Video : इगतपुरीच्या भोंदू निर्मळ बाबाचे पितळ जिजाऊ ब्रिगेडने केले उघड; पाहा व्हिडिओ

0

इगतपुरी । दि १७ प्रतिनिधी :

तालुक्यातील बुवाबाजीचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या टाकेद खुर्द गावातील कोट्यवधींची माया जमवणाऱ्या हरीबाबा निर्मळ ह्या भोंदू बाबाच्या कृष्ण कृत्यांचे पितळ आज जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी उघडे केले.

अनेक वर्षांपासून बुवाबाजीच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणाऱ्या बाबांचा जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी बनावट भाविक बनून भोंदूगिरी समोर आणली आहे.

दरम्यान या भोंदूगिरीबाबत घोटी पोलिसांचे हेतुपुरस्कर अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे, जिल्हा कार्याध्यक्ष चैताली बेजेकर भोंडीवले, कांचन दिघे सहाणे यांनी केला आहे.

दत्त मंदिरा शेजारील बाबाची ही इमारत अतिक्रमणात आहे.

भूलथापा देऊन बाबाने कोट्यवधी रुपयांची इमारत, जमिनी, बँकेतील शिल्लक ह्याबाबत वस्तुनिष्ठ चौकशी करावी अशी मागणी नाशिकचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्याकडे करण्यात येणार आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी कार्यवाही न केल्यास जिजाऊ ब्रिगेडच्या शेकडो महिला घोटी पोलीस ठाण्यावर धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की इगतपुरी तालुक्याच्या ग्रामीण आदिवासी बहुल भाग असणाऱ्या टाकेद खुर्द गावात हरीबाबा निर्मल हा भोंदू बाबा लोकांसह महिलांची भोंदूगिरी करून फसवणूक करीत असल्याचा तक्रारी जिजाऊ ब्रिगेडकडे करण्यात आल्या होत्या.

याच दत्तमंदिरात गुरुवार, रविवार, अमावस्या वेळी दरबार भरतो.

या पार्श्वभूमीवर जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी अनेकदा बनावट भाविक बनून अधिक माहिती घेतली. त्यानुसार हरिबाबा निर्मळ हा बाबा राज्यभरातून आलेल्या भाविकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्याध्यक्षा माधुरी भदाणे यांनी दरबारात हजेरी लावली. यावेळी त्यांनी बनावट भाविक बनून मुलबाळ होत नसल्याचा प्रश्न केला. जिल्हा कार्याध्यक्षा चैताली बेजेकर भोंडीवले यांनी पती नांदवत नसल्याचा प्रश्न विचारला, तर कांचन दिघे सहाणे यांनी नवरा व्यसनी असून मुलीच असल्याचा प्रश्न करून इलाज विचारला.

या तिन्ही महिलांच्या प्रश्नावर हरिबाबा निर्मळ ह्याने मोघम, दिशाभूल करणारी उत्तरे देवून आर्थिक खर्चाचे उपचार सांगितले. हा बाबा सरळसरळ लोकांची फसवणूक करून माया जमवित असल्याचे आज सिद्ध झाले.

गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या दत्त मंदिरात आठवड्यात दोनदा हा फसवणूक दरबार भरवला जातो. भाविकांची दिशाभूल करणारी थातुरमातुर उत्तरे दिली जातात. जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी मुळातच विचारलेले प्रश्न खोटे होते. असे असूनही त्यांना मिळालेल्या उत्तरांतून फसवणुकीचा प्रकार घडतो आहे.

गेल्या २० वर्षांपासून हरिबाबा निर्मळ ह्याचा हा गोरखधंदा सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मंदिरात राजरोस हा प्रकार चालतो. हरिबाबाचा सर्व परिवार ह्या कामात सक्रिय असून मंदिराशेजारीच त्यांची इमारत उभी आहे.

 एका आमदाराने दिले १० लाख

एका प्रसिद्ध आमदाराच्या मुलीचे लग्न जमवून दिले म्हणून त्या आमदाराने बाबाला दरबारातच १० लाखांच्या देणगीचा धनादेश दिला होता अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे.

 गावकरी कंटाळले

टाकेद खुर्द गाव मुळातच अत्यंत लहान आहे. हरिबाबाकडे येणाऱ्या भक्तांची वर्दळ, चारचाकी वाहने यामुळे ग्रामस्थ कंटाळले आहेत. मात्र ग्रामस्थ भीतीमुळे बोलू शकले नव्हते.

 महिलांवर अत्याचार ?

अंगात येणाऱ्या महिलांना हरिबाबा चाबकाने फटके मारीत असतो. मात्र हा प्रकार फक्त अमावस्या असेल त्या दिवशी होतो.

 अजूनही गावात बाबागिरी

टाकेद खुर्द गावात ह्या बाबासारखे अजूनही 5 भोंदू बाबा असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

बाबांच्या संपत्तीची चौकशी व्हावी

कोट्यवधी रुपयांची जमीन, इमारती, बँकेतील शिल्लक याची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी झाल्यास मोठा भंडाफोड होईल.

भाविकांच्या श्रद्धेचा बाजार मांडून त्यांची फसवणूक करणाऱ्या हरिबाबा निर्मळ याचा आम्ही भंडाफोड केला आहे. वर्षानुवर्षे जादूटोणा करणाऱ्या ह्या बाबावर पोलीस का कारवाई करीत नाही ? जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आता ह्या बुवाबाजी विरोधात आक्रमक भूमिका घेणार आहेत.

– माधुरी भदाणे, प्रदेश कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड.

थोतांडी भाषा वापरून श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या हरिबाबा निर्मळ यांची विकृत बाबागिरी रोखू. त्याच्या जमवलेल्या मायेचा स्रोत शासनजमा करावी.

– चैताली बेजेकर- भोंडीवले, जिल्हा कार्याध्यक्षा

जादूटोणा करणाऱ्या भोंदूगिरी बाबांना कायद्याच्या पालनकर्त्यांचे सरंक्षण दिसते. दरबार बंद न झाल्यास आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ.

– कांचन दिघे-सहाणे, कार्याध्यक्षा

LEAVE A REPLY

*