‘मुक्त’ दाखवणार पोलिसांना उच्च शिक्षणाची प्रकाशवाट; लवकरच राज्यभर अभ्यासकेंद्रांना सुरुवात

0
नाशिक : नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना या प्रक्रियेत पोलीस कर्मचारी कुठेही मागे राहू नये आणि दैनंदिन जीवनात सामोरे जाव्यालागणाऱ्या सामाजिक, आर्थिक, औद्योगिकीकरण विषयांत त्यांचे ज्ञान वाढावे या उद्देशाने महाराष्ट्र पोलिसांसाठी आता नोकरीच्या जागीच पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या उच्चशिक्षणाची प्रकाशवाट खुली करून देण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने राज्यातील पोलीसांसाठी विशेष दूरशिक्षण शिक्षणक्रम विकसित केला असून, महाराष्ट्र पोलीस आणि मुक्त विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

मुक्त विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयातील यश इन सभागृहात झालेल्या सामंजस्य करारावेळी महाराष्ट्र पोलिसांतर्फे सहायक पोलीस संचालक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलीस उपसंचालक नंदकुमार ठाकूर आणि तिरुपती काकडे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी तर मुक्त विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे उपस्थित होते.

विद्यापीठाचे तत्कालिन कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या पुढाकारातून २०१० मध्ये समाजातील विविध घटकांची गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष शिक्षणक्रम सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलिसांबरोबर सामंजस्य करार करून पोलिसांना पोलीस प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी एम्.बी.ए. (पब्लीक पॉलिसी मॅनेजमेंट) हे शिक्षणक्रम उपलब्ध करून देण्यात आले होते.

दरम्यान २०१५ मध्ये हा सामंजस्य करार संपुष्टात आल्यानंतर काही कारणाने त्याचे नुतनीकरण झाले नव्हते. प्रा. ई. वायुनंदन यांनी कुलगरूपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर त्यांनी डॉ. कृष्णकुमार यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती घेतली आणि विविध कारणांनी खंडित झालेले हे उपक्रम पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले.

मागील महिन्यात भारतीय सेना दलाबरोबर सामंजस्य करार करून महाराष्ट्रात सेवेत कार्यरत असलेल्या सैनिकांसाठी बी.ए. शिक्षणक्रम उपलब्ध करून दिला. याबरोबरच महाराष्ट्र पोलिसांबरोबर नव्याने सामंजस्य करार करण्यासाठी पाठपुरावा केला.

पोलीस महासंचालक सतीश माथूर, अप्पर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) डॉ. जगन्नाथन यांनी हा सामंजस्य करार होण्यासाठी मोलाची मदत केली. याशिवाय संगणकशास्र विद्याशाखेचे संचालक प्रा. माधव पळशीकर यांनीही हा शिक्षणक्रम पुन्हा सुरु करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुक्त विद्यापीठाच्या नाशिक येथील मुख्यालयातील यश इन सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सामंजस्य करारावर आज स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या सामंजस्य कराराच्या अंतर्गत बी.ए. (पोलीस प्रशासन) हा शिक्षणक्रम पोलीस शिपायांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून या शैक्षणिक वर्षातही यासाठी प्रवेश घेता यावा यासाठी विद्यापीठाने परवानगी दिली आहे.   पोलीस शिपाई व सहायक पोलीस उपनिरीक्षकांचा अनेकदा नोकरीमुळे शिक्षणात खंड पडतो. अशा इच्छुकांना आता बी.ए. (पोलीस प्रशासन) हा शिक्षणक्रम करणे शक्य होणार आहे.

विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेच्या अंतर्गत हा शिक्षणक्रम असूनशिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना यामुळे शिक्षणाची संधी तर उपलब्ध होणार आहे. पोलीस दलात काम करताना उपयोगी पडेल असे ज्ञान देणाऱ्या मानवी विनिमय, सामाजिक परिवर्तन व चळवळ, मानवी हक्क व  मूलभूत संकल्पना, ग्राहक संरक्षण, भारतीय समाज, लोकप्रशासन आदीअभ्यासक्रमांचा या शिक्षणक्रमात समावेश करण्यात आला आहे.

पोलिसांच्या कार्यनिपुणता आणि बुद्धिकौशल्यात वाढ करतानाच सकारात्मक बदल घडवून दल अधिकाधिक कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

या शिक्षणक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत घ्याव्या लागणाऱ्या प्रशिक्षणातील पाच अभ्यासक्रमांचे  श्रेय त्यांना मिळणार आहे.  हा शिक्षणक्रम  हवालदार, पोलीस नायक, पोलीस हवालदार यांच्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय, बिनतारी संदेश अशा विविध विभागांत काम करणाऱ्याकर्मचाऱ्यांसाठी हा शिक्षणक्रम विकसित करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीसांच्या सहकार्याने माफक शुल्कात हा शिक्षणक्रम पोलीस कर्मचाऱ्यांना उपलब्ध होणार आहे. दरम्यान भविष्यात पोलीस अधिकाऱ्यांसाठी एम्.बी.ए. शिक्षणक्रम तसेच पोलीसांच्या कुटुंबियासाठी काही कौशल्याधारित शिक्षणक्रम सुरू करण्याचा प्रयत्न देखील या करारांतर्गत करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानव्यविद्या व सामाजिकशास्रे विद्याशाखेचे संचालक डॉ. उमेश राजदेरकर यांनी केले.

राज्यभर अभ्यासकेंद्रे : महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालय, पोलीस मुख्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्रे, राज्य राखीव दल, आणि बिनतारी प्रशिक्षण केंद्र, पुणे अशा विविध ठिकाणी अभ्यासकेंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. 

LEAVE A REPLY

*