महिलांनी कायद्याचा गैरवापर करू नये : न्या. वर्षा पाटील

0
श्रीगोंदा (प्रतिनिधी)- महिलांच्या होणार्‍या कौटुंबीक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 व नियम 2006 संपूर्ण भारतात लागू केलेला आहे. म्हणून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जनजागृती करण्यासाठी विधी साक्षरता अभियान तालुक्यात राबविले जात आहे. कौटुंबीक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याचा गैरवापर तलवारीसारखा न करता ढालीसारखा योग्य वापर करावा असे प्रतिपादन श्रीगोंदा न्यायालयाच्या न्यायाधीश  वर्षा पाटील यांनी हिरडगाव येथे बोलताना केले.
श्रीगोंदा तालुका विधिसेवा समिती, वकील संघ व ग्रामीण विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हिरडगाव येथे आयोजित केलेल्या विधी साक्षरता अभियानात न्या. पाटील अध्यक्ष पदावरून बोलत होत्या. त्या म्हणाल्या कौटुंबीक हिंसाचार म्हणजे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्तेसाठी महिलेला अपमानीत करणे, तिला शिवीगाळ करणे, विशेषत: अपत्य नसल्यामुळे तिला हिणविणे किंवा धमकाविणे, त्रास देणे, दुखापत करणे, घराबाहेर काढणे, जखमी करणे किंवा पीडित महिलेचा जीव धोक्यात आणणे किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंड्याची मागणी करणे या सर्व बाबींना कौटुंबीक हिंसाचार म्हटले जाते. आणि कौटुंबीक हिंसाचारास प्रतिबंध करणारा हा कायदा आहे, असे न्या. पाटील म्हणाल्या.
अ‍ॅड. संभाजीराव बोरुडे यांनी प्रास्ताविक केले. वकील संघाचे अ‍ॅड. ए. जी. पठाण, अ‍ॅड. श्रीराम म्हस्के, अ‍ॅड. अशोक वाळूंज, अ‍ॅड. दीपाली बोरुडे, पंचायत समितीचे ग्रामविकास अधिकारी श्री. गहिरे, सरपंच मुक्ताजी जाधव, उपसरपंच लक्ष्मण दरेकर, अंबादास दरेकर, बाळासाहेब दरेकर, तलाठी विठ्ठल श्रीपत, ग्रामसेविका श्रीमती कांबळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अ‍ॅड. श्रीराम म्हस्के यांनी केले. यावेळी लोणी मावळा येथील खटल्यातील आरोपींना फाशी देणार्‍या जिल्हा सत्रन्यायाधीश न्या. सुवर्णा केवले यांच्या अभिनंदनाचा ठराव प्रा. तुकाराम दरेकर यांनी मांडून आभार मानले.

LEAVE A REPLY

*