Type to search

Featured maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

अभ्यासू नेत्याला मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली

Share

देशाच्या उभारणीसाठी जेटलींचे मोठं योगदान – राष्ट्रपती

अरुण जेटली यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झालं. आजाराला त्यांनी नेटाने लढा दिला. निष्णात वकील, उत्तम संसदपटू आणि प्रतिष्ठित मंत्री, त्यांनी देशाच्या उभारणीसाठी मोठं योगदान दिलं, असं ट्वीट कोविंद यांनी केलं आहे.

मी जवळचा मित्र गमावला – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. जेटली हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. देशाच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. पत्नी संगीताजी आणि मुलगा रोहन यांच्याशी मी बोललो. ओम शांती. अतिशय विद्वान, विनोदाची जाण असलेले करिश्माई व्यक्तीमत्व होते. अरुण जेटलींना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी आपलेसे केले होते. ते बहुआयामी व्यक्तीत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, धोरणे, शासन आणि प्रशासन यांचा प्रचंड अभ्यास होता. आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत, अरुण जेटलीजी यांनी विविध मंत्रालयाचे कामकाज पाहिले. त्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, तसेच आपल्या संरक्षण क्षेत्राची मजबूती केली, मैत्रीपूर्ण कायदे करुन परदेशाशी व्यापार वृद्धींगत केला. भारतीय जनता पक्ष आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत देशाच्या लोकशाहीचे रक्षण केले.अरुण जेटलींजी यांच्या निधनाने, मी जवळचा मित्र गमावला. ते अतिशय उत्कृष्ट जीवन जगले आणि आनंदी स्मृती मागे सोडून गेले. आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल, असे पंतप्रधान म्हणाले.

माझे वैयक्तिक नुकसान झाले – अमित शाह

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवरून जेटली यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, मी अरूण जेटली यांच्या अकाली निधनामुळे अतिशय दुःखी आहे. त्यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक नूकसान आहे. मी केवळ संघटनेचा ज्येष्ठ नेता नाही तर परिवारातील सदस्याला मुकलो आहे. त्यांचे मार्गदर्शन मला कैक वर्षांपासून मिळत होते. त्यांच्या निधनामुळे देशाचे राजकारण आणि भारतीय जनता पक्षात पोकळी निर्माण झाली आहे, जी लवकर भरुन येणारी नाही. अनूभव आणि अनोख्या क्षमतेसह अरुण यांनी पक्ष आणि सरकारमध्ये विविध जबाबदार्‍या सांभाळल्या. उत्तम वक्ते आणि समर्पित कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांनी देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद अशा महत्वपूर्ण पदांची शोभा वाढवली.

मौल्यवान सहकारी गमावला – राजनाथ सिंह

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करत जेटलींना श्रध्दांजली वाहिली. ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटल, माझे मित्र आणि अत्यंत मौल्यवान सहकारी अरुण जेटली यांच्या निधनामुळे मला खूप दु:ख झाले. ते व्यवसायाने एक कुशल वकील आणि एका कार्यक्षम राजकारणी होते.

जेटलींचे योगदान कायम लक्षात राहिल – सोनिया

अरुण जेटली यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दु:ख व्यक्त केले. अरुण जेटली यांनी सार्वजनिक जीवनात दिलेले योगदान कायमस्वरुपी लक्षात राहिल असे सोनिया गांधी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

रालोआ एकसंध ठेवणारा खांब कोसळला -उद्धव ठाकरे

अरुण जेटली यांच्या निधनामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी एकसंध ठेवणारा खांब कोसळला आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अरुण जेटली यांचे व्यक्तिमत्व असामान्य होते. सार्वजनिक आयुष्यात इतका प्रदीर्घ काळ राहूनही स्वतःचे वेगळे अस्तित्त्व अरुण जेटली यांनी जपले. अरुण जेटली हे निष्णात वकील आणि धुरंधर नेते होते. संकटमोचकफ म्हणून त्यांनी मोदी सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. शिवसेना आणि भाजपा यांच्यात नाते टिकले पाहिजे हे मानणारे जेटली होते असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

उत्कृष्ट संसदपटू गमावला – पवार

भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्या निधनाने दु:ख झालं. आपण एक उत्कृष्ट संसदपटू गमावला. मी त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करतो. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

देशाला कायमच जेटलींची उणीव भासेल – गडकरी

देशाला कायमच अरुण जेटली यांची उणीव भासेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. राज्यसभेतली त्यांची भाषणं कायम स्मरणात राहतील. सुषमा स्वराज आणि त्यापाठोपाठ अरुण जेटली यांचे जाणे पक्षावर वज्राघातासारखं आहे. अरुण जेटली यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना मी करतो, अरुण जेटली यांच्या निधनाचं वृत्त समजताच काय प्रतिक्रिया द्यायची ते कळत नाही मी निशब्द झालो आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे.

सुसंस्कृत नेतृत्व – वडेट्टीवार

जेटली यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. जेटली राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व होते. उत्कृष्ट संसदपटू हरपला आहे, अशी भावना विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.

अभ्यासू नेता काळाच्या पडद्याआड – थोरात

माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे अभ्यासू नेता काळाच्या पडद्याआड गेला अशी प्रतिक्रीया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली. आमदार थोरात म्हणाले, यशस्वी वकील असलेल्या अरुण जेटली यांनी सक्रिय राजकारणातही चांगले योगदान दिले. खासदार, राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते, माहिती व प्रसारण राज्यमंत्री, अर्थमंत्री आदी महत्त्वाच्या जबाबदार्‍या त्यांनी भूषवल्या. सखोल अभ्यास, विषयाची मुद्देसूद मांडणी करण्याचे त्यांचे विशेष कौशल्य होते. स्वपक्षातील नेत्यांसोबतच विरोधी पक्षांतील नेत्यांशी त्यांचा उत्तम संवाद होता. अरुण जेटली यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून जेटली कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

महान नेता गमावला – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरुण जेटली यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजजीनंतर काही दिवसांतच आम्ही आणखी एक महान नेता गमावल्यामुळे खूप दु:ख झाले आहे. जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. अगदी तरुण वयात एक उमदा विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात सक्रिय झालेल्या जेटलीजींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील. राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या या सभागृहातील विविध चर्चा वादविवादांना त्यांनी एक अनोखी उंची प्राप्त करून दिली होती.

विराट कोहलीची श्रद्धांजली

जेटली यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला असून खूप दु:ख झाले. ते नेहमी इतरांना मदत करत. 2006 साली जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते वेळात वेळ काढून माझ्या घरी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेे होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं ट्विट भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!