जूनपासून शेतकरी संपावरच

0

पुणतांबा येथील राज्यव्यापी मेळाव्यात शिक्कामोर्तब

पुणतांबा (वार्ताहर) – सर्वच शेतमालाचे भाव गडगडले असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी एक जूनपासून संपावर जाण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
किसान क्रांतीच्या वतीने पुणतांबा येथे मुक्ताई मंदीराच्या सभागृहात आयोजित केलेल्या राज्यव्यापी बैठकीत शेतकरी व विविध संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी एक जूनपासून सुरू होणार्‍या शेतकरी संपाबाबतच्या आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली.
हा संप यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी व शेतकरी संपावर गेल्यामुळे काय होते हे सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी केले.
यावेळी किसान क्रांतीचे राज्यातील अनेक जिल्ह्यातील समन्वयक वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी तसेच पुणतांबा परिसरातील धनंजय जाधव, सुहास वहाडणे, सर्जेराव जाधव, गणेश बनकर, एस.आर. बखळे, अभय धनवटे, प्राणिल शिंदे, धनंजय धोर्डे, संजय जाधव, भूषण वाघ आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटील म्हणालेे की, भारतात पाकिस्तानी कलाकार खेळाडूंना बंदी आहे, मात्र पाकिस्तानकडून 45 रूपये दराने कांदा कसा आयात केला जातो. तसेच चीनकडून 145 रुपये दराने तूर खरेदी केली जाते. अशा चुकीच्या धोरणामुळेच शेतकरी उध्वस्त झाला आहे. आज द्राक्षे, कांदा, चिकू, मिरची, संत्रा आदींसह सर्वच मालाचे भाव कमी झाले आहेत. शासनाने शेत मालाला हमीभाव दिला.

 

पाहिजे, निर्यात बंदी उठविली पाहिजे. तसेच शेतकर्‍यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या पाहिजेत. शेतकर्‍यांच्या संपात वेगवेगळ्या संघटना असल्या तरी शेतकरी डोळ्यासमोर ठेऊनच या आंदोलनात सर्वांनी उतरावयाचे आहे. उद्योगपतींना स्वस्त दराने कच्चा माल पुरविण्यासाठी सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवित आहे. शेतकर्‍यांनी आरपारच्या लढाईसाठी सिध्द व्हावे असे आवाहनही त्यांनी केले. सेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे यांनी संपाबाबत मुख्यमंत्र्यासोबत कोणी सौदेबाजी करून संप फोडण्याचा किंवा स्थगित ठेवण्याचा प्रयत्न केला तर शेतकरी माफ करणार नाही. पुणतांब्यातील काहींनी केलेला स्टंट त्यांच्या अंगलट आला असून या बैठकीमुळे शेतकरी संपावर जाणार हा संदेश राज्यभर गेला आहे.
यावेळी जयाजी सूर्यवंशी, अनिल घनवट, सिमा नरोडे, अनिल देठे, मकरंद सोनवणे, डॉ. अनिल नवले, शिवाजी नांदखिले, शांताराम कुंजीर, सतीश कानवडे, योगेश रायते, रावसाहेब गाढवे, संदीप गिडे आदींसह अनेकांनी मनोगत व्यक्त करून शेतकरी संपाबाबत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. तसेच राज्यातील ज्या ज्या संघटना संपाला पाठिंबा देत आहे व देणार आहेत त्यांच्याशी संपर्क ठेऊन संप यशस्वी करावा असे आवाहन केले. प्रास्ताविक धनंजय जाधव यांनी केले तर उपसरपंच प्रशांत वाघ यांनी सूत्रसंचलन केले.बैठकीमुळे शेतकरी संपाच्या आंदोलनाला धार आली आहे.

 

असे घेण्यात आले निर्णय…

शेतकर्‍यांनी मुले, बायका, जनावरांसह संपात उतरून संपाची तीव्रता वाढवावी असेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी संपाच्या निमित्ताने मशालज्योत पेटविण्यात आली व शेतकरी आंदोलनाबाबत व संप फुटू नये म्हणून शपथ देण्यात आली.
राज्यव्यापी बैठकीत राज्यातील अनेक जिल्ह्यातून 23 पैकी 19 प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकरी संपाला विरोध करणार्‍यांना शेतकरी द्रोही संबोधन्यात येईल असा ठराव बैठकीत संमत झाला.
25 ते 30 मे 2017 पर्यंत धरणे आंदोलन व शासनाने लक्ष दिले नाही तर 1 जूनपासून बेमुदत संपाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी दूध व भाजपाला विक्री व पुरवठा बंद करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

 

LEAVE A REPLY

*