Friday, May 3, 2024
Homeब्लॉगजॉनचे तंबाखू युद्ध !

जॉनचे तंबाखू युद्ध !

इंग्लंडच्या राजाच्या आज्ञापत्रानुसार संयुक्त स्टॉक कंपनीने नेमलेला पहिला गर्व्हनर लॉर्ड डी.लावर काही कारणासत्व लवरकरच इंग्लंडला परतला. व्हर्जिनिया व जेम्स टाऊन यांची जबाबदारी त्याने त्याचा उपगर्व्हनर डेल याच्याकडे सोपवली. प्रशासकीय घडी बसविण्यासाठी डेल अतिशय योग्य व्यक्ती होता. त्याने आपल्या प्रशासकीय काळात व्हर्जिनिया परिसरात सुशासन प्रस्थापित केले.

डेल जसा एक उत्तम प्रशासक होता,तसाच तो एक कल्पक माणूस होता. नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची धमक त्याच्यामध्ये होती. त्याने व्हर्जिनियात अनेक रचनात्मक बदल घडवून आणले. जॉन स्मिथने काळाची गरज म्हणून बायबलच्या वचनाचा आधार घेऊन ऐतखाऊ इंग्रंजाना परिश्रमाचे महत्व पटवून दिले होते. तेंव्हा ते संख्येने केवळ ३७ होते. त्यामुळे सामूहिक श्रम करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. आता मात्र जेम्स टाऊन आणि व्हर्जिनिया प्रांत यांची परिस्थिती बदलली होती. नव्या भूमीवर जगण्यासाठी आवश्यक ते कौशल्य इंग्रंजांनी अवगत केले होते. त्यामुळे सामूहिक श्रम ही संकल्पना कालबाहय व प्रगतीला मारक ठरेल. हे डेलसारख्या चाणाक्ष प्रशासकाने लागलीच ताडले. त्याने सामूहिक श्रम संकल्पनेला हद्दपार केले. त्याऐवजी वैयक्तिक श्रम संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षात आणली.

- Advertisement -

डेलने प्रत्येक वसाहतवासीयाला जमीनीचा एक तूकडा दिला. ज्या जमिनीत श्रम करून तो आपला उदरनिर्वाह करू शकेल. डेलच्या योजनेत प्रत्येकाला प्रगतीची संधी होती, मात्र प्रगतीसाठी काही मोल ही चूकवावे लागणार होते. जमिनीच्या बदल्यात प्रत्येकाला कंपनीसाठी वर्षातील एक महिना सक्तीचे मोफत काम करावे लागत होते. तसेच मोठया प्रमाणात शेतसारा ही दयावा लागत होता. असे असले तरी हे लोक समाधानी होते. डेलच्या योजनेमुळे नव्या भूमीवर त्यांना आपली म्हणून एक भूमी लाभली, याचे समाधान त्यांना लाभले. यासाठी त्यांना दयावा लागणारा मोबदला जाचक वाटत नव्हता.

चाणाक्षपणा आणि बळ यांचा मेळ घालत डेलने मूलनिवासी जमातींना वश केले. त्याने मूलनिवासी लोकांसमवेत जसा रोटी व्यवहार निर्माण केला. तसाच बेटी व्यवहार ही सुरू केला. डेलने पौहाटन जमातीच्या सरदाराची मुलगी पोकाहोंसटास हिचे अपहरण केले. तिला जेम्स टाऊनमध्ये बंदी म्हणून ठेवले. काही दिवसांनी तिला ख्रिश्चन करून, तिचा विवाह गर्व्हनर लॉर्ड डी.लावर सोबत आलेल्या जॉन राल्फ वुल्फ याच्यासोबत करून दिला.

मूलनिवासी लोकांशी रोटी-बेटी व्यवहार करतांनाच योग्य त्याठिकाणी बलप्रयोग करणे. तसेच त्यांना ख्रिश्चन बनवणे. अशा सुनियोजित योजनेतून डेलने मूलनिवासींचे अस्तित्व सर्वार्थाने संपवण्यास सुरवात केली. डेलच्या कारकिर्दीत अमेरिकेच्या भूमीवरून रेड इंडिअन लोकांच्या समूळ नाशाला प्रारंभ झाला होता. डेलच्या वसाहतवादी व विस्तारवादी धोरणाला पुढे नेण्यासाठी संपत्तीची गरज होती. यासाठी सोन्याच्या शोधात आलेल्यांना सर्वप्रथम काळया मातीत घाम गाळावा लागला. या मातीतूनच संपन्नतेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. जॉन राल्फ वुल्फ हा रेड इंडियन जमातीचा पहिला इंग्रंज जावई मोठा हिकमती होता.

इंग्लंडमधील एका संपन्न मळेवाल्याचा (Planter) म्हणजे आपल्या भाषेत बिग बागायतदाराचा हा मुलगा. अमाप सोन्याच्या शोधात जेम्स टाऊनला आला. येथे आल्यानंतर सोन्याचा शोध बाजूला राहिला आणि जगण्याचा प्रश्न महत्वाचा ठरला. डेलने दिलेला जमिनीचा तूकडा घेऊन उदरनिर्वाह करण्याला प्राथमिकता द्यावी लागली. त्याच्या घराण्याकडून वारस्यात मिळालेले शेतीचे ज्ञान त्याच्या कामी आले. उपजत शेतीचे ज्ञान आणि प्रयोगशील वृत्ती यांच्या संयोगातून जॉन राल्फ वुल्फ भावी अमेरिकेचा भाग्यविधाता ठरला. जेम्स टाऊनमध्ये शिल्लक राहिलेले ६० जण आणि लॉर्ड डी.लावर याच्या तीन जहाजांमधून आलेले लोक. अशा सर्व देशबांधवाना जगविण्याचे आणि व्हर्जिनियाला पुनर्जन्म देण्याचे शिवधनुष्य जॉनने पेलण्याचे ठरवले. वसाहतीला स्थैर्य व सुबत्ता मिळण्यासाठी सर्वप्रथम शेतीच उपयुक्त ठरू शकते.

शेतीतून समृद्धी साधायची असल्यास नगदी पीक घेणे आवश्यक आहे. हे जॉनने हेरले. हे नगदी पीक म्हणजे तंबाखू. व्हर्जिनियाची जमिन तंबाखूच्या पीकासाठी उत्तम असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने तंबाखूच्या शेतीला सुरवात केली. तंबाखूचे उत्पादन करण्यावरच जॉन थांबला नाही. विक्री योग्य करण्यासाठी हया तंबाखूवर प्रक्रिया करण्याची एक नवी पद्धत त्याने शोधली. त्याच्या शोधामुळे व्हर्जिनियाची तंबाखू तेंव्हा युरोपात अत्यंत लोकप्रिय ठरली. आजही व्हर्जिनियातील तंबाखू जगात लोकप्रिय आहे.

जॉनच्या तंबाखूच्या उत्पादनाचा आणि तिच्या व्यापाराचा इतिहास मोठा रंजक आहे. याला आपण तंबाखू युद्ध देखील म्हणू शकतो. शीत हवामानामुळे युरोपात पूर्वीपासून तंबाखू सेवनाचे प्रमाण अधिक आहे. १५०० ते १६४० या काळात युरोपातील तंबाखू उत्पादन – व्यापार यावर स्पेन व स्वीडन यांचे प्रभूत्व होते. स्पेन-स्वीडन येथे पिकवली जाणारी तंबाखू युरोपात लोकप्रिय होती. अतिशय उच्च दर्जाच्या या तंबाखूचे व्यसन उभ्या युरोपला लागले होते. ह्या दोन्ही देशांनी आपले तंबाखूचे उत्पादन आणि प्रक्रिया यांच्याबाबत कमालीची गुप्तता राखली होती.

आपल्या उत्तम दर्जाच्या नगदी पिकाची मशागत, बियाणे आणि प्रक्रिया यांच्या गोपनीयतेबाबत हे देश अत्यंत दक्ष होते. युरोपातील प्रत्येक देशात स्पॅनिश व स्वीडीश तंबाखूचा खप आणि किंमत वर्षागणिक वाढत होती. इंग्लंड व स्पेन यांच्यातील व्यापारी तूट तंबाखूच्या आयातीने दिवंसदिवस वाढत गेली. व्हर्जिनिया कंपनीने तंबाखूच्या व्यापारात नशीब आजमावण्याचे ठरवले.

कंपनीने व्हर्जिनियातील स्थानिक जमातींनी पिकवलेली तंबाखू युरोपिअन देशांमध्ये विकण्याचा प्रयत्न केला. ही तंबाखू युरोपला आवडली नाही. एवढेच काय तर त्यांच्या मायदेशातील तंबाखू चाहत्यांनीही तिच्याकडे पाठ फिरवली. आपली तंबाखू आपल्याच देशात विकली जात नाही. याची खंत कंपनीला होतीच; परंतु युरोपातील तंबाखूची एवढी मोठी बाजारपेठ ही तिला अस्वस्थ करत होती. जॉन राल्फ वुल्फने व्हर्जिनियामध्ये तंबाखूच्या लागवडीला सुरवात केली.

सन १६११ मध्ये त्याने स्पॅनिश तंबाखूचे बियाणं मिळवलं. आपल्या तंबाखूच्या बियाण्याच्या बाबतीत कमालीची गोपनियता राखणार्‍या स्पॅनिशांच्या जबडयातून त्याने हे बियाणं कसं मिळवलं ? हे आजही जगासाठी एक कोडे आहे. हया रहस्यावरचा पडदा आजही बाजूला झालेला नाही. याला कारण ते एका महासत्तेच्या उद्याचे रहस्य आहे. यासंदर्भात विविध कथा सांगितल्या जातात.

अशाच एका कथेनुसार जॉनने हे बियाणं इंग्लंडमधील एका व्यापार्‍याकडून हस्तगत केलं, असे सांगितले जाते. स्पॅनिश बियाण्याच्या प्राप्तीमुळे व्हर्जिनियातील तंबाखूची शेती फुलली. जमिनीची अत्यंत सुपिकता आणि अनुकूल हवामान यामुळे तंबाखूचे अमाप पीक यायला सुरवात झाली. १९७२ च्या दुष्काळात अमेरिकेतून आलेल्या मायलो गव्हामध्ये आलेले गाजर गवताच्या बियाण्याने, भारतात गाजर गवताची जितक्या जोमाने व वेगाने वाढ झाली होती. अगदी तसेच तंबाखूचे पीक व्हर्जिनियामध्ये वाढत गेले. जेम्स नदीच्या काठावर तंबाखूची शेती बहरली.

१६१७ साली जॉन राल्फने व्हर्जिनियाच्या भूमीतून पिकलेल्या आणि त्याने शोधलेल्या नवीन प्रक्रियेने तयार केलेल्या तंबाखूने भरलेले पहिले जहाज इंग्लंडला पाठवले. जॉन राल्फचे जहाज इंग्लंडच्या किनार्‍याला लागले आणि युरोपचा इतिहास बदलण्यास सुरवात झाली. जॉन राल्फने पाठवलेल्या तंबाखूमुळे व्हर्जिनियाला, व्हर्जिनियातील तंबाखूमुळे इंग्लंडला आणि अखेर व्हर्जिनिया कंपनीच्या तंबाखूमुळे जन्माला येणार्‍या अमेरिकेला समृद्धी प्राप्त करता आली. जॉन राल्फच्या कर्तबगारीमुळे युरोपात तंबाखूचे युद्ध रंगणार होते. डेल आणि जॉन हे अमेरिकेतील नीग्रो गुलामीचे जनक ही ठरणार होते.

_प्रा.डॉ.राहुल हांडे,

भ्रमणध्वनी-८३०८१५५०८६

( लेखक धर्म, इतिहास व साहित्य अभ्यासक आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या