Type to search

Featured सार्वमत

सिनेमातील कथानकाप्रमाणे ’दत्तात्रय’ कडप्पा जंगलातून निसटला!

Share

माळवाडगावच्या तरुणाचे नांदेड रेल्वे स्टेशनवरुन झाले होते अपहरण

माळवाडगाव (वार्ताहर) – यवतमाळ-नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील ढाणकी (ता. उमरखेड) या गावात मुलीला मामाच्या गावाला (सासूरवाडीला) सोडवून नांदेड-पुणे एक्स्प्रेसने श्रीरामपूरला येण्यासाठी तिकीट काढून नांदेड रेल्वेस्थानकावर विश्रांती घेत असताना बेपत्ता झालेल्या माळवाडगाव येथील दत्तात्रय गोरक्षनाथ गाढे (वय 36) या तरुणाचे अपहरण करण्यात आले. मात्र कर्नाटकच्या कडाप्पा जंगलातून दिवसभर पायी चालत त्याने जवळचे गौरी बिंदूर हे रेल्वे स्थानक पकडून स्वत:ची सुटका करून घेतली.

15 दिवसांपूर्वी नांदेड जवळील ढाणकी (ता. उमरखेड) येथे आपल्या मुलीला सुट्टीत मामाच्या गावाला सोडवून बरोबर सासूबाईने काळजीने दिलेल्या कुळीद, उडीद दाळी पिशवीत बरोबर घेऊन नांदेड स्थानकावर तिकीट काढून बाकड्यावर आराम करत पडलेल्या दत्तात्रय गाढे या तरुणाच्या तोंडावर रात्री 9 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने रुमाल टाकल्याचे त्यास आठवते. त्यानंतर कुठे कसा गेलो हे त्यास काहीच आठवत नाही.

इकडे गावाकडच्या नातेवाईकांसह तिकडील सासूरवाडीचे नातेवाईक पंधरा दिवस जिवाचे रान करत त्याचा शोध घेत होते. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गायब असल्याची खबर देऊन उमरखेड (जि. यवतमाळ) येथील पोलीस ठाण्यातही खबर देण्यात आली. रेल्वे पोलिसांमार्फत नांदेड ते पुणे मार्गावरील प्रत्येक स्टेशनवर फोटो लावण्यात आले होते. याशिवाय देव देवलाशी, बाबा ज्योतिषी यांचाही आधार घेण्याचे काम चालू असताना काल कर्नाटकमधून अचानक घरी फोन आला. तोंडचे अन्न पाणी पळालेल्या नातेवाईकांना अचानक हायसे वाटले.

…अन दत्तात्रय कडाप्पा जंगलातून निसटला
नांदेड रेल्वे स्थानकावर रुमाल टाकून गुंगीचा स्प्रे मारण्यात येऊन अपहरण करण्यात आले. अपहरणानंतर अर्धवट शुद्ध आल्यानंतर आंध्रप्रदेश हद्द पार करून कर्नाटकमधील एका घनदाट जंगलात जनावरांच्या गोठ्याप्रमाणे एका गोडावून मध्ये 25-30 माणसांच्या गोठ्यात आपण असल्याचे जाणवले. तब्बल आठ दिवस खाण्यासाठी फक्त भात दिला जायचा. गुंगीचे औषधामुळे तब्येतीत सुधारणा होत नसल्याने तो पडून होता. 26 एप्रिल रोजी दत्तात्रयला त्या कोंडवाड्यातील दोन तरुण भेटले. त्या दोन तरुणासह पहाटे 5 वाजता शौचास जाण्याचे निमित्त करून तिघांनी पोबारा केला.

जंगल दर्‍याखोर्‍यातून मार्ग काढत सायकाळी 4 वाजता त्यांना गौरीबिंदूर हे रेल्वे स्टेशन दिसले. याठिकाणी स्टेशन बाहेर एका महिलेने मदत करून मोबाईल दिला. या मोबाईलवरून तिघांनीही आपापल्या कुटुंबातील व्यक्तीशी संपर्क साधला. तिकीट खिडकीजवळ न जाता रेल्वे आल्यावर तिघेही वेगवेगळ्या डब्यात चढा तुमच्या मागावर कुणी असू शकते असा सल्लाही महिलेकडून मिळाला. अन्य दोघे महाराष्ट्रीयन नव्हते. दत्तात्रय जवळील मोबाईल, दोन हजार रुपये, पिशवी बॅग सर्व गायब झाल्याने रेल्वेने पुन्हा नांदेड स्टेशनवर येऊन ढाणकी (उमरखेड) येथे सासूरवडीला आला.

दत्तात्रय याच्यावर प्रचंड मानसिक दबाव असून मोजकेच बोलतो. ठामपणे तिकडील घडलेला घटनाक्रम सांगत नसल्याने सासूरवडीच्या नातेवाईकांनी त्यास रुग्णालयात नेऊन सिटीस्कॅन केले. डॉक्टरांनी प्रचंड दबाव असल्याचे सांगितले. औषधोपचारानंतर सासूरवडीच्या नातेवाईकांनी त्याला श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील कुटुंबाकडे सुपूर्द केले.

पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
उमरखेड (नांदेड) पोलिसांनी योग्य रीतीने तपास केल्यास दत्तात्रय ठणठणीत झाल्यावर अपहरण करणार्‍या टोळीचा छडा लागू शकतो. ही किडणी तस्करी करणारी टोळी आहे काय? किंवा अन्य तस्करांच्या अड्ड्याचा मागोवा निश्चित सापडेल. ही टोळी देशपातळीवर सर्वत्र कार्यरत असल्याचा संशयामुळे पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!