हलविता येणार नाही असे तोंडी सांगितले. सायंकाळी सव्वा वाजेच्या सुमारास डॉ. अश्‍विन पिल्ले यांनीही पेंशची प्रकृती खालावल्याने शिफ्ट करणे उचित नाही असा अहवाल दिला. त्यानंतर रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी गिरवले यांचे हार्टअ‍ॅटकने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याची प्रेस नोट पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

पोलीसच जबाबदार
पोलिसांनी गिरवले यांना उच्च प्रतीच्या वैद्यकीय सुविधा उपचार उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे त्यांना वेळेत चांगले उपचार मिळाले नाहीत. पोलिसांनी अटकेनंतरच्या वैद्यकीय तपासणी करतेवेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही. एकूणच या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचे दिसते. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी केली आहे.

रक्तवाहिनीला इन्फेक्शन
पोलिसांनी गिरवले यांच्या मृत्यूबाबत अ‍ॅडव्हान्स सर्टीफिकेट घेतले आहे. त्यात हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या मुख्य रक्तवाहिनीला इन्फेक्शन झाले असल्याचे म्हटले आहे. त्यातील व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला असल्याचे या सर्टीफिकेटमध्ये म्हटले आहे.

संग्राम जगताप मामासाठी मैदानात
गिरवले यांच्या मृत्युनंतर कोठडीत असलेले आमदार संग्राम जगताप मैदानात आले आले. त्यासाठी त्यांनी कोर्टाची स्पेशल परमिशन घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. संग्राम जगताप कोठडीतून थेट कोतवाली पोलीस ठाण्यात आले. गिरवले यांच्या कुटुंबियांसोबत ते पोलिसांसोबत विचार विनीमय करण्यात व्यस्त होते. प्राप्त माहितीनुसार ते गिरवले यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित राहतील असे समजते.

302चा गुन्हा नोंदवा तोपर्यंत विधी नाही
मामांनी असा कोणता मोठा गुन्हा केला होता, की पोलिसांनी त्यांना घरातून उचलून नेत मारहाण केली. पोलिसांनी त्यांना कोठडीत असताना खूप मारले. त्यांना पाणीही दिले नाही. डॉक्टरांनीही काळजी घेतली नाही. त्यामुळेच मामांचा मृत्यू झाला. यासदंर्भात खुनाचा नोंदवावा. त्याशिवाय अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा कैलासमामा गिरवले यांच्या नातेवाईकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात घेतला.

वळसे, मुंडे उद्या नगरमध्ये
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे उद्या (बुधवारी) नगरला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

डेडबॉडी सुप्यात, गिरवले कुटुंबीय कोतवालीत!
गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत डेडबॉडीवर विधी करणार नाही अशी भूमिका गिरवले कुटुंबियांनी घेतली. पुण्यातून निघालेली डेडबॉडी त्यासाठी सुप्यातच थांबविण्यात आली आहे. तेथेही पोलिसांचे सुरक्षा कवच तैनात करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजेपर्यत डेडबॉडी सुप्यात अन् कुटुंबिय पोलीस ठाण्यात अशी परिस्थिती होती.

LEAVE A REPLY

*